‘टू जी’, ‘कोलगेट’ची मनमोहनना माहिती होती

0
169

माजी महालेखापालांकडून पर्दाफाश
अहवालातून नाव वगळण्यासाठी दबाव
सरकारी तिजोरीचे १.७६ लाख कोटी रुपयांचे नुकसान केलेल्या कुप्रसिद्ध टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या अहवालातून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव वगळण्यास आपल्यावर तीन कॉंग्रेस खासदारांनी दबाव आणला होता असा आरोप तत्कालीन महालेखापाल विनोद राय यांनी एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. यामुळे टू जी स्पेक्ट्रम व्यवहारातील निर्णयांची आपल्याला काहीच माहिती नव्हती असा दावा करणार्‍या डॉ. सिंग यांच्याबाबत शंका निर्माण झाली आहे.
कॉंग्रेस नेते कमलनाथ यांच्या इशार्‍यांकडे डॉ. सिंग यांनी दुर्लक्ष केले व वरील घोटाळा घडू दिला असा दावा राय यांनी केला आहे. डॉ. सिंग यांनी मनात आणले असते तर २ जी स्पेक्ट्रमची कंत्राटे बहाल करण्यापासून ते ए. राजा यांना रोखू शकले असते असेही त्यांनी म्हटले आहे.
कोळसा घोटाळा प्रकरणाचीही डॉ. सिंग यांना कल्पना होती. नंतर हा घोटाळा कोलगेट प्रकरण म्हणून गाजला. या घोटाळ्यामुळे सरकारी तिजोरीला १.८६ लाख कोटींचा फटका बसण्याचे राय यांनी कॅग अहवालात नमूद केले होते. आपणासह तत्कालीन वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनीही कोलगेट प्रकरणी सिंग यांना इशारा दिला होता याकडेही राय यांनी लक्ष वेधले. इशारे देऊनही सिंग यांनी काहीही केले नाही असे ते म्हणाले. २ जी घोटाळ्याच्या अनुषंगाने डॉ. सिंग आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत. कारण या प्रकरणी ए. राजा त्यांना जी पत्रे पाठवीत होते त्यांना ते उत्तरे देत असत. मात्र आपल्या पत्रांना ते उत्तरे देत नव्हते याकडेही राय यांनी लक्ष वेधले. त्यामुळे वरील घोटाळ्यासंदर्भात आपली जबाबदारी डॉ. सिंग कसे काय झटकू शकतात असा सवाल त्यांनी केला.