डॉ. पद्माकर दुभाषी समाजोपयोगी जीवनस्रोत आटला!

0
246
  • डॉ. सु. म. तडकोडकर

डॉ. दुभाषींचे ज्ञान व विद्या या क्षेत्रांशी रक्तआतड्याचे नाते होते, म्हणूनच त्यांनी त्यांच्या हातात ज्या संस्था आल्या त्यांना उर्जितावस्था आणलीच, तसेच त्यांनी नव्या संस्थांचीही निर्मिती केली. त्यांच्या कार्याचे महत्त्व असे आहे.

काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांची तेजस्वी चर्या पाहता किंवा त्यांचे तीर्थस्वरूप नाव ऐकताच त्यांच्याविषयी आपल्या हृदयात तसेच मनात अतीव आदराची भावना निर्माण होते. त्यांच्या हातून नेहमीच योग्य अन् उचित अशीच कार्ये होत आली आहेत अन् ती तशीच भविष्यकाळातही होत राहतील अशी आपली खात्री होते. गोवा विद्यापीठाच्या तीन कुलगुरूंची अशा व्यक्तिमत्त्वांत गणना करता येते. पद्मभूषण डॉ. पद्माकर रामचन्द्र दुभाषी, प्रोफेसर (डॉ.) नवीनचन्द्र निगम आणि प्रोफेसर (डॉ.) बाळकृष्ण सोण्डे या तीन कुलगुरूंच्या सहवासात गोवा विद्यापीठ प्रगतिशीलच राहिले, वर्धिष्णू होत राहिले. या तिघांपैकी प्रो. निगम (२००१) आणि प्रो. सोण्डे (९ नोव्हेंबर २०१९) यांचे निधन झाले होते. आता डॉ. दुभाषीही (७ मार्च १९३३ ते ३१ ऑगस्ट २०२०) राहिले नाहीत. या पार्श्वभूमीवर गोवा विद्यापीठातील डॉ. दुभाषींचे कार्य याविषयाशी संबंधित काही दुवे मांडण्याची संधी घेतो.

गोवा विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर डॉ. शेख अली यांची कुलगुरूपदावर नियुक्ती झाली. डॉ. अली यांनी विद्यापीठाच्या आरंभीचे जे काही आवश्यक असे कार्य होते ते प्रामाणिकपणे केले असेलही; परंतु एक समर्थ प्रशासक अशी त्यांची प्रतिमा नव्हती. अशा परिस्थितीत डॉ. दुभाषी यांची कुलगुरूपदी नियुक्ती झाली. मात्र ते एखाद्या पर्यटक कुलगुरूसारखे विद्यापीठात रूजू झाले नाहीत. त्यांनी गोवा विद्यापीठाला संपूर्णपणे वाहूनच घेतले.

डोळ्यांत ठसावी इतकी उंची, उजळ वर्ण, उभट पण रूंद भालप्रदेश, वयोमानानुसार विरळ होऊ लागलेले माथ्यावरचे काळसर केस, वेधक डोळे व त्यात झळाळणारी देवटाक्यातील पाण्यासारख्या शुद्ध चारित्र्याची आभा… व हे सर्व सामावून घेणारे, अशी समंजस व प्रभावी व्यक्तिमत्त्वे आढळणे अलीकडे दुर्मीळच. पद्मभूषण डॉ. पद्माकर दुभाषी ही नाममुद्रा अशा दुर्मीळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक होय. या नाममुद्रेला विचारवंतांच्या चित्तात नितांत आदर निर्माण करू शकणारे वलय लाभले होते. ते वलय भारताच्या महामहीम राष्ट्रपतींकडून पद्मपुरस्कार प्रदान करण्यापूर्वीच लाभले आहे, हे विशेष.

श्रीयुत वामन मंगेश दुभाषी ‘ऋग्वेदी’ हे डॉ. दुभाषींचे आजोबा. त्यांचे कुलदैवत मंगेश. दुभाषी कुटुंबीय मूळचे गोव्यातील साखळीचे. त्यांचे कुलदैवत मंगेशीचा श्रीमांगिरीश आणि मातृभाषा कोंकणी. पोर्तुगिजांच्या धर्मच्छलामुळे ते कुटुंब कारवारला स्थलांतरित झाले. कालांतराने ते पुण्यात स्थायिक झाले.

