… जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् |

0
297

– प्रा. रमेश सप्रे
गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानात शोभेल असे हे सूत्र आहे. सर्वं क्षणिकं क्षणिकं – ‘सर्वं दुःखं दुःखम्‌|’ सर्वच जर ‘क्षणिक’ आहे तर आमची जीवनं वर्षानुवर्षे चालतात ते कसं? ..अन् सर्वच ‘दुःखमय’ असेल तर जीवनाचे सुखाचे अनेक क्षण व प्रसंग येतात ते कसे? …सामान्य माणसाच्या मनात असे प्रश्न उभे राहणं साहजिक आहे, त्याला कारण खोलात जाऊन विचार न करता वरवर, उथळ विचार करणं हेच आहे.
‘क्षणिकं’ म्हणताना आद्यशंकराचार्यांच्या ‘मिथ्या’ या शब्दाची आठवण येते. दोन्ही शब्दांचा अर्थ आहे अनित्य, क्षणाक्षणाला पालटणारं आणि एका क्षणी भग्न होऊन जाणारं (मृत होणारं) म्हणजेच ‘क्षणभंगूर’!
या जगात, प्रपंचात, संसारात नित्य जर काही असेल तर तो म्हणजे आत्मा किंवा परमात्मा. पण हा दिसत नाही. त्याचा अनुभव मात्र येतो. असो.‘जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् |’१३.८
अनेक पदं असलेली गीतेतील श्‍लोकाची ही ओळ नाही. तर एखादी मालगाडी (गुड्‌स ट्रेन) अनेक डब्यांची असते त्याप्रमाणे सोळा अक्षरांचा एक मोठा शब्दच… अर्थ मात्र अगदी सोपा. जीवन (जन्म) मरण (मृत्यू) म्हातारपण आजार या सार्‍यातील दुःखाचं अखंड चिंतन (अनुदर्शन) करत राहिलं पाहिजे. यामुळेच प्रपंचातील काहीही (वस्तू-व्यक्ती-संबंध-कर्तव्यं) न सोडता त्यातून सुटणं (वैराग्य) शक्य होतं.
इथं भगवंतांना दर्शन म्हणजे चिंतन, विचारमंथन असं सुचवायचंय. प्रपंचातील सर्व भोगात, देहाच्या माध्यमातून येणार्‍या सर्व अनुभवात दुःखच कसं भरलेलं आहे याचा सतत विचार करत राहणं हे खरं वैराग्य किंवा संन्यास यासाठी आवश्यक आहे.
गौतम बुद्धाच्या जीवनातील एक प्रसंग या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. या प्रसंगापासूनच सिद्धार्थ गौतमाचा ‘बुद्ध (ज्ञानी-आत्मज्ञानी)’ बनण्याकडचा प्रवास सुरू झाला.
आपला मुलगा एक चक्रवर्ती सम्राट तरी होईल किंवा युगप्रवर्तक संन्यासी तरी होईल अशी भविष्यवाणी राजज्योतिषांकडून ऐकल्यापासून राजा शुद्धोदन अस्वस्थ असायचा. मंत्र्यांचा सल्ला घेऊन मुलानं सम्राटच व्हावं यासाठी सारी व्यवस्था त्यानं गौतमाच्या जन्मापासूनच केली. चिंतन करण्यासारखी ही घटना आहे.
असं म्हटलं जातं की राजकुमार सिद्धार्थाला ‘दुःखाचं दर्शनच’ होऊ नये म्हणून राजवाड्याच्या भोवती तटबंदी केलेली. वास्तवातलं दुःखमय जग त्या उंच भिंतींच्या पलीकडे राहील याची काळजी शुद्धोदन कटाक्षानं घेत होता. देहाचं सुख, भोग यातून सत्ता, संपत्ती, राज्य यांच्याबद्दलची गौतमाची ओढ वाढेल असा पिता म्हणून त्याचा विचार होता. पण नियती निराळाच डाव मांडत होती.
एके दिवशी आपला प्रिय सारथी चन्न याला सिद्धार्थानं राजवाड्याबाहेरचं जग दाखवण्याचा आग्रह केला. त्यावेळी सिद्धार्थ मोठा झाला होता. त्याचा यशोधरा नामक राजकन्येशी विवाह होऊन पुत्ररत्नही – राहूल- जन्मलं होतं.
