डबे

0
16

क्षणचित्रं… कणचित्रं…

  • – प्रा. रमेश सप्रे

प्राचीनकाळापासून आजच्या अति-अतिआधुनिक काळापर्यंत श्रीमंत-गरीब, शहर-खेडं-अगदी झोपडपट्टी, कृषी तसेच औद्योगिक, बाजारी तसेच कौटुंबिक जीवनातही डब्याला कोणीही हटवू शकलं नाही…

प्राचीनकाळी गुहेत कळप करून राहणार्‍या आदिमानवाच्या जीवनातील दोन क्रांतिकारी शोध म्हणजे अग्नी नि चाक (चक्र). अग्नीमुळे कच्चं मांस खाणार्‍या चार पायांच्या जनावरांपासून या दोन पायांच्या प्राण्याचा ‘मानव’ होण्याकडचा प्रवास सुरू झाला, तर चाकासारख्या साधनामुळे अवजड वस्तू इकडून तिकडे हलवणं सोपं बनलं. पण असं वाटतं की समूह करून कुटुंबासारखं राहायला लागल्यावर त्याला एक प्रापंचिक शोध लागला तो म्हणजे ‘डबा’!
अगदी त्या काळापासून आजच्या अति-अतिआधुनिक काळापर्यंत श्रीमंत-गरीब, शहर-खेडं-अगदी झोपडपट्टी, कृषी तसेच औद्योगिक, बाजारी तसेच कौटुंबिक जीवनातही डब्याला कोणीही हटवू शकलं नाही. आजच्या मोठ्या पेट्या, अगदी अजस्र कंटेनर हेही डबेच. इतकंच कशाला, अगदी मालगाडीलाच नव्हे तर प्रवाशांच्या रेलगाडीलाही डबेच असतात… आहे की नाही गंमत! आपल्याकडे राज्यपरिवहनाच्या जुनाट बसलाही डब्बाच म्हणतात. असो.

दिवाळीसारखे सण आले की पूर्वी करंज्या, चकल्या, लाडू, चिवडा सर्वच ठेवण्यासाठी डब्यांची धुवाधूव किंवा घासपूस सुरू होई. आज अगदी असले-तसले पॅकिंग-पार्सल-बॉक्सेस-कंटेनर्समधून येणारे खाद्यपदार्थही ‘वापरा आणि फेका’ प्रकारच्या डब्यातूनच येतात, हो ना?
संस्कृतमध्ये ‘संपुष्ट’ म्हणून एक शब्द आहे. मराठीत त्याला संपुट असंही म्हणतात. सामान्य भाषेत डबा. वरती झाकण नि खाली त्याच्या मापाचं भांडं की झाला डबा तयार! धार्मिक ग्रंथांचं पारायण करताना श्‍लोक किंवा ओवी म्हणण्यापूर्वी आणि नंतर एखादा सुयोग्य मंत्र म्हणतात. आरंभीचा मंत्र हे झाकणमधला श्‍लोक, ओवी हा पदार्थ नि शेवटचा मंत्र हा डबा! हेच ते संपुष्ट. उदा. ॥ श्रीराम ॥ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा| मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा| नमूशारदा मूळ चत्वार वाचा| गमू पंथ आनंत या राघवाचा॥ श्रीराम ॥ म्हणजे ‘श्रीराम’च्या संपुष्टात मनाचे श्‍लोक म्हणायचे. ही फार हृद्य कल्पना आहे. ग्रंथपारायणाबरोबर मंत्रपठण वा नामस्मरणही झालं.

अशा संपुष्टाशी म्हणजे डब्याशी संबंधित अशी एक उद्बोधक कथा आहे. जुन्या काळची. त्यावेळी यात्रा करायची तर पायी किंवा बैलगाडीतून. अशीच काही मंडळी मंदिरदर्शनासाठी नि तीर्थक्षेत्रात स्नान, पूजन करण्यासाठी बैलगाडीतून निघाली होती. त्यात एक तेजस्वी, ज्ञानी पण मनमिळावू असे भटजी होते. सारेजण त्यांना आदरानं ‘गुरुजी’ म्हणायचे. त्यांच्याकडे एक डबा होता. ते त्याला संपुष्ट म्हणायचे. त्यात त्यांच्या नित्य पुजेतला शाळिग्राम होता. त्याची सूर्योदय-सूर्यास्ताला पूजा करावीच लागे. इतर प्रवासीही पूजा झाल्यावर त्या पवित्र शाळिग्रामाचं (विष्णूचं) दर्शन घेत.

