टोनी ३ रोजी तर मडकईकर ४ रोजी कॉंग्रेसमध्ये जाणार

0
45

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यापासून काही दिवसांपूर्वी फारकत घेतलेले त्यांचे खंदे समर्थक व पणजी महानगरपालिकेचे माजी महापौर टोनी रॉड्रिग्स व उदय मडकईकर हे अनुक्रमे ३ व ४ सप्टेंबर रोजी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

उदय मडकईकर यांचा ४ सप्टेंबर रोजी ५७ वा वाढदिवस असून आपल्या वाढदिनी आमच्या राजकीय कारकिर्दीची नवी इनिंग सुरू करण्यासाठी ते कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. पणजीचे अन्य एक माजी महापौर असलेले टोनी रॉड्रिग्स हे ३ सप्टेंबर रोजी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

ह्या दोघा नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पणजी महानगरपालिकेचे अन्य एक माजी नगरसेवक दया कारापूरकर हेही कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

बाबूश मोन्सेरात यांचे एकेकाळचे निकटवर्तीय असलेल्या टोनी रॉड्रिग्स व उदय मडकईकर यांना बाबूश यांनी दूर सारल्याने ते दुखावले गेले आहेत. त्यामुळे ह्या नेत्यांनी कॉंग्रेस पक्षाचे केंद्रीय नेते व पक्षाचे गोवा निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम हे गोवा दौर्‍यावर आले असता त्यांची भेट घेऊन कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा त्यांच्याशी व्यक्त केली होती.
सध्या उदय मडकईकर यांना पणजीतून तर टोनी रॉड्रिग्स यांना ताळगाव मतदारसंघातून कॉंग्रेसची उमेदवारी देणे हे जवळ जवळ निश्‍चित झाले आहे. टोनी रॉड्रिग्स हे २००२ साली ताळगावमध्ये भाजपचे उमेदवार होते.