शालेय व महाविद्यालयीन जीवनात सदैव उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होणार्‍या डॉ. दुभाषींनी अर्थशास्त्रात पीएच.डी. व डि.लिट्.च्या पदव्या संपादल्या. संस्कृत विषयाचे ते उत्तम स्कॉलर होते. तत्कालीन महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक राज्यांना व्यापणार्‍या मुंबई विद्यापीठाकरवी आयोजित केल्या जाणार्‍या एम.ए.च्या परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. विद्वन्मान्य अशा ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’च्या परीक्षेत ते सर्वप्रथम आले होते. तद्नंतर आय.ए.एस. स्पर्धा परीक्षेत उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले होते.

डॉ. दुभाषींनी कर्नाटक राज्यातील तसेच नवी दिल्लीतील केंद्रीय प्रशासनात उच्च स्तरांवरील विविध पदांवर लक्षणीय स्वरूपाचे कार्य केले. भारतीय प्रशासकीय सेवेच्या केंद्रीय सचिवपदावरून ते १९८८ मध्ये सेवानिवृत्त झाले, ते त्या संस्थेपुरते सत्यच होते; तथापि, ते संस्थांची निर्मिती करून त्यांचे कार्यक्रम सुविहित पद्धतीने चालावेत म्हणून काळजी घेणारे दूरदृष्टीचे विचारवंत म्हणून अधिक निरलसपणे मग्न राहिले. ते मसुरीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिटी डेव्हलेप्मेण्टचे व नवी दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे संचालक होते. पुणे येथील वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंटचे संस्थापक संचालक तर पुणे येथील रिझर्व्ह बँकेच्या ऍग्रिकल्चरल बॅकिंग महाविद्यालयाचे प्राचार्य होते. ते पुण्यातील भारतीय विद्या भवनचे अध्यक्ष असताना विद्याप्रसाराच्याच कार्यात मग्न होते. त्यांची पुण्यातील भारती विद्याभवनच्या मानद अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. मानद नेमणूक असल्याने अर्थप्राप्ती नसली तरी ते विद्याक्षेत्रावर नितांत प्रेम करीत असल्याने, विद्यादानाशी संबंधित अशा अनेक संस्थांशी निगडित असलेले कार्य त्यांच्या मार्गदर्शनाद्वारे होत असे. त्या ‘विद्याभवन’च्या आठेक संस्था आहेत. त्यांचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संबंधित विद्यालयांना ते पाथेय उपलब्ध करून देण्याचे कार्य करीत असत. ते एका लेखात म्हणतात,
‘‘नवे कार्य स्वीकारायचे, त्यात झोकून द्यायचे आणि ते पूर्णत्वाला न्यायचे, असा हा माझा स्वभाव आहे. त्या स्वभावानुसारच अजूनही मी कार्यरत आहे.’’ (‘निवृत्तीनंतर’, शब्दसोहळा, गोमन्तक, पणजी, रविवार, जून ३०, २०१३, पृष्ठांक पंधरा)
भारताच्या महामहीम राष्ट्रपतींनी डॉ. दुभाषींना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन २०१० च्या जानेवारीत त्यांचा सन्मान केला. डॉ. दुभाषी हे मूलत: गोव्याचे भूमिपुत्र असल्याने तो गौरव गोव्याचाही आहे, यात शंका नाहीच नाही.

मध्यंतरीच्या काळात डॉ. दुभाषींचे कर्तृत्वशाली चिरंजीव अमेरिकेतल्या कार्नेल विद्यापीठात कार्यरत असताना त्यांनी आपल्या तीर्थरूपांना व्हिजिटिंग फॅकल्टीच्या पदावर निमंत्रित केले. त्या काळात म्हणजे १९८७ मध्ये देशात तापदायक दुष्काळ पडला होता. हाच विषय मनीमानसी ठेवून डॉ. दुभाषींनी ‘ड्राउट ऍण्ड डेव्हलप्मेण्ट’ या विषयाशी सुसंगत अशा सुदीर्घ निबंधाचे लेखन केले. त्यात दुष्काळाविषयीचा सखोलपणे व व्यापकपणे अभ्यास करून दीर्घकालीन अशा कोणत्या उपाययोजनाचे उपयोजन करता येईल अन् त्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्या स्वरूपाच्या योजनांची आखणी करता येईल यासंबंधीची सविस्तरपणे मांडणीही करून दाखविली होती.

