टीम इंडियाने जिंकली टी-२० मालिका

0
77
Indian captain Rohit Sharma celebrates after scoring his century during the second T20 international cricket match between India and Sri Lanka at the Holkar Stadium in Indore on December 22, 2017. / AFP PHOTO / INDRANIL MUKHERJEE / ----IMAGE RESTRICTED TO EDITORIAL USE - STRICTLY NO COMMERCIAL USE----- / GETTYOUT

दुसर्‍या टी-२० सामन्यात भारताने लंकेचा ८८ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. कर्णधार रोहित शर्माचे घणाघाती शतक व त्याने लोकेश राहुल (८९) याच्यासह दिलेल्या १६५ धावांच्या सलामीच्या बळावर भारताने हा सामना जिंकला. टीम इंडियाने विजयासाठी ठेवलेल्या २६१ धावांचा पाठलाग करताना लंकेचा संपूर्ण संघ १७.२ षटकात १७२ धावांत गारद झाला.

भारताने विजयासाठी दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंकेची सुरुवात चांगली झाली. डिकवेला आणि थरंगाने लंकेला ३६ धावांची सलामी दिली. डिकवेला उनाडकटच्या गोलंदाजीवर २५ धावा काढून बाद झाला. त्यानंतर थरंगा आणि कुशल परेरा यांनी भारताच्या गोलंदाजांची पिसे काढताना १३.२ षटकांत संघाची धावसंख्या १४५ पर्यंत पोहोचवली. चहलने थरंगाला बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. या विकेटनंतर लंकेचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कुलदीप यादवने टाकलेले डावातील पंधरावे षटक निर्णायक ठरले. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर थिसारा, दुसर्‍या चेंडूवर कुशल व पाचव्या चेंडूवर गुणरत्ने बाद झाला. त्यामुळे ५ बाद १६१ अशी त्यांची दयनीय स्थिती झाली. त्यांच्या शेपटानेदेखील अधिक प्रतिकार केला नाही.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय श्रीलंकेच्या अंगलट आला. सलामीवीर रोहित आणि राहुलने भारताला दणदणीत सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी दीडशतकी सलामी दिली. राहुलनेही मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक ठोकले. शतकाकडे वाटचाल करत असताना राहुल ८९ धावांवर बाद झाला. त्यानंतर धोनी (२०), पंड्या (१०) झटपट धावा करण्याच्या नादात बाद झाले. श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाला. लंकेकडून प्रदीप आणि परेराने प्रत्येकी २, तर चमीराने एक बळी घेतला. भारताने टी-२०मधील आपल्या सर्वाधिक धावसंख्येची नोंद करताना ५ बाद २६० धावा केल्या. टी-२०मधील सर्वाधिक धावांचा ऑस्ट्रेलियाचा २६३ धावांचा विक्रम मोडण्याची संधी भारताला होती. परंतु, वेगाने धाव जमविण्याच्या नादात शेवटच्या काही षटकांत गडी गमावल्याने ही संधी हुकली. परंतु, भारताने आपला यापूर्वीचा २४४ धावांचा (विरुद्ध विंडीज, २०१६) विक्रम मागे टाकला.

धावफलक
भारत ः रोहित शर्मा झे. धनंजया गो. चमीरा ११८ (४३ चेंडू, १२ चौकार, १२ षटकार), लोकेश राहुल झे. डिकवेला गो. प्रदीप ८९, महेंद्रसिंग धोनी त्रि. गो. परेरा २८, हार्दिक पंड्या झे. समरविक्रमा गो. प्रदीप १०, श्रेयस अय्यर पायचीत गो. परेरा ०, मनीष पांडे नाबाद १, दिनेश कार्तिक नाबाद ५, अवांतर ९, एकूण २० षटकांत ५ बाद २६०
गोलंदाजी ः अँजेलो मॅथ्यूज २.२-०-१६-०, दुष्मंथ चमीरा ४-०-४५-१, नुवान प्रदीप ४-०-६१-२, अकिला धनंजया ३.४-०-४९-०, थिसारा परेरा ४-०-४९-२, चतुरंग डीसिल्वा १-०-१६-०, असेला गुणरत्ने १-०-२१-०
श्रीलंका ः निरोशन डिकवेला झे. पंड्या गो. उनाडकट २५, उपुल थरंगा झे. व गो. चहल ४७, कुशल परेरा झे. पांडे गो. कुलदीप ७७, थिसारा परेरा झे. पंड्या गो. कुलदीप ०, असेला गुणरत्ने यष्टिचीत धोनी गो. कुलदीप ०, सदीरा समरविक्रमा यष्टिचीत धोनी गो. चहल ५, चतुरंग डीसिल्वा त्रि. गो. चहल १, अकिला धनंजया झे. पांडे गो. चहल ५, दुष्मंथ चमीरा त्रि. गो. पंड्या ३, नुवान प्रदीप नाबाद ०, अँजेलो मॅथ्यूज जखमी (फलंदाजी केली नाही), एकूण १७.२ षटकांत सर्वबाद १७२
गोलंदाजी ः जयदेव उनाडकट ३-०-२२-१, जसप्रीत बुमराह ३-०-२१-०, कुलदीप यादव ४-०-५२-३, हार्दिक पंड्या ३.२-०-२३-१, युजवेंद्र चहल ४-०-५२-४.

रोहितचे ३५ चेंडूंत शतक
रोहित शर्मा याने पहिल्या टी-२० सामन्यातील अपयश धुवून काढताना लंकेविरुद्धच्या दुसर्‍या टी-२० सामन्यांत ३५ चेंडूंत शतक ठोकले. या कामगिरीसह त्याने दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलर याच्या सर्वांत वेगवान टी-२० आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्याच्या बाबतीत बरोबरी साधली. बांगलादेशविरुद्ध ऑक्टोबर महिन्यात मिलरने ३५ चेंडूंत शतक लगावले होते. सर्व टी-२० सामन्यांचा विचार केल्यास केवळ ख्रिस गेल (३० चेंडूंत शतक, २०१३ आयपीएल) रोहित व मिलरपेक्षा सरस आहे. आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये दोन शतके झळकावणार्‍या काही मोजक्या फलंदाजांमध्येदेखील रोहितने स्थान मिळविले.

रोहितखेरीज ख्रिस गेल, इविन लुईस, ब्रेंडन मॅक्कलम व कॉलिन मन्रो यांच्या नावे दोन शतके आहेत. डावातील सर्वांत कमी चेंडू झालेले असताना शतक पूर्ण करणार्‍यांच्या यादीत रोहितने अव्वल स्थान मिळविले. १२.२ षटकांचा खेळ झालेला असताना रोहितचे शतक झाले होते. रिचर्ड लेव्ही व मोहम्मद शहजाद यांनी १३.२ षटके असताना शतकी वेस ओलांडली होती. आपल्या ११८ धावांच्या खेळीसह रोहितने आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये भारताकडून एका डावात वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या नोंदविली. लोकेश राहुलच्या नावावर (११० धावा, वि. वेस्ट इंडीज, २०१६) हा विक्रम होता. आपल्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर रोहितने एका कॅलेंडर वर्षात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून सर्वाधिक षटकार नोंदविण्याच्या बाबतीत एबी डीव्हिलियर्स (६३ षटकार, २०१५ साल) याला मागे टाकले. यंदा रोहितने आपल्या षटकारांची संख्या ६४ केली आहे.