एकदा पहाटे मंडळी पोचली सागरकिनारी. बाजूला भव्य मंदिरं. सारे स्नानासाठी समुद्रात उतरले. भटजीबुवा मात्र चिंताग्रस्त मुद्रेनं इकडं-तिकडं काहीतरी शोधत होते. काल रात्री झोपेत असताना प्रवासात त्यांचा शाळिग्राम असलेला डबा कुठंतरी पडला होता. हे कळताच सर्वजण शोधू लागले. डबा काही मिळाला नाही. अखेर असेच भटजीबुवा समुद्रस्नानासाठी पाण्यात उतरले. स्नान करून नुकत्याच उगवत असलेल्या सूर्यबिंबाकडे पाहून आनंदाने उद्गारले- ‘‘हाच तर खरा शाळिग्राम… सूर्यनारायण! आणि हे काय वर असीम निळ्या आकाशाचं झाकण नि खाली नीलसागराचं भांडं. हेच की निसर्गातलं दिव्य संपुष्ट!’’ आजपर्यंत असा डबा नि असा शाळिग्राम त्यांनी ‘अनुभवलाच’ नव्हता. ते त्या आनंदाच्या तरंगावर हेलकावत असतानाच कुणीतरी धावत ओरडत आलं, ‘‘गुरुजी, तुमचा डबा सापडला. हा घ्या.’’ असं म्हणत त्यानं तो डबा गुरुजींच्या हातात दिला. पण गुरुजी आज निराळ्याच भावावस्थेत होते. त्यांना भव्य संपुष्टातल्या दिव्य शाळिग्रामाची अनुभूती आली होती. त्यांनी तो डबा घेतला नि ‘आता याची गरज नाही’ असं म्हणत अथांग समुद्रात दूर भिरकावून दिला. इतरांना याचा अर्थ कळला नाही. असो.

मधल्या सुट्टीसाठी डबा (टिफिन) हा घरोघरी सकाळी होणारा गरमागरम विषय. अगदी ‘डबा कुठंय? तुमच्या मुलीनं वेंधळीनं काल आणलाच नसेल.’ ‘ती तुझीही मुलगी आहे ना? बावळट कुठली?’ असे प्रीतिसंवाद चालू असताना ती स्मार्ट मुलगी म्हणते, ‘‘मम्मी, तुझं लक्ष कुठंय? मी तुझ्यासमोर गेली पाच मिनिटं हातात डबा घेऊन उभी आहे.’’ – तर असं गमतीदार वगनाट्य घराघरांत सुरू असतं, ज्याचा शेवट नेहमी खळखळाटी हसण्यात होतो.

चमत्कार वाटाव्यात अशा असामान्य गोष्टी करणार्‍यांत मुंबईच्या सामान्य ‘डबेवाल्यां’चा समावेश अग्रक्रमाने होतो. शेजारच्या एकदोन गावांतून येणार्‍या या साध्याभोळ्या, बर्‍याचशा निरक्षर डबेवाल्यांना ‘आयएसओ’ हा आंतरराष्ट्रीय सन्मान दिला गेला. कारण त्यांच्याकडून होणार्‍या दहा लाख डब्यांच्या देवघेवीत (नेण्या-आणण्यात) एखादीच चूक होण्याची शक्यता असते. जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात यावर संशोधन करण्यात येऊन ‘मॅनेजमेंट’च्या विद्यार्थ्यांना (एमबीए) या डबेवाल्यांचं आदर्श उदाहरण दिलं जातं. याच्यावर या साध्याभोळ्या डबेवाल्यांची प्रतिक्रिया- ‘‘अवो, तुमी ज्याला ‘पूर्णब्रह्म’ म्हणता त्या डब्यातील ‘अन्नाला’ त्याच्या भुकेल्या लेकराकडं पोचवायला नको?’’ ‘‘अवो, विठोबा अठ्ठावीस युगं थांबेल, पण पोटोबाला मात्र अठ्ठावीस मिनिटंही थांबवायला नको. खरं ना?’’- या उद्गारांवर एकच कृती शक्य आहे- कृतज्ञ सलाम! नव्हे प्रणाम!

एका शाळेतला प्रसंग. दोन छोटे मित्र मधल्या सुट्टीत डबा खायला बसणार इतक्यात एकाच्या लक्षात येतं की आपण डबा आणायलाच विसरलो! यावर दुसरा म्हणतो, ‘‘माझ्या आईनं डब्यात दोन लाडू दिलेत. एक तुला घे!’’ दोघांकडे पाहत असलेल्या बाईंचे डोळे पाणावतात… अनेक वर्षांनंतर ते दोघे मित्र अचानक भेटतात. ज्यावेळी एकजण दुसर्‍याला त्या दिवशीच्या लाडवाची (लाडूची) आठवण करून देतो, तेव्हा लाडू देणारा तो प्रसंग विसरून गेलेला असतो; पण घेणार्‍याच्या स्मृतिमंजूषेत (म्हणजे डब्यात) तो लाडू अजून ताजा असतो. यालाच म्हणतात ‘त्यागातून भोग- तेन त्यक्तेन भुंजीथा!’ लोकबोलीत एक म्हण आहे ना- ‘स्वतः खाल्लेलं दुसर्‍या दिवशी शरीरातून बाहेर पडतं, पण दुसर्‍याला दिलेलं जन्मभर उरतं.’ असो.