पणजीत, गोव्याच्या राजधानीतल्या अठरा जून मार्गावरील सुशीला भवनच्या वास्तूत, मुंबई विद्यापीठाचे पदव्युत्तर अध्यापन व संशोधन केन्द्र होते. तद्नंतर गोवा विद्यापीठाची स्थापना झाली. ही गोव्यातील ज्ञान-विद्येच्या क्षेत्रातील शीर्षसंस्था स्थापन झाल्यानंतरही सर्वकाही जेमतेम चालले होते. बालकास दात येण्याच्या वेळच्या ज्या वेदना सोसाव्या लागतात, तशा गोवा विद्यापीठास ते स्थापन झाल्यानंतरच्या तीन-चार वर्षांत सोसाव्या लागत होत्या. अशा परिस्थितीत प्रशासकपदाशी निगडित असा पस्तीस वर्षांचा अनुभव असलेल्या डॉ. दुभाषींना तत्कालीन गोव्याचे राज्यपाल खुर्शीद आलम खान यांनी दूरध्वनीवरून गोवा विद्यापीठाचे कुलगुरू या पदाचा स्वीकार करावा अशी नम्रपणे विनंती केली.

त्यांची गोवा विद्यापीठाच्या उपकुलपतीपदी १९९० ते १९९५ या कालखंडासाठी नेमणूक झाल्यानंतर विद्यापीठाच्या संकुलात विद्याक्षेत्राशी संबंधित असलेल्या कार्यक्रमांस विशेष अर्थ आणि अनुशासन लाभू शकेल या विषयीचा दृढ आत्मविश्वास संबंधितांच्या चित्तात निर्माण होऊ शकला. याचे एकमेव कारण म्हणजे डॉ. दुभाषींच्या नाममुद्रेतच असा प्रभावी आत्मविश्वास निर्माण करण्याची क्षमता होती.

ज्या व्यक्तीला ज्ञान व विद्या या संकल्पनांशी वावडे असते, ती कितीही मोठ्या पदव्यांची स्वामी असली किंवा पदांवर कार्य करीत असली तरी ती शैक्षणिक कार्यकलापाविषयीची आस्था व आत्मीयता बाळगू शकत नाही हे कालातित सत्य होय. तिला केवळ अधिकार हवे असतात व प्रसिद्धीची हाव असते. तिच्या कार्यकालात संस्थेचे काहीही होवो, पण स्वत:चा नावलौकिक वाढविण्यापलीकडे अशा व्यक्तीला अभिजातपणाशी सोयरसूतक नसते. अशा प्रसिद्ध व्यक्ती जेव्हा अशा संस्था सोडून जातात, तेव्हा त्यांच्यानंतर त्या संस्थांची घडी पुनश्च सुयोग्य करण्यासाठी किती श्रम करावे लागतात, हे भारतातील काही महत्त्वाच्या संस्थांची दशा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते.
डॉ. दुभाषींचे ज्ञान व विद्या या क्षेत्रांशी रक्तआतड्याचे नाते होते, म्हणूनच त्यांनी त्यांच्या हातात ज्या संस्था आल्या त्यांना उर्जितावस्था आणलीच, तसेच त्यांनी नव्या संस्थांचीही निर्मिती केली. त्यांच्या कार्याचे महत्त्व असे आहे.