बाहेर पडल्यावर सिद्धार्थाला एक रोगी दिसला जो खोकत खोकत थांबत थांबत चालत होता. सिद्धार्थानं विचारलं, ‘हा असा का चालतोय?’ चन्न म्हणाला ‘हा रोगी आहे.’ यावर सिद्धार्थाचा प्रश्‍न ‘मला रोग होणार?’ चन्न म्हणाला ‘सर्वांनाच रोग होतो’ यावर सिद्धार्थ विचारात पडला व म्हणाला ‘पुढे चल.’
पुढे गेल्यावर एक म्हातारी हातात काठी घेऊन वाकून चालली होती. सिद्धार्थचा प्रश्‍न, ‘ही अशी का चाललीय’.. चन्न म्हणाला, ‘कारण ती म्हातारी झालीय.’
‘मी म्हातारा होणार का?’ या प्रश्‍नाला चन्नाचं उत्तर, ‘हो सर्वजणच वृद्ध होणार.’
आणखी विचारात पडून गौतम म्हणाला, ‘पुढे चल.’ … आता त्याला एक प्रेतयात्रा दिसली. प्रेताला तिरडीवर बांधून लोक खांद्यावरून आडवं नेताना पाहून गौतम विचारतो, ‘हा असा आडवा का चाललाय? त्याला कुठे घेऊन चाललेयत.’
चन्न सांगतो, ‘हा मेलाय. याच्या प्रेताला जाळायला किंवा पुरायला हे सारे निघालेत. गौतमानं विचारल्यावर चन्न म्हणतो, ‘एक दिवस मी – तुम्ही – सारेच मरणार.’ हे ऐकल्यावर मात्र गौतमाचं विचारचक्र इतक्या वेगात फिरू लागलं की त्यानं चन्नाला रथ दुसर्‍या दिशेनं घ्यायला सांगितला. एक वृद्ध साधू अत्यंत आनंदात झाडाखाली ध्यानस्थ बसला होता. गौतम विचारतो, ‘हा कोण आहे? असा का बसलाय?’ यावर चन्नचे उद्गार – ‘हा साधू आहे. तो वृद्ध आहे, त्यालाही दुःख असणारच. पण देवाची-चैतन्याची-प्रार्थना करतोय. सदैव आनंदात- दुःखमुक्त असतो’.
गौतमाला हे पाहून, ऐकून नवल वाटलं. त्याच्या मनात विचाराचं वादळ घोंघावू लागलं. तो अस्वस्थ झाला. चन्नाला रथ राजवाड्यात न्यायला सांगितला. जीवनातील व्याधी (रोग), जरा (म्हातारपण), मृत्यू या सर्वांचं ‘दर्शन’ त्याला झालं होतं. त्याचबरोबर या सर्वांत असूनही सर्वांपासून दूर समाधि अवस्थेत असलेल्या साधूचं ‘दर्शन’ही त्याला झालं होतं. अन्न गोड लागेना. झोपही लागेना. अशांत, अस्वस्थ मनानं त्याच रात्री पत्नी-पुत्र यांचे मोहपाश तोडून टाकून सिद्धार्थ गौतम निघाला एका प्रश्‍नाचं उत्तर शोधायला – मानवी जीवनात एवढं दुःख का? दुःखाचं मूळ कशात आहे? त्यावर उपाय कोणता? … बारा वर्षांच्या दीर्घ तपश्‍चर्येनंतर, मौन-चिंतनातून त्याला उपाय सापडला – तृष्णा – तहान – प्यास हेच ते मळ. ‘ये दिल मॉंगे मोअर’ हीच ती कधीही तृप्तशांत न होणारी अधाशी, भोगी वृत्ती. यातून निवृत्ती, सर्व प्रकारची सम्यक् (यथायोग्य, युक्त) जीवनप्रणाली हाच एकमेव मार्ग आहे शांतीचा-आनंदाचा – मुक्तीचाही.
हे एवढ्या विस्तारानं सांगायचं कारण यात सारं दर्शन – मार्गदर्शन होऊन गेलं. ‘सुखी’ – आनंदी जीवनाचं!
इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की ज्या दिवशी जीवनातील दुःखाचं विविधांगी दर्शन सिद्धार्थ गौतमाला झालं त्यादिवशी तो कंटाळून, वैतागून, अशा दुःखमय जीवनात काही अर्थ नाही असा जीवनाला दोष देत सारं सोडून गेला नाही तर या दुःखाचं मूळ काय असावं यावर चिंतन करण्यासाठी, ते मूळ शोधून काढून मानवजातीला आनंदाचा मार्ग दाखवण्यासाठी तो राजगृह व राजभोग यांचा त्याग करून एकांतवासात गेला.
भगवंत हेच समुपदेशन करताहेत. जन्म-मृत्यू-जरा-व्याधी यातील ‘दुःखदोषांचं’ सतत चिंतन केलं तर त्यातून सुटता येईल. प्रपंच, त्यातील कर्तव्यं यांचा त्याग करायचा नाही. म्हणजे सारं न सोडता त्यातून सुटायचंय. थोडक्यात त्यातील आसक्ती, गोडी कमी करायचीय.
या संदर्भात या सर्व गोष्टींबद्दल सहचिंतन करु या-
१. जन्मदुःख ः जन्मपूर्व मातेच्या गर्भाशयात असताना होणारं दुःखं; प्रत्यक्ष जन्म घेताना भोगाव्या लागणार्‍या यातना अन् जन्मल्यावर जन्मभर हे किंवा ते असं पावलोपावली भेटणारं दुःखं. असा सारा प्रवास दुःखमय आहे.
* गर्भवास – हा एकदोन दिवसांचा नाही तर तब्बल नऊ महिन्यांचा असतो. कारावासापेक्षा हा भयंकर असतो. समर्थ रामदासांनी मनाच्या श्‍लोकात याचं प्रत्ययकारी वर्णन केलंय-
बहु हिंपुटी होइजे मायपोटी| विचारे मना यातना
निरोधे पचे कोंडिले गर्भवासी| अधोमूख रे दुःख त्या बाळकासी|
अतिशय छोट्या जागेत सूक्ष्म जीवाची वाढ होत राहते. त्यासाठी त्याच्या देहाची जी अवस्था असते ती पाहिली तर हे गर्भासन पद्मासनापेक्षाही अवघड असते. शिवाय गर्भाशयातील द्रवपदार्थ, त्याला असलेलं तापमान (निरोधे, पचे, कोंडिले गर्भवासी) … हे सारं कल्पनेनंही अवघड वाटतं. यावर कळस म्हणजे ‘खाली डोकं वर पाय’(अधो मुख) या अवस्थेत राहणं! ही अवस्था प्रसूतीसाठी सोयिस्कर असते. (आता ‘सिझेरियन’ शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्याकडे कल वाढतोय. काही प्रगत देशात तर तसे नियमही आहेत. पण यात मातेला होणारा त्रास हा आहेच.)
* प्रसूती – प्रत्यक्ष बाळंतपण हे पूर्वीच्या काळी तर अवघड दिव्य असायचं. आजही ग्रामीण भागात प्रसूतीच्या वेळचे किंवा जन्मानंतर अल्पावधीच होणार्‍या मृत्यूचं प्रमाण लक्षात घेण्यासारखं आहे. पूर्वी बाळाला वाचवायचं की आईला वाचवायचं?’ अशी परिस्थिती अनेकदा असायची.
आजही नैसर्गिकरीत्या होणार्‍या प्रसूतीत आई व बाळ दोघांनाही वेदना सहन कराव्या लागतात. गर्भाशयातून अतिशय अरुंद अशा योनिमार्गातून मोकळ्या जगात येणं ही खरोखर सुटकाच (डिलिव्हरी) असते आई व बाळाचीही!
