झिंबाब्वेकडून अफगाणचा १३१ धावांत खुर्दा

0
145

जलदगती गोलंदाज मुझाराबानी व एन्याउची यांच्या भेदक मार्‍याच्या बळावर झिंबाब्वेने अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वर्चस्व प्रस्थापित केले. अफगाण संघाचा डाव अवघ्या १३१ धावांत संपवून त्यांनी दिवसअखेर ५ बाद १३३ धावा करत आघाडी घेतली आहे.
दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात काल अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली.आघाडी फळीतील फलंदाज अब्दुल मलिक, यष्टिरक्षक फलंदाज मुनीर अहमद व अष्टपैलू अब्दुल वासी यांना अफगाण संघाने कसोटी पदार्पणाची संधी दिली.

अफगाण संघाची सुरुवात खराब झाली. कसोटीतील पहिल्याच चेंडूवर मुझाराबानी याने पदार्पणवीर मलिकचा त्रिफळा उडविला. या सुरुवातीच्या धक्क्यातून अफगाण संघ शेवटपर्यंत सावरला नाही. त्यांच्याकडून यष्टिरक्षक फलंदाज अफझर झाझाय याने सर्वाधिक ३७ तर सलामीवीर इब्राहिम झादरानने ३१ धावांचे योगदान दिले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना झिंबाब्वेची ४ बाद ३८ अशी केविलवाणी स्थिती झाली होती. पण, अनुभवी शॉन विल्यम्स (नाबाद ५४) व अष्टपैलू सिकंदर रझा (४३) यांनी पाचव्या गड्यासाठी ७१ धावांची भागीदारी करत संघाची रुळावरून घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणली. नाबाद जोडीवर झिंबाब्वेची मदार असून यष्टिरक्षक फलंदाज रेजिस चकाब्वा व अष्टपैलू तिरिपानो यांच्याकडूनही झिंबाब्वेला उपयुक्त योगदानाची अपेक्षा असेल.

धावफलक
अफगाणिस्तान पहिला डाव ः अब्दुल मलिक त्रि. गो. मुझाराबानी ०, इब्राहिम झादरान झे. मुसाकांदा गो. एन्याउची ३१, रहमत शाह झे. चकाब्वा गो. मुझाराबानी ६, मुनीर अहमद झे. रझा गो. एन्याउची १२, हशमतुल्ला शाहिदी त्रि. गो. एन्याउची ५, अफसर झाझाय झे. चकाब्वा गो. तिरिपानो ३७, असगर अफगाण झे. चकाब्वा गो. मुझाराबानी १३, अब्दुल वासी झे. कासुझा गो. रझा ३, आमिर हमझा नाबाद १६, यामिन अहमदझाय झे. तिरिपानो गो. विल्यम्स १, झहीर खान झे. विल्यम्स गो. मुझाराबानी ०, अवांतर ७, एकूण ४७ षटकांत सर्वबाद १३१ गोलंदाजी ः ब्लेसिंग मुझाराबानी १२-३-४८-४, व्हिक्टर एन्याउची १०-१-३४-३, डोनाल्ड तिरिपानो १२-५-२४-१, रायन बर्ल ७-१-९-०, शॉन विल्यम्स ३-२-४-१, सिकंदर रझा ३-०-८-१.

झिंबाब्वे पहिला डाव ः प्रिन्स मासावुरे पायचीत गो. हमझा १५, केविन कासुझा त्रि. गो. अहमदझाय ०, तरिसाय मुसाकांदा त्रि. गो. हमझा ७, शॉन विल्यम्स नाबाद ५४, वेस्ली माधेवेरे पायचीत गो. हमझा ०, सिकंदर रझा झे. मलिक गो. हमझा ४३, रायन बर्ल नाबाद ८, अवांतर ६, एकूण ३९ षटकांत ५ बाद १३३
गोलंदाजी ः यामिन अहमदझाय ९.१-२-२०-१, आमिर हमझा १७-१-६१-४, झहीर खान ९-०-३६-०, अब्दुल वासी ३.५-०-११-०