झुआरी पूल सुरक्षित असल्याची मंत्री ढवळीकरांची ग्वाही

0
84

>> नागरिकांनी अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन

झुवारी पूल सुरक्षित असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल शिरोडा येथील एका कार्यक्रमप्रसंगी प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना केला.
झुवारी पुलाचे एक छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर झुवारी पूल असुरक्षित बनल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना मंत्री ढवळीकर म्हणाले की, झुवारी पूल जुना झालेला असला तरी वाहतुकीसाठी सुरक्षित असून बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. सोशल मिडियावर झुवारी पुलाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी पुलावर जाऊन पाहणी केली आहे, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.

पंचवाडीत जल शुद्धीकरण
प्रकल्पाचे उद्घाटन
पंचवाडी येथील म्हैसाळ धरणावरील नवीन १० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते काल करण्यात आले आहे.
या प्रकल्पाच्या बांधकामावर सुमारे ५३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. वर्ष २०१२ मध्ये या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. विविध कारणामुळे या जल शुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास तीन वर्षे उशीर झाला, अशी माहिती बांधकाम खात्याच्या सूत्रांनी दिली.
या नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे शिरोडा मतदारसंघातील पंचवाडी आणि शिरोडा पंचायत क्षेत्रातील पाणी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती मंत्री ढवळीकर यांनी दिली.

सांगे भागातील पाणी समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जात आहे. अंदाजे २३ कोटी रूपये खर्चून सांगे ते नेत्रावळी दरम्यान नवीन जलवाहिनी घातली जाणार आहे. तसेच नेत्रावळी येथे नवीन ५ एमएलडी जलशुध्दीकरण प्रकल्पाचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती मंत्री ढवळीकर यांनी दिली.
या कार्यक्रमाला स्थानिक आमदार सुभाष शिरोडकर, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी डॉ. तारीक थॉमस, सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंत्ता उत्तम पार्सेकर आदी उपस्थित होते. मंत्री ढवळीकर यांना यावेळी पंचवाडी, शिरोडा या भागातील बेकार युवकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी युवकांनी केली.