ज्येष्ठांनी कसे जगावे?

0
792

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी
नी कसे जगावे… या विषयावर आम्ही बोलत होतो. मागल्या लेखात ज्येष्ठांनी वेळ कसा घालवावा यावर बोललो. खरे म्हणजे वय झाल्यावर घड्याळाचे काटे अचानक बंद होतात– कारण आपण रिटायर होतो. साठी ओलांडली असते. अंकल ही हाक मारण्यापेक्षा कुणी तुम्हाला आजोबा, आबा म्हटले तरी वाईट वाटून घेऊ नका! कारण आम्हीही आमच्या बाळपणात कुणा एका ज्येष्ठाला आजोबा अशी हाक जरूर मारली असणारच!
वेळ घालवण्याची पद्धत गावात व शहरात वेगवेगळी असते. गावात तर काहीच सोय नसते. कट्‌ट्यावर किंवा पारावर ज्येष्ठ नागरिक बसलेले असतात. केव्हा केव्हा त्यांना बसायला जागाच नसते. सकाळी दहाच्या दरम्यान बसस्टॉपवर ही सगळी बसलेली असतात. एरवी गावात जे बसस्टॉप बांधले जातात त्याच्या बाकड्यांवर आजवर कुणी बसलेले मी तरी बघितले नाही. कारण गावात बसच जात नसेल तर बसस्टॉपची गरज ती कोणती? पण छे! सरकारी योजना म्हटल्यावर ते पैसे त्यावरच खर्च करायला हवेत. अशा या बसस्टॉपवर ही माणसे गोळा होतात. वेळ सकाळची १० ते ११.३० व संध्याकाळी ५ ते ७ पर्यंत. म्हणजे दिवसाचे फक्त चारच तास ही माणसं एकत्र बसतात, बोलतात… आपला वेळ घालवतात.. आणखी कोणतीही योजना त्यांच्याकरता बनवत नाही. गावात वाचनालय जर असले तर नशीब! पण त्यांत पुस्तकं मिळणे दुरापास्तच असते. चार पेपर… कोणत्यातरी टेबलावर पडलेले असतात. गावात पेपर वाचणारी व पुस्तकं वाचणारी माणसे क्वचितच आढळतात.
अशा या कट्‌ट्यावर किंवा स्टॉपवर पाच-सहा माणसं बसलेली असतात. चर्चा चालू असते. कुणी कोपर्‍यात धूर काढत बसलेला असतो..! सिगरेटवर सिगरेट तो फुंकत असतो. कुणी गुटखा तर कुणी गावठी… कुणी डोळे लाल करत साईडला पहुडलेला असतो… रात्री घेतलेली अजून उतरलेली दिसत नाही! हे गावातले चित्र आपल्या डोळ्यांसमोर येते. मग ही वय वाढलेली… निकामी झालेली लोकं करणार तरी काय? या लोकांनी आपला वेळ कसा घालवावा?…
मी एका वृद्ध माणसाला नेहमी बघतो. सकाळी नऊच्या दरम्यान तो रानात जातो… त्याच्या हातात कोयता असतो व तोंडात विडी घेऊन तो निघतो. तास-दोन तासात त्याच्या डोक्यावर लाकडाची मोळी असते. झेपेल तेव्हढीच!
कारण या माणसाच्या हातात बळ राहिलेले नाही. शरीर थकलेय… सत्तरी ओलांडून गेलेली… एरवी घरात बसून रहायचे वय… पण घरात कुणी बसू देत नाही. दिवसा एक मोठी आणली तरच चहा व जेवण! मी त्याला विचारले, तो म्हणाला ‘मला घरी कुणी फुकटचे खायला घालत नाही’!
काल मला एक म्हातारा बाजारात भेटला. दुपारचे बारा वाजले होते. विचारत होता -‘गणपतीचे विसर्जन केव्हा होणार?…’ गणपती कुठे आहे? ऐन शिमग्यात गणपतीला शोधणारा म्हातारा स्वतःला शोधत होता. हात-पाय हलवायला बाजारात जाऊन पेपर आणायचा. पण वयाची पंच्याहत्तरी उलटून गेल्यावर… रस्त्यावर चालणे म्हणजे भयानक; कुणी.. केव्हा.. तुमच्यावर गाडी घालेल.. सांगता यायचं नाही.
तर.. गावात वेळ घालवायच्या काहीच सोयी नसल्याने माणसे व्यसनाधीन होतात. तरुणपणी कामधंदा असल्याने… अंगात बळ असल्याने माणूस कमावतो. पैशांची आवक असल्यास व्यसने जडतात. तो दारू प्यायला लागतो. गुटखा, तंबाखू चघळतो. सिगरेट, विड्या फुंकत बसतो. हीच व्यसने वयाबरोबर वाढत जातात. शरीर थकते. रोग लागतात. मग ते अंथरुणावर पडतात.
अडगळीच्या खोलीत ठेवलेल्या जुन्या सामानाबरोबर याचीही वळकटी पडलेली असते. मग हे मरेपर्यंत असे. केवळ मरणच त्यांची सुटका करते. असे हे गावात घडते. गावातल्या सरकारी संस्थांनी व इतर संस्थांनी यावर विचार करावा. ज्येष्ठांची काळजी घ्यावी. त्यावर उपाययोजना कराव्यात.
