ज्येष्ठ चित्रपट अभिनेते दिलीपकुमार यांचे निधन

0
37

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार (९८) यांचे काल बुधवारी दि. ७ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. दिलीपकुमार यांच्या पश्चात पत्नी सायरा बानो आहेत. दिलीपकुमार यांना दि. २९ जून रोजी इस्पितळात दाखल करून उपचार सुरू केले होते. परंतु त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही व काल बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

बुधवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. दिलीपकुमार यांच्या पत्नी सायरा बानोदेखील स्मशानभूमीत उपस्थित होत्या. दिलीपकुमार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन स्मशानभूमीत उपस्थित होते.

दिलीपकुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसुफ खान होते. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी अविभाजित भारतातील पेशावर येथे झाला होता. एका निर्मात्याच्या सांगण्यावरून त्यांनी आपले नाव बदलले व त्यानंतर ते दिलीपकुमार म्हणून ओळखले जाऊ लागले. १९४४ मध्ये ‘ज्वार भाटा’ चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपट रसिकांना दिले. ‘जुगनू’ हा दिलीपकुमार यांचा पहिला हिट सिनेमा होता.

आठवेळा फिल्मफेअर पुरस्कार
दिलीपकुमार यांना आठ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. दिलीपकुमार यांना पद्मभूषण, पद्मविभूषण तसेच दादासाहेब फाळके या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींकडून शोक
सिनेसृष्टीतील एक आख्यायिका म्हणून दिलीपकुमारजी यांची आठवण कायम राहील. त्यांना अद्वितीय प्रतिभेचा आशीर्वाद मिळाला होता, त्यामुळेच अनेक पिढ्यांचे दर्शक मंत्रमुग्ध झाले. त्यांचे निघून जाणे आपल्या सांस्कृतिक जगासाठी एक क्षती आहे. असे आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.