खोर्लीतील दरोडा प्रकरणाचा छडा

0
100

>>पारधी टोळीतील दोघांसह चारजणांना अटक

गेल्या ७ मार्च रोजी रवळनाथनगर, खोर्ली येथील केशवनाथ नाईक यांच्या बंगल्यावर मध्यरात्रौ दरोडा घातलेल्या पारधी टोळीतील दोघा दरोडेखोरांना तसेच दरोड्यासाठी त्यांना सहकार्य करणार्‍या एका महिलेसह दोघा गोमंतकीयांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, या दरोड्यातील अन्य सहा दरोडेखोरांना अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
पारधी टोळीतील दोघा दरोडेखोरांना कर्नाटक पोलिसांनी कर्नाटक येथील एका दरोडा प्रकरणी अटक केल्यानंतर खोर्ली येथील दरोड्यातही त्यांचा हात असल्याचे उघड झाले. त्यामुळे जुने गोवे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. खोर्ली येथील दरोड्यासाठी दोघा गोमंतकीयांनी आपणाला मदत केल्याचे या आरोपींनी पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी दोघा गोमंतकीयांनाही अटक केली आहे.
कर्नाटक पोलिसांनी अटक केलेल्या पारधी टोळीतील दरोडेखोरांची नावे विजय पोपट पटोली (४०), गिरुई-सातारा, सिद्धार्थ रमेश बर्से (२७), अशोकनगर, अहमदनगर अशी आहेत. तर गोवा पोलिसांनी अटक केलेल्या सहआरोपींची नावे दत्तात्रेय काशिनाथ गावडे (३७), पीडीए कॉलनी, खोर्ली व पुष्पा बाळगो गडेकर (५२), काणका-पर्रा अशी आहेत.
गोमंतकीयांची मदत
दत्तात्रेय काशिनाथ गावडे व पुष्पा गडेकर यांनी पारधी टोळीतील या दरोडेखोरांना दरोड्यासाठी मदत करताना दरोड्यासाठीचे घर निश्‍चित करणे, ते त्यांना नेऊन दाखवणे, गोव्यात त्यांची रहायची व्यवस्था करणे याबरोबरच त्यांना दरोडा घालणार असलेल्या घराजवळचे सगळे रस्ते व्यवस्थितपणे दाखवण्याचे काम केले होते. त्या बदल्यात त्यांना लुटलेल्या मालाचा वाटा मिळाला होता.
७ मार्च रोजी महाशिवरात्री होती. या दिवशी मध्यरात्रौ १२ ते १ या दरम्यान सात ते आठ दरोडेखोरांनी केशवनाथ नाईक यांच्या घरात घुसून त्याला व त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना सुर्‍याचा धाक दाखवून त्यांचे हात-पाय बांधून घरातील लाखो रु. चे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे ८ लाख रु. चा माल लुटला होता. जुने गोवे पोलीस या प्रकरणी तपास करीत होते. पण त्यांना धागेदोरे सापडत नव्हते.
खोर्लीसारखाच कर्नाटकात दरोडा
दरम्यान, खोर्ली येथे जसा दरोडा घातला होता तसाच दरोडा कर्नाटकमध्येही घालण्यात घाला होता. त्या दरोड्यातील दोघा दरोडेखोरांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळताच जुने गोवे पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधला असता या दरोड्यातही त्यांचाच हात असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणातील अन्य सहा दरोडेखोर अजून सापडलेले नसून त्यांचा शोध घेण्याचे काम चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. जुने गोवे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सगुण सावंत यांनी या प्रकरणी निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासकाम केले.