डॉ. दुभाषींनी गोवा विद्यापीठाच्या उपकुलपतीपदाची म्हणजेच कुलगुरूपदाची सूत्रे हातात घेताच त्यांनी कित्येक महत्त्वाचे तसेच आवश्यक असलेले प्रशासकीय निर्णय घेतले. ते भारताच्या प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयात कॅबिनेट सचिवपदी होते, त्यामुळे त्यांना प्रशासकीय अनुभव होताच. निर्णय कौशल्यपूर्णरीत्या कार्यवाहीत कसे आणायचे याविषयीचे त्यांना अनुमानही होते. विद्यापीठाला स्वत:चे भवन नव्हते. ते बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या तत्कालीन कोंदट संकुलात कसेबसे सामावले होते. डॉ. दुभाषींनी विद्यापीठाचा कारभार ताळगावच्या पठारावरील संकुलात आणला. डॉ. दुभाषींनी दीक्षान्त समारंभ हा कुलपतींच्या उपस्थितीत परंतु कुलगुरूंच्याच हस्ते व्हायला हवा याकडे कटाक्ष ठेवला. विद्यापीठाची अस्मिता व इभ्रत ही त्याच्या स्वत:च्या भवनात जपली जाते तसेच विद्यापीठाचे अस्तित्व दीक्षान्त समारंभाशी जुळलेले असते म्हणून हा समारंभ विद्यापीठाच्याच पटांगणावर करण्यात औचित्य असते, असे त्यांचे मत होते. अशा पवित्र विद्यादायिनी भूमीत मद्यपान व धूम्रपान करण्यावर प्रथमच निर्बंध आणणारे डॉ. दुभाषी एकमेव उपकुलपती होत. त्यांच्या कार्यकाळात ‘मी-मी’ असे म्हणणार्‍यांतही विद्यापीठाच्या क्षेत्रात उघडपणे धूम्रपान करण्याचे धाडस नव्हते. डॉ. दुभाषींचा हा दृष्टिकोन काही वर्षांनंतर इतरांच्या पचनी पडू शकला.
गोवा विद्यापीठाच्या स्थापनेनंतर तब्बल पाच वर्षे होऊन गेली होती; परन्तु सुविहित संविधी-तत्त्वे (स्टॅट्यूट्स्) व अध्यादेश (ऑर्डिनन्स) शिवायच विद्यापीठाचे कार्यक्रम चालू होते. डॉ. दुभाषींनी ‘विद्यापीठ’ संकल्पनेचा सर्वांगपरिपूर्ण अभ्यास करून संविधी-तत्त्वांच्या व अध्यादेशांच्या चौकटी निश्चित केल्या. इतकेच नव्हे तर ती चौकट अबाधित असते असे नसून, ती केवळ प्राध्यापकांना व प्रशासकीय पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करणारे तत्त्व असते असे सर्वांच्या मनावर बिंबवले. शासकीय-प्रशासकीय चौकटीतील शैक्षणिक चौकट ही अबाधित स्वरूपाची नसते तर ती केवळ मार्गदर्शक असते, म्हणून पृथक स्वरूपाची असते असे डॉ. दुभाषी सांगत होते, हे विशेष.
विद्यापीठातील प्रत्येक अध्यापन व संशोधन विभाग स्वायत्त स्वरूपाचा असायला हवा असा त्यांचा आग्रहच असे. विद्यापीठाला तसेच विद्यापीठातील विभागांना यु.जी.सी.च्या ‘स्पेशल असिस्टन्स प्रोग्रॅम’सारखे लाभ मिळायला हवेत यासाठी त्या विभागात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अध्यापकांचा संपूर्ण भरणा व्हायलाच हवा अन् त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना पदोन्नती द्यायलाच हवी याकडे डॉ. दुभाषींचा कटाक्ष होता. ते सतत उत्तम अध्यापकांच्या शोधात राहत आणि त्यांना सन्मानाने विद्यापीठात नेमणूक देत. विज्ञान क्षेत्राशी संबंधित विभाग जितके महत्त्वाचे असतात तितकेच मानव्यविद्याही महत्त्वाच्या असतात अशी जाणीव बाळगून त्यांनी गोवा विद्यापीठातील कार्यक्रम राबविले.

