जोकोविच, मरेची मोठी घसरण

0
94

अँडी मरे व नोवोक जोकोविच यांना काल सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या एटीपी क्रमवारीत ‘अव्वल १०’ बाहेर जावे लागले आहे. कमरेच्या दुखापतीमुळे जुलै महिन्यापासून स्पर्धात्मक टेनिसपासून दूर राहिलेला मरे तिसर्‍या स्थानावरून थेट १६व्या स्थानी फेकला गेला आहे. २०१४ साली ऑक्टोबर महिन्यात मरे अखेरच्या वेळी ‘टॉप १०’ बाहेर होता. दुसरीकडे विंबल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत टॉमस बर्डिचविरुद्धचा सामना कोपराच्या दुखापतीमुळे अर्धवट सोडल्यापासून जोकोविचने कोणतीही स्पर्धा खेळलेली नाही. पाच स्थानांच्या घसरणीसह तो १२व्या क्रमांकावर पोहोचला आहे. मार्च २००७ पासूनचे त्याचे हे सर्वांत खराब रँकिंग आहे. रविवारी झालेल्या पॅरिस मास्टर्सच्या अंतिम फेरीत फिलिप क्रानोविचला नमविलेल्या जॅक सॉक याने १३ स्थानांची झेप घेत नववे स्थान मिळविले आहे.

भारतीय खेळाडूंचा विचार केल्यास पुरुष एकेरीत युकी भांब्री व रामकुमार रामनाथन या दोन आघाडीच्या खेळाडूंना अनुक्रमे एका व दोन स्थानांचा तोटा झाला आहे. युकी १४०व्या तर रामकुमार १४८व्या स्थानी आहे. एकेरीतील भारताचा तिसरा सर्वोत्तम खेळाडू प्रज्ञेश गुणेश्‍वरनने सात क्रमांकांची प्रगती साधत २५५व्या स्थानावर हक्क सांगितला आहे.

पुरुष दुहेरीत विष्णू वर्धन व श्रीराम बालाजी यांनी अपेक्षेप्रमाणे मोठी झेप घेतली आहे. रविवारी या द्वयीने शेनझेन ओपन स्पर्धा जिंकून ११८वे (+ १६) व १३९वे (+ ८) स्थान प्राप्त केले आहे. दिविज शरणने ५०व्या स्थानासह ‘अव्वल ५०’मध्ये प्रवेश केला आहे तर रोहन बोपण्णा (-१, १५वे स्थान) याची किंचित घसरण झाली आहे.