पंधरवड्यातील दुसरी घटना
डेन्मार्क येथील ५१ वर्षीय महिलेवर राजधानी दिल्लीत सामूहिक बलात्काराची घटना मंगळवारी तिन्हीसांजेला घडली. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गेल्या पंधरवड्यातील विदेशी पर्यटक महिलेवर बलात्काराची ही दिल्लीतली दुसरी घटना आहे. ३ जानेवारी रोजी आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह प्रवास करणार्या पोलीश महिलेवर टॅक्सीचालकाने बलात्कार करून रेल्वे स्थानकाबाहेर सोडून दिले होते.
दरम्यान, मंगळवारी दुर्दैवी घटनेस सामोरे जावे लागलेली महिला संध्याकाळी दिल्लीत वस्तूसंग्रहालयास भेट देण्यासाठी गेली होती. मात्र नंतर पहाडगंज परिसरातील आपल्या हॉटेलकडचा मार्ग ती विसरली. त्याचवेळी तेथे पोचलेल्या सहा जणांनी तिच्यावर बलात्कार केला व आयपॅड आणि रोकड लुटली. याप्रकारानंतर कशीबशी रात्री ७ वा. ती आपल्या हॉटेलवर पोचली. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापकाने पोलिसांना याप्रकाराची माहिती दिली व तक्रार नोंदवण्यात आली.