मगोवर नजर

0
99

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे आणि या सर्वाच्या केंद्रस्थानी आला आहे तो मगो पक्ष. मगो पक्षाला यावेळी बरेच राजकीय महत्त्व आलेले दिसते. एकीकडे भारतीय भाषा सुरक्षा मंचाची सारी मदार मगोवर आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेसमधील असंतुष्टांचे डोळेही मगोकडे लागलेले दिसत आहेत. एकाच वेळी अनेक पक्षांशी सामना करावा लागणार असल्याने निदान मगोशी असलेली युती तुटू नये आणि मगोच्या गोटात विरोधक एकवटू नयेत यासाठी भाजपानेही कंबर कसली आहे. या सार्‍या अनुकूल परिस्थितीचा पुरेपूर राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न सध्या मगोने चालवलेला दिसतो. एकीकडे भाभासुमंसोबत जायची हवा निर्माण करायची, दुसरीकडे कॉंग्रेसमधील असंतुष्टांना आणि नरेश सावळांसारख्या अपक्षांना पक्षात घेण्याचे संकेत द्यायचे आणि तिसरीकडे भाजपाशी युती टिकवण्यासाठी मागण्या पुढे करायच्या अशी तिहेरी चतुर नीती मगोने अवलंबिलेली आहे. ढवळीकरांच्या मगोचे प्राधान्य आजवर कुठल्या पक्षाला नव्हे तर सत्तेत सहभागी होण्याला राहिले आहे. त्यामुळे गेल्या वेळी कॉंग्रेसला सत्तासोबत केल्यावर बदलत्या वार्‍याला साथ देत भाजपाची सत्तासोबत करणे त्यांना अनुचित वाटले नाही आणि आताही बदलत्या वार्‍याचा, बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी आपली भूमिका सुस्पष्ट न करण्याची ‘नरो वा कुंजरोवा’ नीती अवलंबून वेळ काढला जात आहे. मगोची भूमिका डिसेंबरपर्यंत ठरेल असे पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर नुकतेच म्हणाले, त्याचा अर्थ हाच आहे. भाजपाने आपले पूर्ण बहुमत असतानाही निवडणूकपूर्व युतीचा मान राखत मगोला महत्त्वाची मंत्रिपदे दिली. परंतु नंतर मगोने विस्तारवादी धोरण स्वीकारताच भाजपाचे काही मंत्री अस्वस्थ झाले. त्यातून शीतयुद्धाला तोंड फुटले. सार्वजनिक बांधकाम सारखे महत्त्वाचे खाते मगोकडे असल्याने रखडलेल्या विकासकामांवरूनही काही सत्ताधारी आमदारांमध्ये मगो नेतृत्वाविषयी नाराजी निर्माण झाली. परंतु एवढे होऊनही दोन्ही पक्षांमधील संबंध सुरळीत ठेवण्यात सुदिन ढवळीकर यांनी आजवर महत्त्वाची भूमिका बजावली. बंधू दीपक यांचे सहकार खाते काढले गेले, त्यांच्यापाशी बिनमहत्त्वाची खाती ठेवली गेली, तरी मगोने तो अवमान निमूट सोसला. फोंड्याचे आमदार लवू मामलेदार यांच्या माध्यमातून भाजपाच्या दिशेने तीर भिरकावले गेले, तरी अधिकृतरीत्या भाजपाविरुद्ध भूमिका मगोने घेतली नाही. सरकारवरील अविश्‍वास ठरावावेळीही त्यांनी सरकारला साथ दिली. त्यामुळे ही युती तोडण्याजोगा जाहीर बेबनाव अद्याप तरी निर्माण झालेला नाही. शिवाय केंद्रात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे भाजपाशी असलेली युती मगोने तोडावी असा कितीही दबाव भाभासुमं किंवा मगोच्या आसर्‍याला येऊ इच्छिणार्‍या इतर असंतुष्ट आमदारांनी आणला तरी मगो प्रत्येक पाऊल मोजून मापूनच टाकते आहे. भाभासुमंची वावटळ खरोखरच वादळात रुपांतरित होणार का याविषयी मगो साशंक आहे. त्यामुळे भाजपाकडून जास्तीत जास्त जागा आपल्या वाट्याला आणून आगामी निवडणुकीत आपले वजन आणि सत्तेतील स्थान वाढविण्याच्या दिशेने मगोने आता हालचाली सुरू केलेल्या दिसतात. कॉंग्रेसमधील काही आमदार त्या पक्षाच्या नेतृत्वावर नाराज आहेत आणि पांडुरंग मडकईकर यांच्यासारख्यांनी ही नाराजी स्पष्टपणे व्यक्त केलेली आहे. अपक्ष आमदार रोहन खंवटे, नरेश सावळ, कॉंग्रेसमधील असंतुष्ट मडकईकर, बाबू कवळेकर, विश्‍वजित आदींनी मिळून एखादे नवे राजकीय समीकरण मांडले तरी आश्‍चर्य वाटू नये. या घडामोडींमध्ये मगोची भूमिका अर्थात महत्त्वाची राहणार आहे आणि मगोला निर्णय घेण्याची घाईही दिसत नाही!