बडे बंडवाले!

0
37

एकनाथ शिंदे यांचे बंड हा विषय आता केवळ महाराष्ट्र सरकारपुरता मर्यादित राहिलेला नाही. हा शिवसेना नावाच्या एका लढाऊ संघटनेवरील ठाकरे घराण्याच्या ढासळत्या वर्चस्वाचा आणि त्यामुळे मूळ संघटनेच्या अस्तित्वाचाही प्रश्न बनला आहे. पक्षाचे दोन तृतियांशहून अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्या मागे जाताना हताशपणे पाहण्याची पाळी उद्धव यांच्यावर यावी हे त्यांच्या नेतृत्वाचे निश्‍चितच अपयश आहे. कुठे तरी काही तरी नक्कीच चुकले आहे. त्यामुळे थेट शिवसैनिकांना भावनिक आवाहन करणे, मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सोडून मातोश्रीवर जाणे, वगैरेंतून आम शिवसैनिकांना साद घालण्याचा आर्त प्रयत्न जरी त्यांनी सरतेशेवटी केला, तरीही पक्षसंघटनेचे आणि ठाकरे घराण्याच्या प्रतिष्ठेचे जे नुकसान या बंडामुळे झाले ते कधीच भरून न येणारे आहे.
बंडे ही काही शिवसेनेला नवी नाहीत. आतापर्यंत किमान पाच मोठी बंडे सेनेमध्ये झाली. तेव्हाचा शिवसैनिक अत्यंत कडवा आणि आक्रमक असायचा. त्यामुळे बंडखोरांना जिवाची धास्ती असायची. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात बंड होऊनही शिवसैनिक थंडच आहे. बेंबीच्या देठापासून घोषणा देण्यापलीकडे त्याची मजल नाही, वा बंड करणार्‍या आमदारांना मतदारसंघात परतल्यावर आपण आपल्या शिवसैनिकांना कसे सामोरे जाणार हा धाकही उरलेला नाही. त्यामुळेच कोणी कल्पनाही केली नसेल असे सेनेचे एकेक कडवे मोहरे शिंदेसेनेमध्ये सामील होत चालले आहेत. ज्या पक्षाने सारे काही दिले त्याच्याशी बेइमानी करताना आपण काही चुकीचे करतो आहोत हा भावही त्यांच्यात दिसत नाही.
अर्थात, याला आणखी एक कारण आहे. आपण शिवसेनेशी, बाळासाहेब ठाकर्‍यांशी, हिंदुत्वाशी एकनिष्ठ आहोत आणि महाविकास आघाडीमध्ये राहून शिवसेनेच्या जिवावर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे पक्ष मोठे होत आहेत हे आपल्याला मानवले नाही असा एकूण पवित्रा शिंदे यांनी घेतला आहे आणि त्याच आधारावर ते आपल्या या बंडाची एकूण वैचारिक मांडणी करीत आले आहेत. ‘महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि भाजपाच्या सोबत सरकार बनवा’ हीच त्यांची सर्वांत प्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपुढील मागणी होती. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत जाणे म्हणजे शिवसेनेचा त्याग करणे नव्हे, तर ‘जाज्वल्य हिंदुत्वाच्या मूळ बाण्याकडे शिवसेनेला पुन्हा घेऊन जाणे’ असा अर्थ लावून घेऊन हे बंडवाले दिमाखात निघाले आहेत. या बेईमानीला हा नैतिक टेकू त्यांनी लावलेला आहे.
शिंदे यांच्यामागे जी रांग लागली आहे, त्याची तशी अनेक कारणे आहेत. शिवसेनेत राहूनही भाजपाशी सत्तेची साथसोबत केल्यास मिळणार असलेले लाभ या मंडळींना दिसू लागले आहेत. यापैकी अनेकांच्या मागे ईडी, आयकर विभाग, सीबीआय आदींच्या चौकशींचा ससेमिरा आहे तो थांबेल हा दिलासा त्यांना आहे हे तर खरेच, परंतु ते मुख्य कारण नव्हे. एकनाथ शिंदेंच्या आडून हे बलाढ्य भाजपाचे बोलावणे आहे हे जाणूनच ही मंडळी एवढ्या उत्साहात सूरत, गुवाहाटी करीत भारत भ्रमणाला निघाली आहेत. अनेकांसाठी ही एका परीने लॉटरी लागली आहे. मोठा मासा छोट्याला खातो या तत्त्वाने आज या शिवसैनिकांना महाविकास आघाडीपासून वेगळे काढून, त्यांना वेगळा राजकीय गट स्थापन करायला भाग पाडून नंतर सावकाशीने भाजपा त्यांची आणि त्यांच्या पक्षाची यथेच्छ शिकार करून आपला विस्तार करील हे त्यांच्या गावीही नाही. मगो पक्षाची गोव्यामध्ये जी आणि जशी वासलात लावली गेली, त्याचाच हा मोठा अध्याय महाराष्ट्रामध्ये पद्धतशीरपणे रचला जातो आहे. आघाडी सरकारचा राजधर्म पाळताना उद्धव यांनी तिन्ही पक्षांत सामंजस्य राखण्याचा जो प्रयत्न केला व त्यासाठी प्रसंगी आपले हिंदुत्व पडद्याआड ढकलले त्याचा हा फटका आहे. उद्धव यांच्याशी आमच्या ज्या काही मोजक्या भेटी झाल्या आहेत, त्यातून ते एक अतिशय सज्जन, सुसंस्कृत आणि शालीन व्यक्तिमत्त्व आहे असे आमचे मत बनले आहे. परंतु त्यांच्या याच वागण्याचा गैरफायदा घेऊन त्यांच्याभोवती कोंडाळे तयार झाले होते का आणि संघटना आणि नेतृत्व यांच्या दरम्यान त्यांनी काचेचा पडदा तयार केला होता का हेही आता शोधले जायला हवे. विशेषतः संजय राऊत यांच्यासारख्या जनाधार नसलेल्या नेत्यांना संघटनेत मिळणार्‍या अतोनात महत्त्वामुळे उद्धव हे एक हतबल पक्षप्रमुख असल्याचे चित्र निर्माण होत गेले. त्यातून एकनाथ शिंदे यांच्यासारखा तळागाळाशी सतत जोडलेला लोकनेता जेव्हा पर्याय घेऊन उभा राहिला तेव्हा सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज करता शिंद्यांचे पारडे जड आहे हे दिसून आले तेव्हा सूरत आणि गुवाहाटीच्या दिशेने रांग लागली यात नवल नाही.