चेन्नईयन-ब्लास्टर्समध्ये थरारक बरोबरी

0
93
Wes Brown of Kerala Blasters FC during match 30 of the Hero Indian Super League between Chennaiyin FC and Kerala Blasters FC held at the Jawaharlal Nehru Stadium, Chennai India on the 22nd December 2017 Photo by: Ron Gaunt / ISL / SPORTZPICS

हीरो इंडियन सुपर लडगमध्ये चेन्नईयीन एफसी आणि केरला ब्लास्टर्स एफसी या दक्षिणेतील दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील थरारक झुंज १-१ अशी बरोबरीत सुटली. चेन्नईने मोसमातील पहिल्या बरोबरीसह आघाडी संपादन केली.
नेहरू स्टेडियमवरील लढत गोलशून्य बरोबरीत सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती, पण अवघा एक मिनीट बाकी असताना चेन्नईच्या फ्रान्सिस्को फर्नांडीसने नेटच्या दिशेने मारलेला चेंडू अडविण्याच्या प्रयत्नात ब्लास्टर्सच्या संदेश झिंगनकडून चूक घडली. त्याने हात वर केला, पण चेंडू त्याच्या हाताजवळ लागला. त्यामुळे पंचांनी झिंगनला पिवळे कार्ड दाखविताना चेन्नईला पेनल्टी किक बहाल केली. त्यावर दहा नंबरची जर्सी घालणार्‍या स्लोव्हेनियाच्या रेने मिहेलीच याने अचूक लक्ष्य साधले. त्याने काही मिनिटांपूर्वी जायबंदी झालेला ब्लास्टर्सचा गोलरक्षक पॉल रॅचुब्का याला चकविले.

त्यानंतर चार मिनिटांचा भरपाई वेळ (इंज्यूरी टाईम) सुरु झाला. त्यात अखेरच्या मिनिटाला झिंगनने आधीच्या चुकीची भरपाई केली. त्याने नेटच्या उजवीकडे झेप टाकत विलक्षण पास दिला. डाव्या बाजूने धाव घेतलेल्या सी. के. विनीत याने या संधीचे सोने केले. विनीतला कुणीच मार्कर नव्हता. याचा फायदा विनीतसारख्या दर्जेदार खेळाडूने उठविला आणि चेन्नईचा गोलरक्षक करणजीतला चकविले. ब्लास्टर्सने प्रतीआक्रमण रचण्याचे कौशल्य प्रदर्शित करीत एक गुण खेचून आणला.
चेन्नईयीनने सात सामन्यांत १३ गुणांसह आघाडी घेतली. चेन्नईने प्रत्येकी १२ गुण असलेल्या गोवा आणि बेंगळूरू यांना मागे टाकले. चेन्नईने चार विजय, एक बरोबरी आणि दोन पराभव अशी कामगिरी केली आहे. ब्लास्टर्स सहा सामन्यांतून सात गुणांसह सातव्या स्थानावर आहे.