डोंगुर्ली – ठाणे ग्रामस्थांचे ‘मिशन चरावणे धरण’

0
134

>>सह्यांची मोहीम सुरू; केंद्र व राज्य सरकारला निवेदन देणार

पर्यावरणाच्या तिढ्यामुळे २५ टक्के काम पूर्ण झाल्यानंतर गेल्या पंधरा वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेल्या चरावणे धरणाच्या कामाला पुन्हा चालना देण्यासाठी सत्तरी तालुक्यातील डोंगुर्ली – ठाणे पंचायतीचे ग्रामस्थ राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकसंध झाले आहेत. भविष्यातील पाण्याची समस्या लक्षात घेऊन ग्रामस्थांनी ‘मिशन चरावणे धरण’ सुरू केले आहे. या मिशनअंतर्गत संपूर्ण पंचायतक्षेत्रात सह्यांची मोहीम राबविली जाणार असून सह्यांचे निवेदन केंद्रीय पर्यावरण मंत्री, मुख्यमंत्री, स्थानिक आमदार व संबंधित अधिकार्‍यांना देण्यात येणार आहे.
चरावणे धरणाचे काम २००० साली सुरू झाले होते. त्यावेळी या धरण प्रकल्पासाठी १७ कोटींचा निधी मंजूर झाला होता. काम सुरू होऊन २५ टक्के पूर्णही झाले होते. मात्र, त्यानंतर पर्यावरणप्रेमींनी विरोध केल्याने पर्यावरणाची हानी होणार असल्याच्या नावाखाली धरणाचे काम बंद करण्यात आले होते. सध्या, ठाणे – डोंगुर्ली पंचायतक्षेत्रात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी धरण मार्गी लागण्यासाठी केरी – ठाणे जिल्हा पंचायत सदस्य फटी गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकसंधपणे लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व ग्रामस्थांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून लढ्यात उडी घेतली आहे.
चरावणे धरण ठाणे – डोंगुर्ली पंचायतक्षेत्रातील ग्रामस्थांना वरदान ठरणार आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्याबरोबरच धरणामुळे कृषी क्षेत्राला मोठा वाव मिळणार आहे. त्यामुळे बंद पडलेले काम तातडीने सुरू करावे अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे. मागणी धसास लावण्यासाठी संपूर्ण पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांच्या निवेदनावर सह्या घेऊन केंद्र व राज्य सरकारला साकडे घालण्यात येणार आहेत. या धरणाचे बापूसाहेब देसाई, कृष्णा गावकर, नारायण खोत, उत्तम गावकर, नारायण गावस यांनी समर्थन केले.

धरणे गरजेचे

धरणामुळे चरावणे धरणासाठी फक्त ५० झाडेच तोडली जाणार होती. मात्र, धरण झाल्यानंतर हजारो झाडांची लागवड लोकांनी केली असती. पाणी होते तेव्हा तीन हजार क्विंटल भाताचे पीक मिळत होते. आता भातशेती पडीक आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. अंजुणे धरण होण्यापूर्वी केरी गावातही हीच स्थिती होती. त्यासाठी चरावणे धरण ठाणे – डोंगुर्ली पंचायतीसाठी गरजेचे आहे.
फटी गावकर,
जिल्हा पंचायत सदस्य