त्यांची बसण्याची सोय करावी. कुणाला सकाळी-संध्याकाळी चालायची सवय असेल तर त्यांना चालायला (वॉकिंग) जागा करावी. सार्वजनिक ठिकाणी टीव्हीची सोय करावी. कॅरम टेबलटेनिस, पत्ते खेळायला जागा तयार करावी. केव्हा केव्हा ज्येष्ठांनी आपली सोय आपणच करून घ्यावी! आजकाल कुणालाही कुणाची पर्वा नाही. तर ज्येष्ठांनी काय करावे… कसे जगावे..!
त्यांनी संघटित व्हावे. स्वतःकरता स्वतःला जपावे. योग्य रीतीने..! स्वतःपासून व्यसनांना दूर ठेवावे. मला माझ्या एका डॉक्टरांचे नेहमीच कौतुक वाटते… तीस-चाळीस वर्षे हा माणूस सिगरेटी फुंकत होता… अगदी दिवसा १ ते २ पॅकेटं… पण ज्या दिवशी रिटायर झाला… त्या दिवसापासून त्याने सिगरेटची साथ सोडली. सरकारी नोकरीतून रिटायर झाल्यावर पेंशनवर आला. वरवरचा खर्च त्याने कमी केला. कुणीतरी गोव्यातल्या ज्येष्ठांना सल्ला दिला पाहिजे. त्यांना समुपदेशनाची गरज आहे. अंगावरची ठिगळं लपवत अनवाणी जाणार्‍या बायका-पुरुषांना सल्ला कोण देणार..? विचार करा.
चला तर मग आम्ही शहरात जाऊ. शहरात तर चांगलीच रेलचेल! वेगवेगळ्या स्तरावरील लोक आपापली काळजी घेतच असतात. आम्ही मध्यमवर्गीय लोकांचीच काळजी घेऊ. शहरात ज्येष्ठांकरता सोयी आहेत.
= वाचन करणारी माणसे आहेत.
= माणसे योगा क्लासला जातात.
= रामदेवबाबांची सगळी साधने वापरतात. आता तर बाबांनी दुकाने थाटलीत. तिथे साबणापासून अंगाला लावायचे भस्मपण मिळते. कुणी ते वापरतात म्हणून तुम्ही त्यांचे चेले बनू नका. करता ते विचारपूर्वक करा.
= करमणुकीचे कार्यक्रम तर चालूच असतात. ज्याप्रकारे तुम्ही तुमची करमणूक करून घेऊ इच्छिता त्या प्रकारे ती होऊ शकते.
= सकाळी मॉर्निंग वॉकची माणसे तर झपाझप चालत असतात. दिवसभर पोट फुटेपर्यंत खाणार. मग आपल्या पोटाचा घेर कमी करण्यासाठी.. पायाखालची जमीन हलवत चालत राहणार!
यासाठी ज्येष्ठांनी कसे जगावे, काय करावे हे समजून घेणे त्यांच्या हिताचे आहे…
१) लवकरात लवकर आपल्याकडे असलेल्या पैशांचा आढावा घ्यावा. ती पुंजी कुठल्यातरी सरकारी बँकेत ठेवावी. घरी त्याची नोंद करावी. कुणाच्याही आमिषाला बळी न पडता ठेव सुखरूप ठेवावी. पैशांची गरज भासली तर मासिक पैसे मिळण्याची सोय करावी. हातात किंवा खिशांत पैसे खेळत असतील तर सगळे तुमच्या अवती-भवती भुतांसारखे पिंगा घालतात.
= कुणालाही उसने पैसे देऊ नका.
= प्रॉपर्टी असेल तर मृत्युपत्र(विल्) करा. मुलाबाळात वाटणी करा. तुमच्याकरता पैसे ठेवल्यावर हे करा. आपल्याकडचे पैसे दुसर्‍याकडे देऊन टाकायचे आणि मग तो आपल्याला भाकर टाकणार… ती खावून तुम्ही राहणार का?
= कुणावरही विश्‍वास ठेवू नका. पानिपतच्या लढाईअगोदरच लोकांचा दुसर्‍यावरचा विश्‍वास उडाला होता.
= स्वतःच्या आजाराची काळजी घ्या. आजार असतील तर त्यावरच्या गोळ्या नियमितपणे घ्या.
= डोळे, दात आणि शरीराची वरचेवर तपासणी करून घ्या.
= योग्य तोच आहार घ्या. लग्नकार्याला खाताना विचार करा. मधुमेहाचे रोगी घरी गोड मिळत नसल्याने खादाडासारखे गोडधोड खात असतात. तसे करू नका. स्वतः स्वतःला फसवू नका.
= घरातल्या लोकांचे ऐका. मान्य आहे, एक वेळी ते तुमचं ऐकत होते. आज त्यांचे तुम्ही ऐका.
= कमी बोला. न बोलले तरी चालेल. कारण कुणीही तुमचे ऐकणार नाही.
= दिवसा झोपू नका. मग रात्री झोप येणार नाही!
= नीट चालता येत नसेल तर हातात काठी घ्या. लाज वाटते का? म्हातारपणी सावरण्यासाठी कुणी हात दिलेला चालत नाही. जमत नसले तरी ते स्वतःची कामं स्वतः करू इच्छितात. ते कृतीत आणणे कठीण असते. कुणाचातरी हात म्हातारपणात तुम्हाला सावरण्यासाठी असावाच लागतो.
तुम्हाला जगायला हवे असेल तर तुम्ही स्वतःला स्वतःनेच जपले पाहिजे. तुम्हाला जपणारी माणसे आहेत तर नक्कीच तुमचे बाकी राहिलेले आयुष्य सुखाचे जाईल. पण जपणारी माणसे नसतील तर जगणे दुरापास्त होऊन जाईल! जगण्यासाठी स्वतःला जपा!