गेल्या दहा वर्षांपासून ते अस्नोडा कैलासनगर येथील घरात राहत होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी लक्ष्मी, मुले जितेंद्र, नितीन, मुलगी संगीता, दोन भाऊ शशिकांत व गुरुदास तीन बहिणी व नातवंडे असा परिवार आहे.
नानांच्या निधनाचे वृत्त समजताच गोव्याच्या कानाकोपर्यातून त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी भजनी कलाकार व संगीतप्रेमी नागरिकांनी रीघ लागली होती. दुपारी ३ वा. कैलासनगर येथील मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नानांचा जन्म ९ नोव्हेंबर १९३८ साली पिसुर्ले-सत्तरी येथे त्यांच्या आजीच्या घरी झाला. लहानपणापासून वडील ख्यातनाम भजन कलाकार मनोहरबुवा शिरगावकर यांच्याकडे त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले. जन्मजात कलेचा वारसा लाभलेल्या नानांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून प्रतिभेची झलक दाखवायला सुरुवात केली. हार्मोनिअम, तबला, पखवाज, व्हायोलीन या वाद्यांचे शिक्षण त्यांनी मळवले होते.
अविश्रांत परिश्रम, रियाज करण्याची विशिष्ट पद्धत व सतत चांगले आचरण, आचार विचार यांच्या बळावर नानांनी अवघ्या कालावधीत मोठे यश संपादन केले.गोव्याच्या कानाकोपर्यात भजनाची कला वृद्धिंगत करण्यासाठी मनोहरबुवांनंतर नानांनी दिलेले योगदान महान आहे. त्यांनी गावागावांत हजारो भजनी कलाकार घडवले. हजारो संगीत नाटकांना साथसंगत करताना उत्तम संगीत दिग्दर्शक म्हणून शेकडो बक्षिसेही मिळवली. नाट्यसंगीताच्या क्षेत्रात एक हुकमी व मातब्बर संगीतकार म्हणून त्यांचा परिचय आहे. एक मितभाषी, अजातशत्रू, मित्र जोडणारा अशी त्यांची ओळख होती.
गायनाबरोबरच नानांनी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. मल्लिकार्जुन मन्सुर, पं. राजाभाऊ मराठे, पं. प्रभाकर कारेकर, अजित कडकडे, अरविंद पिळगावकर, नारायण बोडस, शरद जांभेकर, भार्गवराम आचरेकर, राजा काळे, आशा खाडिलकर, पद्माकर कुलकर्णी, उदय राजबोडे, प्रकाश घांगरेकर अशा नामवंत गायक-गायिकांना त्यांनी संवादिनीची साथ केली आहे.
पर्यटन मंत्री नीळकंठ हळर्णकर, ऍड. उदय भेंब्रे, कला अकादमीचे सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई, आमदार अनंत शेट, राजेश पाटणेकर, उपेंद्र गावकर, सोमनाथ च्यारी, वामनराव पिळगावकर, कृष्णा माशेलकर, कांता घाटवळ, मधुसुदन थळी, मोहनदास पोळे, दिगंबर नाईक, रवींद्र नाईक, संजय धूपकर, विद्याधर शिरोडकर, तुळशीदास नावेलकर, उल्हास वेलिंगकर, रुपेश गावस, सुदत्त फडते आदींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
मुख्यमंत्र्यांनी आपल्यावतीने नानांच्या पार्थिवावर वाहण्यासाठी पुष्पचक्र पाठविले होते. गोवा एका ख्यातनाम कलाकारास मुकल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी नानांच्या जाण्याने एक परिपूर्ण सच्चा माणूस गेल्याची खंत व्यक्त केली.
कला अकादमीला दु:ख
कला अकादमीच्यावतीने नाना शिरगावकर यांच्या पार्थिवावर कला अकादमीचे सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. कला अकादमीच्या संगीत विभागातही दोन मिनिटे स्तब्धता पाळून नानांच्या स्मृतीस वंदन करण्यात आले.
कला अकादमीचे अध्यक्ष प्रतापसिंग राणे यांनीही नानांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मनोहरबुवा शिरगावकरांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ कला अकादमीने सुरू केलेल्या भजन स्पर्धा, कार्यशाळा व अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने नाना शिरगावकरांचे कला अकादमीशी असलेले स्नेहसंबंध अधिकाधिक दृढ होत गेले होते. अनेक उपक्रम राबविण्यामध्ये नानांचे सक्रिय सहकार्य कला अकादमीला मिळाले होते. त्यांच्या निधनाने कला क्षेत्रातील आणि विशेषत: भजन कलेच्या क्षेत्रातील एक विनयशील मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दांत श्री. राणे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
भाजपाची आदरांजली
भाजपनेही शिरगावकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी नाना शिरगावकर यांना श्रद्धांजली अर्पित करताना ‘मनोहारी’ संगीत प्रभावळीतील मुकुटमणी हरवल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. वडलांचा सांगितिक वारसा नानांनी समर्थपणे पुढे नेला असे त्यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनीही नानांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. गोव्याच्या भजन परंपरेला स्व.मनोहरबुवांनी नवा आयाम दिला. नानांनी ही परंपरा अधिक ठाशीव बनवली असे त्यांनी म्हटले आहे.
विष्णू वाघ यांनी म्हटले आहे की, नाना गोव्याचे ‘भजन गंधर्व’ होते. संतांचे अभंग हे केवळ गाण्यासाठी नसतात त्यातील शब्दांमागील भावार्थ गायकाने समजून घ्यायचा असतो ही नानांची धारणा होती, असे त्यांनी म्हटले आहे.
गोमंतक मराठी अकादमीची श्रद्धांजली
नाना शिरगावकर यांच्या निधनाबद्दल गोमंतक मराठी अकादमीनेही दु:ख व्यक्त केले आहे. गोव्याच्या भजन गायन परंपरेतील सम्राट म्हणून गणले गेलेले शिरगावकर यांनी गोवा मुक्तीनंतर संगीत क्षेत्रात गोव्यात आपला एक वेगळा ठसा उमटविला होता, असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन १ मार्च १९९७ रोजी गोमंतक मराठी अकादमीचे मानद अधिसदस्यत्व देऊन त्यांचा यथोचित गौरव केला होता. गोमंतक मराठी अकादमीने आयोजित केलेल्या तिसर्या अखिल गोमंतक भजन संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.