अमेरिकेचा काबूलमध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ला

0
46

अमेरिकन सैन्याने काल काबूलमध्ये आणखी एक हवाई हल्ला केला. या हल्ल्यात एका गाडीतून स्फोटकांसह जात असलेले आत्मघाती हल्लेखोर अमेरिकेच्या कारवाईत ठार झाले. स्फोटकांनी भरलेली कार घेऊन अफगाणिस्तानातून बाहेर पडत असलेल्या अमेरिकेच्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी हे हल्लेखोर जात होते. मात्र नेमके किती हल्लेखोर ठार झाले याची निश्‍चित माहिती मिळालेली नाही. यादरम्यान, काबूल विमानतळाजवळ रहिवासी भागात एक रॉकेट हल्लाही झाला आहे. यात दोन ठार, तर तीन जण जखमी झाले आहेत.

अमेरिकेने आत्मघाती हल्ल्यासाठी निघालेल्या दहशतवाद्यंना ठार केले. असतानाच दुसरीकडे काबूल विमानतळाजवळ रॉकेट हल्ला झाला आहे. या दोन्ही घटना वेगवगेळ्या असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अमेरिकेने द्रोनद्वारे हवाई हल्ला केला आहे. हा हल्ला एका कारमधून येणार्‍या आत्मघातकी हल्लेखोरांवर करण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. कारमध्ये अनेक आत्मघाती हल्लेखोर होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर स्फोटके होती, असे अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

तालिबान संतप्त
अमेरिकन सैन्याने केलेल्या या हल्ल्यामुळे तालिबान संतप्त झाला आहे. ३१ ऑगस्टनंतर अफगाणिस्तानमध्ये कुठलीही लष्करी कारवाई करण्याचा अधिकार अमेरिकेला राहणार नाही, असे तालिबानने म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये ३१ तारखेनंतर अमेरिकेने कुठलाही हल्ला केल्यास त्याला तालिबानकडून उत्तर मिळेल, असा इशारा तालिबानने दिला आहे.

रॉकेट हल्ल्यात दोन ठार
काबूल विमानतळ परिसरात झालेल्या रॉकेट हल्ल्यात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेल्या परदेशी नागरिकांना बाहेर काढत असतानाच हा हल्ला झाला आहे.

यामुळे काबुलमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे रॉकेट थेट घरात घुसले असून या घरात असणार्‍या दोघांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे, तर आजूबाजूला असणारे तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

नव्याने धोरण
ठरवणार ः राजनाथ

अफगाणिस्तानमध्ये गेल्या महिन्याभरात घडलेल्या घडामोडीमुळे भारताला त्या देशाबद्दलचे धोरण नव्याने ठरवण्याची गरज निर्माण झाली आहे.

काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर अमेरिकेनेही अफगाणिस्तानात द्रोन हल्ला करत आक्रमक धोरण जाहीर केले आहे. या विषयावर भारतानं आजवर सावध भूमिका घेतली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या विषयावर सरकारची भूमिका मांडताना अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक आहे. भारत सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या परिस्थितीने अनेक देशांना रणनीतीमध्ये बदल करण्यास भाग पाडले असून भारतदेखील गरज पडली तर रणनीतीमध्ये बदल करणार असल्याचे सांगितले. राजनाथ सिंह यांनी यावेळी पाकिस्तानवरही जोरदार टीका केली. दोन युद्धात झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानने दहशतवादाचा मार्ग स्वीकारला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.