डिजीटल मीटर न वापरणार्‍यांवर पुढील आठवड्यापासून कारवाई

0
18

>> वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांचा टॅक्सीचालकांना इशारा; टॅक्सींचे परवानेही रद्द करणार

वाहतूक खाते पुढील आठवड्यापासून डिजीटल मीटरचा वापर न करणार्‍या टुरिस्ट टॅक्सीचालकांविरोधात कारवाईची मोहीम सुरू करणार असून, मीटर न वापरणार्‍या टुरिस्ट टॅक्सींचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत, असा इशारा वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल दिला. डिजीटल मीटरला सुरुवातीला टॅक्सीचालकांकडून जोरदार विरोध होत होता; मात्र नंतर हा विरोध मावळला आणि बहुतांश चालकांनी मीटर बसवले. असे असले तरी हे चालक राज्यात येणार्‍या देशी-विदेशी पर्यटकांना थातूरमातूर कारणे सांगून डिजीटल मीटरनुसार भाडे न आकारता मनमानी पद्धतीने भाडे वसूल करतात. त्यामुळे वाहतूकमंत्र्यांनी आता कारवाईचा इशारा दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निर्देशानुसार राज्य सरकारकडून राज्यातील टुरिस्ट टॅक्सींना मोफत डिजीटल मीटर उपलब्ध करण्यात आले आहेत; परंतु टुरिस्ट टॅक्सीचालकांकडून डिजीटल मीटरचा वापर न करता पर्यटकांची आर्थिक लुबाडणूक केली जात आहे, अशा अनेक तक्रारी आपल्याकडे येत आहेत. तसेच, पर्यटन क्षेत्रातील टीटीएजी या संस्थेने टुरिस्ट टॅक्सीचालक डिजीटल मीटर वापरत नसल्याबाबत तक्रार केली असून, डिजीटल मीटरची कार्यवाही सक्तीने करण्याची मागणी त्यांनी केली आहे, असे गुदिन्हो यांनी सांगितले.

मनमानी कारभारामुळे
ओला, उबरला निमंत्रण

राज्यात सुमारे १० हजार टुरिस्ट टॅक्सी कार्यरत आहेत. त्यातील ९ हजार म्हणजेच ८० टक्के टुरिस्ट टॅक्सींना डिजीटल मीटर बसविण्यात आले आहेत; परंतु पर्यटकांना डिजीटल मीटरनुसार भाडे आकारले जात नाही. पर्यटकांकडून जादा शुल्क आकारून त्यांची लुबाडणूक केली जात आहे. राज्यात टुरिस्ट टॅक्सीचालकांचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यांच्या मनमानी कारभारामुळे ते राज्यात ऍप आधारित ओला, उबर यासारख्या टॅक्सी सेवेला निमंत्रण देत आहे, असा सूचक इशारा देखील वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिला.
राज्यातील टॅक्सीचालकांमध्ये एकमताचा अभाव दिसून येत आहे. उत्तर गोव्यातील टुरिस्ट टॅक्सींना दक्षिण गोव्यात आणि दक्षिण गोव्यातील टॅक्सींना उत्तर गोव्यातून प्रवासी घेण्यास विरोध केला जात आहे. टुरिस्ट टॅक्सी व्यवसायातील कारभारात सुधारणा करण्याची गरज आहे, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.

टॅक्सीचालकांची चलाखी
विरोध मावळल्याचे दाखवत टॅक्सीचालकांनी डिजीटल मीटर टॅक्सीमध्ये बसवले असले तरी त्यांनी चलाखी करत भाडे आपल्या मनमर्जीप्रमाणेच आकारण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. बहुतांश चालक डिजीटल मीटर बंद पडला, मीटरनुसार जास्त भाडे द्यावे लागेल, अशी अनेक कारणे पर्यटकांना सांगून मीटरचा वापर टाळतात आणि आपल्या मर्जीनुसार भाडे आकारतात. शिवाय टॅक्सींमधील मीटर पर्यटकांच्या दृष्टीस पडणार नाहीत, अशा पद्धतीने कपड्याने तो झाकून ठेवतात. त्यामुळे पर्यटकांची आर्थिक लुबाडणूक सुरुच आहे.