या पार्श्वभूमीवर गोवा शासनाकडून अध्यासनांची दाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून व्याख्यानमालेसाठी द्रव्य लाभले असते तर डॉ. दुभाषींनी त्या संधीचे सोने केले असते याविषयी शंका वाटत नाही. त्यांच्यानंतर गोवा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी आलेल्या प्रोफेसर (डॉ.) बालकृष्ण सोण्डेचीही डॉ. दुभाषी यांच्यासारखीच दृष्टी होती. त्यांनीही विभागांतली पदे भरण्यासाठी विशेष प्रयत्न केलेच, तसेच ते जरी जातिवंत प्रशासक नसले तरी दैनंदिन व्यवहाराशी संबंधित असलेले ‘टेक्निकल इर्रीटण्ट’ आढळल्यानंतर त्यांचा नायनाटही केला.

परिणामी या काळात कितीतरी व्यासंगी अध्यापक गोवा विद्यापीठात आले व संशोधन प्रकल्पही मार्गी लागले. प्रोफेसर सोण्डे हे तर विज्ञानशाखेशी संबंधित होते; परंतु त्यांच्या काळात त्यांनी मानव्यविद्या, विशेषत: भाषाविभागाला अवकळा येणार नाही असे कार्यक्रम राबविले. भाषाविभागात बृहत्संशोधन व्हावे यासाठी तांत्रिक बाबींचा बागुलबुवा दूर करून संबंधित अभ्यासकांना प्रोत्साहन दिले. गोवा विद्यापीठात ‘स्टडी इंडिया प्रोग्राम’ हा कार्यक्रम आला तो प्रोफेसर सोण्डेंच्या काळातच.

कोंकणी भाषेतील विश्वकोश केंद्राची स्थापना करीत असताना डॉ. दुभाषींनी पैशाचा दुष्काळ असतानाही आवश्यक तितके द्रव्य संपादून त्या केंद्राचे कार्य चालू राहील याकडे कटाक्ष ठेवला. ‘या विश्वकोशाच्या निर्मितीसाठी तुम्ही बाहेरून स्पॉन्सर्स मिळवा, विद्यापीठाच्या बाहेरील संस्थांकडून पैसा मिळवा’ असे रुक्ष तंत्रबद्ध संचालकासारखे बोलून स्वत:चे दायित्व टाळले नाही.

कुलसचिवाचे प्रशासन अशा प्रकारच्या कार्यवाहीत तत्पर राहील याकडे डॉ. दुभाषींचे विशेष लक्ष असे. विद्यापीठातील अध्यापकांना इतर मातब्बर संस्था निमंत्रण देतात, याविषयी डॉ. दुभाषींना अप्रूप वाटे. तद्वत विद्वान व नामांकित व्यक्तींनीही विद्यापीठातील विभागात सन्मानपूर्वक यावे, त्यांनी व्याख्याने द्यावीत म्हणून सर्वांना उत्तेजन दिले. गोव्यात आलेल्या विद्वानांना विद्यापीठातील प्रत्येक विभागाने निमंत्रण देऊन त्यांचे व्याख्यान आयोजित करावे व त्यासाठी योग्य ते मानधन द्यावे असा डॉ. दुभाषींचा आग्रह असे. त्यामुळे त्या विद्वानाच्या विधायक दृष्टिकोनाचा लाभ विद्यापीठातील संबंधित विद्यार्थ्यांना होतो, असे त्यांचे आग्रही मत होते. त्यासाठी कुलसचिवाच्या कार्यालयातून तांत्रिक स्वरूपाचे अडथळे निर्माण होणार नाहीत, याकडे त्यांचे विशेष लक्ष असायचे. प्रत्येक विभागाचे कार्यालय अध्यापकांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी असते. अध्यापकांचे लेखन पुस्तकांच्या स्वरूपात प्रकाशित व्हायला हवे. त्यांचे शोधनिबंध हे त्या कार्यालयात मुद्रित व्हायला हवेत असा त्यांचा आग्रह असे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा बाह्य जगताशी सतत संपर्क आला पाहिजे, त्याचा लाभ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वृद्धीसाठी होतो, असा त्यांचा निर्वाळा असायचा. त्यामुळे गोवा विद्यापीठातील विद्यार्थी नियमितपणे गोव्याच्या बाहेर जाऊ लागले.

