ज्याचे जळते, त्यालाच कळते!

0
300
  • देवेश कु. कडकडे (डिचोली)

सात वर्षांचा न्यायालयीन लढा देऊन निर्भयाच्या मातापित्यांनी जो न्याय मिळवला तो केवळ तिच्या एकट्याचाच लढा नव्हता तर संपूर्ण देशाचा होता. अशावेळी गुन्हेगारांना माफ करण्याची मागणी करणे ही सार्‍या देशवासीयांची केलेली थट्टाच आहे.

समाज हा विविध स्वभावाच्या व्यक्तींनी एकत्र गुंफलेला एक समूह आहे. ‘जगा आणि जगू द्या’ हे सूत्र प्रत्येक व्यक्तीने अंगिकारले तर समाजात शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहील आणि बिकट प्रश्‍नही उद्भवणार नाहीत. मात्र या समाजात अशीही काही माणसे आहेत की, ज्यांची सुखाची कल्पना दुसर्‍यांचे सुख ओरबडून घेण्याते असते. अशा व्यक्ती गुन्हेगारी वृत्तीच्या असल्यामुळे त्यांना समाजकंटक म्हणून संबोधले जाते. समाजात गुन्हे घडतच असतात. बेरोजगारी, वाढलेला पैशांचा हव्यास यामुळे गुन्ह्यांचे प्रस्थ वाढले आहेत. चोरी, फसवणूक अशा गुन्ह्यांना कडक शिक्षा असली तरी सुसंस्कृत समाज एकवेळ त्याकडे दुर्लक्ष करील, मात्र बलात्कार आणि हत्या हे गुन्हे समाजात क्रूर म्हणून गणले जातात. अशा गुन्ह्यांना जन्मठेप किंवा क्वचित फाशी सुनावली जाते. जिवाच्या बदल्यात जीव घेणे ही शिक्षा रानटी स्वरुपाची समजली जाऊन अनेक विकसित देशांनी फाशीची शिक्षा रद्द केली आहे. भारतातही फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणारा एक वर्ग आहे.

भगवद्गीतेत श्रीकृष्ण आपले परमशिष्य अर्जुनाला उपदेश करतात की, दुर्जनांची हत्या करणे पाप नव्हे आणि एक क्षत्रिय म्हणून तुझा तो धर्मच आहे. दुर्जन व्यक्ती समाजाची एकूण व्यवस्था गढूळ करतात. समाजातील सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी जगातील बहुतेक लोकशाहीप्रधान देशांत कायद्याची लिखित संहिता असते. ज्या गुन्हेगारांची मनोवृत्ती विघातक स्वरुपाची असते, आणि ते सुधारण्यापलीकडे असतात, ज्यांचे अस्तित्व समाजाला भविष्यात धोकादायक ठरू शकते, अशा अपवादात्मक गुन्हेगारांना देहदंडाची शिक्षा फर्मावली जाते. गुन्हेगारांना वळण लावण्यासाठी आणि भविष्यात सदाचारी व्यक्ती बनवण्यासाठी शिक्षेचा धाक असणे हे योग्यच आहे. म्हणून कुटुंबातील वडीलधारी माणसे आणि शाळेतील शिक्षक मुलांना त्यांच्या चुकांसाठी शिक्षा करायचे. लहान मुलांच्या चुका अथवा गुन्ह्यांना शिक्षा न करता दुर्लक्ष केले तर भविष्यात ते किती घातक ठरू शकते या गोष्टी शाळेच्या पाठ्यपुस्तकातूनही शिकवल्या जातात. शिक्षेचे प्रावधान हे ‘पुढच्याला ठेच, मागचा शहाणा’ यानुसार त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. काही व्यक्तींच्या हातून बेसावधपणे, निरुपायाने एखादी चूक घडते. रागाच्या भरात गुन्हे होतात. त्याचा त्याला पश्‍चात्ताप होतो. तरीही शिक्षा भोगावीच लागते. कारागृहे ही गुन्हेगारांना शिक्षा देण्याबरोबरच त्यांना सुधारून उर्वरित आयुष्य एक सामान्य माणूस म्हणून जगायला आधार देतात. कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य ‘सुधारणा आणि पुनर्वसन’ असे ठेवले गेले आहे. त्यामुळे कारागृहे ही सुधारगृहे आहेत. मात्र काही गुन्हेगारांची पार्श्‍वभूमी कुकर्मांनी भरलेली असते. त्यांचे गुन्हे इतके भयानक असतात की हे गुन्हेगार जिवंत असणे समाजासाठी धोकादायक ठरू शकते. त्यांना देहदंडाची शिक्षा देणे अपरिहार्य असते. या गुन्हेगारांना आपली बाजू मांडण्याची संधी संविधानाने दिली आहे. वकील नेमून न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. आरोपींना २४ तासात भर चौकात फाशी द्या अशा प्रतिक्रिया व्यक्त होणे हे व्यवस्थेच्या अपयशाचे द्योतक असले तरी तेही व्यवस्थेला धोकादायक आहे.

