ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र नागवेकर यांचे निधन

0
4

कोकणी व मराठी लेखक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि एमईएस महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. हरिश्चंद्र तुकाराम नागवेकर यांचे काल पहाटे कोंब-मडगाव येथील निवासस्थानी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. सायंकाळी मडगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नागवेकर यांचे कोकणी, मराठी, हिंदी, पोतुगीज या भाषांवर प्रभुत्व होते. वास्को महाविद्यालयात 27 वर्षे व्याख्याते आणि त्यानंतर ते 4 वर्षे प्राचार्य होते. त्यांनी मराठीत मोरपिसे (निबंध संग्रह), आस्वादन (समीक्षात्मक लेखसंग्रह), कौल (जनमत कौलावर पुस्तक) ही पुस्तके लिहिली. त्याशिवाय अनेक पुस्तकांचे त्यांनी कोकणीत अनुवाद केले. कुंकळ्ळीचे लिंगू दळवी यांनी पोर्तुगीज भाषेत लिहिलेल्या हिस्ट्री ऑफ कुंकळ्ळी या पुस्तकाचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला होता. ते गोमंत कालिका मासिकाचे संपादक होते. अनुवादासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. तसेच कुळागर पुरस्कार व गोवा सरकारचा कलागौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता.

काल आमदार दिगंबर कामत, आमदार विजय सरदेसाई, काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, एम. के. शेख, माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो, पत्रकार, कोकणी क्षेत्रातील मान्यवरांनी घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, विवाहित कन्या असा परिवार आहे.