त्या काळात कित्येकांना संगणकाविषयीचे स्वप्नही पडले नव्हते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील प्रत्येक अध्यापकाला त्याच्या अभ्यासासाठी संगणक मिळाला पाहिजे, असा डॉ. दुभाषींचा आग्रह होता, याविषयीचे आजही नवल वाटते. अध्यापकांचा पत्रव्यवहार त्या कार्यालयाने सांभाळायला हवा. प्रत्येक कार्यालयात कारकून व हरकाम्या यांची नेमणूक करायला हवी याकडे लक्ष दिले जाई. कुलसचिवाच्या कार्यालयात कोणत्याही विभागाची फाईल दोन दिवसांपेक्षा अनिर्णित स्वरूपात राहता नये, असे डॉ. दुभाषींनी निर्देश दिले होते. ते पाळले जातही. प्रत्येक सप्ताहाच्या शेवटी सर्व निर्देशांच्या कार्यवाहीची खातरजमा करून घेतली जाई. प्रत्येक विभागाने स्वत:च्या विद्याशाखेच्या प्रगतीचे स्वरूप ठरवायला हवे. त्यास विद्यापीठातील अधिकारी व्यक्तींनी मार्गदर्शन करायला हवे व विद्यापीठातील प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावर कुरघोडी करता नये यासाठीची दूरदृष्टी बाळगून डॉ. दुभाषींनी काही पावले उचलली व नियमावली केली. त्यानंतर डॉ. नवीनचन्द्र निगम आणि डॉ. बाळकृष्ण सोण्डे यांनीही ती उचलून धरली. ती आजतागायत उपयुक्तच ठरली.

असे असले तरी डॉ. दुभाषी जसे कुलसचिवाच्या कह्यात गेले नाहीत तसे त्यांनी कुलसचिवाच्या पदाला वेळप्रसंगी वार्‍यावर सोडले नाही. विद्यापीठाच्या संदर्भात कोणत्याही कार्यवाहीला उपकुलपती दायी असतो अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती, अन् आजही ती तशीच आहे. गोवा विद्यापीठाच्या संकुलात क्वचित प्रसंगी उद्भवलेल्या विद्यार्थी किंवा राजकारणी यांच्या रोषाला डॉ. दुभाषींनी सर्वांच्या साक्षीने ढालीसारखे सामोरे जाऊन तोंड दिले अन् त्या-त्या प्रसंगी विजयीही झाले. त्यामुळे आजही डॉ. दुभाषींची प्रतिमा नेहमीच आदरणीय आणि अभिमानस्वरूपच राहिली आहे.

डॉ. दुभाषी हे मूलत: संस्कृताचे पंडित. त्यामुळे त्यांच्या आचरणात नेहमीच एक प्रकारचा अभिजात सुशांतपणा जाणवतो. विद्यापीठाच्या संकुलात ते गोवा विद्यापीठाचे अहंमन्य उपकुलपती नसून सुसंस्कृत कुलगुरू आहेत, असेच सर्व विचारवंतांना वाटू लागले ते यामुळेच. विद्यापीठातील प्रत्येक अध्यापन व संशोधन विभागाने आपणहून त्यांच्या क्षेत्रातील नामवंतांच्या जन्मशताब्द्या करायला हव्यात, कारण त्यामुळेच नवीन काही अध्ययन-संशोधने करण्यास प्रेरणा लाभते असे त्यांचे मत होते. डॉ. दुभाषींच्याच आग्रहावरून गोवा विद्यापीठातील मराठी विभागाने प्रा. अनंत काकबा प्रियोळकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या साहित्यावर एका दिवसाच्या चर्चासत्राचे आयोजन केले होते.

