टी-ट्वेंटी विश्‍वचषकात खेळण्याबाबत साशंक

0
147

न्यूझीलंडचा स्टार खेळाडू रॉस टेलर याने भारतात पुढील वर्षी होणार्‍या टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेत खेळण्याबाबत साशंक असल्याचे म्हटले आहे. मागील आठवड्यात आयसीसीने यंदाची विश्‍वचषक स्पर्धा स्थगित करत २०२२ साली होणार्‍या विश्‍वचषक स्पर्धेचे हक्क ऑस्ट्रेलियाला दिले होते. क्रिकेटचे संचालन करणार्‍या जगातील सर्वोच्च संस्थेने पुढील वर्षीच्या टी-ट्वेंटी विश्‍वचषकाचे हक्क भारताकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातच रॉस टेलर याने टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर सामने खेळणारा न्यूझीलंडचा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला होता.

टेलरच्या नावावर २३२ वनडे व १०१ कसोटी सामनेदेखील आहेत. पुढील वर्षी रॉस टेलर ३७ वर्षांचा होणार आहे. वयानुसार तुमची हालचाल मंदावते. त्यामुळे तुमचे प्रशिक्षण, अनुभव व मेंदूवरील नियंत्रण महत्त्वाचे ठरते, असे कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेसाठी त्रिनिदादमध्ये असलेल्या टेलर याने सांगितले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च महिन्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यात टेलर शेवटच्या वेळी खेळला होता. यानंतर कोरोना माहामारीमुळे संपूर्ण क्रिकेटच ठप्प झाले होते. दीर्घ कालावधीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर क्रिकेटशी पुन्हा जुळवून घेणे क्रिकेटपटूंना सोपे जाणार नाही. हायस्कूलमध्ये असल्यापासून मी सातत्याने क्रिकेट खेळत आलो आहे.

क्रिकेटच्या कोणत्याही टप्प्यावर अजूनपर्यंत कधीच मी एवढी दीर्घ विश्रांती किंवा ब्रेक घेतलेला नाही. दीर्घ काळापासून दूर असलेले खेळाडू आगामी सीपीएल स्पर्धेतही कसा खेळ दाखवतात हे देखील पाहण्यास मी आतुर झालो आहे, असे टेलर याने पुढे बोलताना सांगितले.