माणूस दुसर्‍यावर उद्भवलेल्या दुःखद घटनांबद्दल विविध कंगोर्‍यांतून चर्चा करीत असतो. मात्र स्वतःवर ओढवलेल्या दुःखद घटनांनी आयुष्यात नैराश्य आणि दुःख वाट्याला येते. अनेकांना दुसर्‍यांना न मागता सल्ले देण्याची सवय असते. समर्थ रामदास स्वामींनी जी महामूर्खाची लक्षणे विशद केली आहेत, त्यातील एक उदाहरण आहे. दुसर्‍यावर ओढवलेल्या प्रसंगावरही त्यांना भांडवल करण्यास लाज वाटत नाही. कोणाच्या दुःखावर फुंकर घालत नाहीत, उलट हे लोक फुकटचे अजब सल्ले देऊन जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करतात. आपल्या देशात एक वर्ग वावरत आहे, जो सतत वादग्रस्त वक्तव्ये करून समाजाचा लक्ष आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात असतो. हे स्वतःला उदारमतवादी, समाजसेवी समजतात. आतंकवादी, नक्षलवादी यांच्यासाठी त्यांचे हृदय पिळवटून जाते. या लोकांना विदेशातून मोठमोठ्या देणग्या येतात. अडाणी, अशिक्षित माणसांना एकवेळ समजून घेता येते, मात्र उच्चविभूषित लोक बलात्कार्‍यांना माफ करा असे विधान करतात तेव्हा समाज त्यांची दखल घेतोच. कोणी दहशतवाद्यांची फाशी रोखण्यासाठी अहोरात्र धडपडतात, काही नक्षलवाद्यांच्या बचावासाठी घाम गाळतात, काही बलात्कार करून हत्या करणार्‍यांना गुन्हेगारांची फाशी रद्द करण्यासाठी पीडितांच्या आईकडे साकडे घालतात. सात वर्षांचा न्यायालयीन लढा देऊन निर्भयाच्या मातापित्यांनी जो न्याय मिळवला तो केवळ तिच्या एकट्याचाच लढा नव्हता तर संपूर्ण देशाचा होता. अशावेळी गुन्हेगारांना माफ करण्याची मागणी करणे ही सार्‍या देशवासीयांची केलेली थट्टाच आहे. या भूमिकेचे वर्णन ‘संवेदनाहीन’ असे करणेही कमीच आहे. हेच लोक मुंबई बॉम्बस्फोटाचे प्रमुख आरोपी याकुब मेनन यांच्यामुळे ३५० निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले आणि शेकडो अपंग बनले. त्यांची फाशी रद्द करण्यासाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावत होते. याच याकुब मेमनच्या अंत्ययात्रेला लाखोंचा जनसमुदाय लोटतो हा बॉम्बस्फोटातील बळींचा अपमान आहे. शिक्षा करणार्‍यापेक्षा क्षमा करणारा मोठा असतो असे आपल्याला शिकवले जात असले तरी हे तत्वज्ञान कुठल्या परिस्थितीत स्वीकारावे यालाही मर्यादा आहेत. परकीय आक्रमकांनी भारतीय राज्यकर्त्यांच्या या क्षमाशील वृत्तीचा गैरफायदा उठविला होता. क्षमा करणे एक सद्गुण म्हणून निश्‍चितच गणला जात असला तरी ज्याला क्षमा करायची ती व्यक्ती त्या पात्रतेची असायला हवी. जर उद्या बलात्कार करून निर्दयपणे हत्या करणार्‍या नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा होत नाही, हा चुकीचा संदेश समाजात गेला तर गुन्हेगारांना धाक राहणार नाही. आज मानवाधिकार हा काहींचा धंदा बनला आहे. भारतीय कायद्यानुसार फाशी रद्द करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या काही कलमांचा दुरुपयोग करून फाशी रद्द करण्यासाठी अथवा पुढे ढकलण्यासाठी हे वारंवार प्रयत्न करीत असतात. फाशीची शिक्षा अनेकांना सुनावली आहे. मात्र खून, बलात्कार थांबले नाहीत हे जरी सत्य असले तरी फाशी रद्द केली तर बलात्कार्‍यांचे उदात्तीकरण केल्यासारखे होईल. क्षणिक मोह, हिंसक वृत्ती आणि महिलांकडे एक उपभोगाची वस्तू म्हणून पाहणे अशी बलात्कारांमागील अनेक कारणे आहेत. ऐतिहासिक काळात परकीय आक्रमकांनी पराभूत राष्ट्रांच्या महिलांवर बलात्कार करून दहशत माजवण्याचे सत्र आरंभल्याने महिला हे एक अत्याचार करण्याचे साधन बनले. हीच वृत्ती पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये काहीजणांमध्ये दडलेली आहे. विकसित समाजात गुन्हेगारांना फाशी देणे हे वरकरणी रानटी स्वरुपाचे असले तरी बळजबरीने एखाद्या महिलेवर केलेला शारीरिक अत्याचार आणि नंतर रानटीपणाला लाजिरवाणी निर्दय हत्या हा प्रकार सुसंस्कृत समाजात घृणास्पद आहे. या गुन्हेगार्‍यांना फाशी द्यावी अथवा क्षमा करावी हा सर्वस्वी पीडीतेच्या नातेवाईकांचा प्रश्‍न आहे. बाकी असंवेदनशील विचारसरणीच्या लोकांमुळे सामान्यांना न्याय मिळत नाही आणि महिलांवर अत्याचार होतात आणि गुन्हेगार मोकाट सुटतात. अशा व्यक्ती समाजसेवकांच्या नावावर कलंक आहेत.