डॉ. दुभाषींच्या काळात कितीतरी विविध क्षेत्रांतील विद्वान, देशी व विदेशी अतिथी विद्यापीठास भेट देऊन गेले. त्यांचा मानमरातब ठेवण्यात त्यांना भारी सौख्य लाभे. त्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या क्षेत्रात रोपट्यांचे रोपण करण्याचा कार्यक्रम करण्यात डॉ. दुभाषींना प्रचुर सुख मिळे. मात्र ज्यांची विद्यापीठाच्या भूमीत पाय ठेवण्याची पात्रता नाही अशा व्यक्तींना विद्यापीठात निमंत्रण देण्यात डॉ. दुभाषींना रस नसे. काहींनी आयुष्यात कधीही मोठ्या संस्था निर्माण केल्या नव्हत्या वा निरपेक्षपणे चालविलेल्या नव्हत्या. काही ‘विद्वांना’ना त्यांच्या नातेवाईकांचा वा गॉडफादर्सांचा जो आब होता, त्यामुळे पुरस्कार लाभले होते. काही ‘विद्वान’ नेहमी राजकारण्यांच्या संपर्कात राहून पुरस्कार आणि आदर-सत्कार संपादत असत. अशा व्यक्तींविषयी त्यांना यत्किंचितही आदर नव्हता आणि नाही. काहींना विद्याक्षेत्रापेक्षा इतर बाबींत अधिक स्वारस्य होते. काहींना स्वत:च्या नातेवाईकांना विद्यापीठात सेवा-चाकरी लावून देण्यात अधिक रस असे. ते इप्सित साध्य होऊ शकले नाही की अशातले काहीजण डॉ. दुभाषींना अवास्तव स्वरूपाची दुषणे देऊ पाहत अन् स्वत:चेच हसे करून घेत. अशा व्यक्तींना डॉ. दुभाषींचा धडाकेबाज कार्यक्रम पाहून, असंतुष्ट आत्म्याप्रमाणे तळमळताना पाहिले की इतरांना मौज वाटायची.
ते गोव्यातील संस्थांच्या कार्यक्रमांतही सहभागी होऊ लागले. डॉ. दुभाषी विद्यापीठाच्या ऊर्जस्वल प्रगतीसाठी झटले. प्रत्येक वर्षीचा अहवाल ते सिद्ध करीत. प्रत्येक वर्षी आपल्या या कार्यक्रमांविषयीचा सुबोध भाषेत लिहिलेला अहवाल स्थानिक वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करीत असत. त्यामुळे सामान्य वाचकांपर्यंत त्यांची कार्यप्रणाली व विद्यापीठाची विकसनशीलता या विषयीची सविस्तर माहिती पोचत असे.

डॉ. दुभाषींना विरोध करणारे काहीजण होते; परन्तु त्यांचा अभिजात व सुसंस्कृत स्वभाव असल्याने, त्यांच्यावर परोक्ष चिखलफेक करण्याचे वा इतरांच्या समोर अपमानित करण्याचे कधीही चिंतले नाही. त्यांना अनेकांनी पेचात आणण्याचा प्रयत्न केला, त्यांना कोर्ट-कचेर्‍या करण्यास भाग पाडले; परंतु त्यांनी कदापि त्या व्यक्तींबद्दल खुन्नस बाळगली नाही. ज्या व्यक्तीची मते आपल्या मतांशी सहमत नाहीत त्यांना ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकले नाही. त्यांनी कोणा उच्चपदस्थाच्या सांगण्यावरूनदेखील कोणाची पदोन्नती रोखली नाही. अशा व्यक्तींना उमजून घेण्यासाठीची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखीच होय. अशा व्यक्तींजवळही विशेष उपयुक्त असे कौशल्य असते, त्यांचा विद्यापीठाच्या उन्नतीसाठी उपयोग होऊ शकतो ही जाणीव बाळगून त्यांच्यावर उचित स्वरूपाचे दायित्व सोपविले. एखाद्या व्यक्तीची अवमानास्पद संभावना करून तिचे व तिच्या कर्तृत्वाचे अस्तित्वच पुसून टाकण्याचा प्रयत्न न करता त्या त्या व्यक्तीचे गुणदोष हेरून त्याच्यावर महत्त्वाचे दायित्व सोपविण्यातले त्यांचे कौशल्य वाखाणण्यासारखेच होते. ते सनदी अधिकारी होते हे खरेच, पण ते जातिवंत ‘ऍकॅडॅमिक’ व्यक्तिमत्त्व असल्याचे पावलोपावली जाणवायचे. मुख्य म्हणजे ते ‘डिसेन्सी’, ‘डेकोरम’ या संज्ञांचे पालक होते. त्यामुळे ‘मी-मी’ असे म्हणणारेही डॉ. दुभाषींचे भक्त झाले.