बाळाला वेदना होतात, ते बाहेर आल्यावर रडताना सर्वांना दिसतं पण आईच्या उदरात असताना त्याला वेदना जाणवतात का? हा चिंतनाचा विषय आहे. या संदर्भात ‘मूक किंकाळी (द सायलंट श्रीक)’ या लघुपटाचा उल्लेख करता येईल. गर्भपात करताना हा ‘जीव’ जिवंत असतो. ज्यावेळी त्याला जोर देऊन (प्रसंगी खंडित करून) बाहेर काढलं जातं तेव्हा त्याच्या वेदनेच्या किंकाळ्या आपल्याला बाहेर ऐकू येत नाहीत. पण म्हणून त्या नसतात असं नाही. या दहा मिनिटांच्या जपानी लघुपटात ही सारी प्रक्रिया दृक्‌श्राव्य स्वरूपात प्रत्यक्ष सादर केलीय. जी पाहणं हा एक जीवघेणा अनुभव आहे.
या सार्‍याचा अर्थ जन्म घेणं वा देणं वाईट आहे असा नाही. पण एवढा जर यातनामय अनुभव असेल तर या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटणंच बरं.. यासाठी सध्याचा जन्म सदाचरण – सेवा – प्रेम – त्याग अशा उदात्त भाव व कृतीत घालवा, हा भगवंताचा व संतमहात्म्यांचा आदेश महत्त्वाचा आहे, नाही का?
२) जीवनदुःख – ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे’ असे जीवनवस्त्राचं स्वरूप हा नित्यानुभव आहे. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे|’ हेही खरं आहे पण त्यासाठी जीवनाचं खरं स्वरूप ध्यानात घेणं आवश्यक आहे. सुख-दुःख या आनंदसागरावरच्या लाटा आहेत. असंख्य येतात व जातात पण सागर असतोच असतो. जसं जसं खोल जावं तसा तसा सागर शांत प्रशांत होत जातो. यासाठी हवं जीवनातील सुखदुःखावर चिंतन (अनुदर्शनम्).
३) मृत्युदुःख – मरावं तर प्रत्येकाला लागतंच. मृत्यू मात्र जवळजवळ सर्वांना नको असतो. देहाची दुःख तर असतातच पण मनाची तगमग व तळमळ व्याकूळ करणारी असते. ‘मला मृत्यूचं भय वाटत नाही पण मृत्यूकडे नेणार्‍या क्षीण होत जाणार्‍या अवस्थेची (टेपरिंग प्रोसेस ऑफ डेथ) मात्र भीती वाटते’, असा अनेक विचारवंतांचा अनुभव असतो. मृत्यू हा शब्दही अनेकांना अशुभ भयानक वाटतो. ज्ञानोबा म्हणतात, ‘अगा मर हा बोल न साहती| आणि मेला तरी रडती॥ खरंय हे!
४) व्याधिदुःख – सध्या शरीर व मनाला होणार्‍या व्याधींची यादी सतत वाढतेच आहे. साधा ताप (ज्वर) जरी घेतला तरी त्याचे नवेनवे भयंकर प्रकार रोज प्रकट होताहेत.
आधि (मनाचा ताप – चिंता, भय इ.) – व्याधि (देहाचे रोग) – उपाधि (प्रपंचातील असंख्य कटकटी) यांनी सारं जीवन व्यापून टाकलंय. या सार्‍याचं एका अर्थी क्षणाक्षणानं संपणार्‍या जीवनाचं व जवळ येणार्‍या ‘मरणाचे स्मरण असावे’.. तरच काहीतरी भव्यदिव्य करता येईल – हा सर्व क्षेत्रातील महामानवांचा जीवनसंदेश आहे.
भगवंतांनी जीवनाला ‘दुःखालय’ म्हटलंय ते त्याचा खरा आनंद अनुभवता यावा यासाठीच. यासाठी वरवर वाटणार्‍या सुखोपभोगात असणार्‍या दुःखाचं चिंतन करायला हवं. ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं| पुनरपि जननीजठरे शयनम्‌|’ हे नकारात्मक चिंतन नाहीये. तर सुखाची अतीव अभिलाषा (भोगवादी व चंगळवादी जीवनशैली) हेच दुःखाला निमंत्रण आहे याची खूणगाठ बांधली पाहिजे. ‘रडत सुख उपभोगायचं की हसत दुःख भोगायचं’ हेच फक्त आपल्याला ठरवायचंय. नव्या वर्षांत हसत हसत दुःखाला स्विकारायचा संकल्प करायला काय हरकत आहे? त्यासाठी शुभकामना!