पर्यटन खात्याने तयार केलेले जेटी धोरण हे केवळ पर्यटनासाठी असून, कोळसा वाहतुकीसाठी हे जेटी धोरण तयार केल्याचा आरोप खोटा आहे, असे स्पष्टीकरण काल पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिले.
काही लोक विनाकारण निराधार आरोप करून विकासकामांना खो घालत आहेत. जेटी धोरणासंबंधी लोकांच्या सूचना व आक्षेप ऐकून घेतले जाणार असून, त्यासाठी धोरणाचा मसुदा लोकांसमोर ठेवण्यात येणार असल्याचे खंवटे यांनी सांगितले. पर्यटन क्षेत्रासाठी ही साधनसुविधा असून, त्याच दृष्टिकोनातून या धोरणाकडे पाहावे. पर्यटन खाते जेटी बांधणार नसून, ते काम बंदर कप्तान खाते करणार आहे, असेही खंवटे म्हणाले. दरम्यान, काल राज्याच्या विविध भागांतील लोकांनी व संघटनांनी पर्यटन खात्याच्या जेटी धोरण २०२२ च्या मसुद्याला विरोध दर्शवणारी निदर्शने केली.