Home बातम्या डिजिटल टॅक्सी धोरणाचा मसुदा जाहीर

डिजिटल टॅक्सी धोरणाचा मसुदा जाहीर

0

टॅक्सी चालकांकडून मागवल्या सूचना व आक्षेप; मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरेी येथे मंत्रालयात काल घेतलेल्या एका बैठकीत डिजिटल टॅक्सी धोरणाचा मसुदा काल जाहीर केला. या मसुद्याबाबत टॅक्सी चालकांच्या सूचना, आक्षेप जाणून घेण्यासाठी वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्याची एक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीकडे टॅक्सी चालकांनी आपल्या सूचना, आक्षेप सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. या समितीची येत्या 9 मार्च 2026 रोजी बैठकीत पुन्हा विविध मुद्यावर चर्चा केली जाणार आहे.
या बैठकीला वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार मायकल लोबो, आमदार डिलायला लोबो, आमदार केदार नाईक यांच्याबरोबर टॅक्सी संघटनेचे नेते उपस्थित होते.

या बैठकीच्या प्रारंभी राज्य सरकारच्या डिजिटल टॅक्सी धोरणाच्या मसुद्याची माहिती देण्यात आली. नवीन डिजिटल टॅक्सी धोरणाचा राज्यातील पर्यटक टॅक्सी मालक आणि पर्यटकांना लाभ होणार आहे. राज्यातील पर्यटक टॅक्सी मालक या नवीन धोरणाबाबत सकारात्मक आहेत. त्यांच्या काही समस्या, तक्रारी असल्यास त्यावर तोडगा काढण्यासाठी वाहतूक खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून येत्या सोमवार 9 रोजी बैठक घेऊन टॅक्सी चालकांच्या तक्रारी, सूचनांवर निर्णय घेतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

माईल्स ॲप बंद करण्याची मागणी
या बैठकीत टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींनी गोवा माईल्स ॲप बंद करण्याची मागणी केली. पर्यटन टॅक्सीचे दर डिजिटल माध्यमांवर उपलब्ध करण्यास पाठिंबा दिला. तथापि, काहीजणांनी ॲप आधारित टॅक्सीला विरोध दर्शविला आहे. राज्य सरकारने नियुक्त समितीकडे टॅक्सी चालकाच्या सूचना सविस्तरपणे मांडण्यात येणार आहेत, असे टॅक्सी संघटनेचे नेते चेतन कामत यांनी सांगितले.