टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांचा तिसर्‍या दिवशीही संप सुरू

0
104

राज्यातील टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांचा टॅक्सी बंद संप तिसर्‍या दिवशी सुरूच होता. टुरिस्ट टॅक्सी आणि काळ्या पिवळ्या टॅक्सी व्यावसायिकांनी रविवारी करमळी ओल्ड गोवा येथे सभा घेऊन गोवा माईल्स ऍप रद्द होईपर्यंत संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या बुधवारपर्यंत गोवा माईल्स ऍप रद्द करावे, अशी मागणी केली आहे.
सरकारने येत्या बुधवारपर्यंत गोवा माईल्स ऍप रद्द न केल्यास गुरूवारी टॅक्सी परवाने वाहतूक खात्याला सामूहिकरित्या परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अखिल गोवा टुरिस्ट टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत यांनी दिली. दरम्यान, उत्तर गोवा रेन्ट अ कॅब असोसिएशन टॅक्सी व्यावसायिकांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारपासून १०० टक्के कारगाड्या बंद ठेवणार आहे.
टुरिस्ट टॅक्सी मालकांकडून टॅक्सी परवाने परत केल्यानंतर नव्याने टुरिस्ट टॅक्सी परवाने देण्यास विरोध केला जाणार आहे, असा इशारा टॅक्सी व्यावसायिक लक्ष्मण (बाप्पा) कोरगावकर यांनी बैठकीत बोलताना दिला आहे.

राज्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी गोवा माईल्स हा टॅक्सी ऍप रद्द करण्याच्या मागणीसाठी संप सुरू केला आहे. यामुळे राज्यात येणार्‍या पर्यटकांची गैरसोय होत आहे. सरकारने पर्यटकांच्या सेवेसाठी कदंबच्या बसगाड्या उपलब्ध केलेल्या आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी घेतलेल्या मंत्री, आमदारांच्या बैठकीत टॅक्सी व्यावसायिकांच्या संपावर विचारविनिमय केल्यानंतर टॅक्सी ऍप रद्द न करण्याचे संकेत दिले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर टॅक्सी व्यावसायिकांनी रविवारी जाहीर सभा घेऊन टॅक्सी ऍप रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे जाहीर केले.

सरकारकडून एस्मा लागू
दरम्यान, सरकारने राज्यातील टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांच्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायदा (एस्मा) लागू केला आला असून संपावरील टॅक्सी व्यावसायिकांनी त्वरित सेवेत रूजू होण्याचे आवाहन केले आहे. एस्माचे उल्लंघन करणार्‍या टॅक्सी व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सेवेत रूजू न होणार्‍या टॅक्सी व्यावसायिकांचे परवाने रद्द केले जाणार असून त्यांची नावे काळ्या यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. परवाने रद्द करण्यात येणार्‍या टॅक्सी व्यावसायिकांना परवान्यासाठी पुन्हा अर्ज करण्यास अपात्र ठरविण्यात येणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.