त्यांचा स्वत:च्या कार्यप्रणालीविषयीचा नेमका व प्रखर आत्मविश्वास असल्याने त्यांनी कधीही स्वत:भोवती चार-दोन खुषमस्कर्‍यांचे कोंडाळे निर्माण होऊ दिले नाही. परिणामी त्या कोंडाळ्याच्याच हाती संपूर्ण विद्यापीठाच्या चाव्या कधीच गेल्या नाहीत. त्यांनी त्या कोंडाळ्याच्या सांगण्यानुसार स्वत:चे मतनिर्धारण केले नाही. त्यामुळे सर्वांशी त्यांचे नाते प्रत्यक्ष-परोक्ष स्वरूपाचे राही व ज्याच्या-त्याच्या क्षमतेनुसार जबाबदारी सोपविली जाई. परिणामी विद्यापीठातील कार्यक्रमांत बव्हंशी सर्वांचाच सहभाग असे. प्रोफेसर सोण्डेनींही असेच सहकार्य संपादले होते.

डॉ. दुभाषींनी संस्कृती, विज्ञान आणि विद्यादान या त्रयीशी नेहमीच कृतज्ञता व्यक्त केली आणि तिचे संगोपनही केले. त्या दृष्टिकोनाचा लाभ गोवा विद्यापीठालाच झाला. गोवा विद्यापीठातील कार्यकाल त्यांनी अशा रीतीने पूर्ण केला. त्यांना कित्येक वेळा कडवट अनुभव आले पण ज्यांनी त्यांना असे अनुभव देऊ केले त्यांनीही त्यांना निरोप देताना म्हटले की डॉ. दुभाषींनी जे काही केले ते गोवा विद्यापीठाच्या कल्याणासाठी केले. या विद्वान कुलगुरूचा याहून वेगळ्या पद्धतीने उचित गौरव कसा होऊ शकेल?
१९९५ मध्ये गोव्याहून डॉ. दुभाषी पुण्याला परतले. त्या काळात शासनाने ‘रुरल ऍग्रिकल्चरल क्रेडिट रिव्ह्यू कमिटी’ नेमली होती. डॉ. दुभाषींना तिचे सदस्यत्व देण्यात आले होते. त्या निमित्ताने त्यांनी भारतातील आसामपासून विविध राज्यांना भेटी देऊन अहवाल लिहिले. त्यांनी त्या अहवालात कृषी-पतपुरवठा करण्यासाठीची व्यवस्था कशी आहे, सहकारी पतपुरवठा संस्था आणि अन्य तत्सम संस्था यांची परिस्थिती कशी आहे, याविषयीचा ऊहापोह केला होता.
मध्यंतरीच्या काळात नामांकित वैज्ञानिक व पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वसंत गोवारीकर यांनी डॉ. दुभाषींवर बरेच मोठे दायित्व सोपविले. त्या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ‘मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूट’चे परिशीलन करून त्यासंदर्भात अहवाल सादर करावा अशी त्यांना विनंती केली गेली. त्यांचा अहवाल म्हणजे कोणाही विद्यापीठास पाथेय वाटावे असे त्याचे स्वरूप आहे.

येथून डॉ. दुभाषींनी मराठीत लेखन करण्यास आरंभ केला. वर्तमानपत्रातून जे लेख लिहिले ते सामान्य वाचकांनाही सुबोध वाटावे अशा भाषेत. अशा लेखांची संकलने नंतर प्रकाशित झाली. आजवर त्यांचे इंग्रजीतील वीसेक व मराठीतील सहा ग्रंथलेखन प्रकाशित झाले आहे. ते सर्व विद्वन्मान्यही झाले आहेत. प्राणिमात्राला वार्धक्य लाभले की त्याच्यावर कधीतरी मृत्यूची छाया पडणारच असते. तशी डॉ. दुभाषींवरही पडली; तथापि प्रत्येक क्षण जिजीविषा बाळगणार्‍या, अभिजात तसेच समाजोपयोगी जीवन जगण्याची कामना करणार्‍या डॉ. दुभाषींची उणीव सदैव जाणवत राहील, याविषयी यत्किंचितही शंका वाटत नाही.