जुलै अखेरपर्यंत १८-४४ वयोगटाचे लसीकरण पूर्ण

0
115

>> मुख्यमंत्र्यांची घोषणा; नागरिकांच्या सहकार्याची गरज

येत्या ३१ जुलैपर्यंत राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट गोवा सरकारने ठेवले आहे. या वयोगटातील सर्वांचे लसीकरण पूर्ण करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरावे, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सांगितले.

वन खात्याने जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी कांपाल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
राज्यात १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांचे येत्या ३१ जुलैपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी या वयोगटातील सर्व लोकांनी पुढे येऊन लस टोचून घेणे गरजेचे आहे. लोकांनी या लसीकरण मोहिमेला प्रतिसाद दिल्यास हे लक्ष्य साध्य करता येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

स्तनदा माता, पाच वर्षांखालील मुलांचे पालक, खलाशी, टॅक्सी व रिक्षाचालक, मोटारसायकल पायलट आणि दिव्यांगांना टप्प्याटप्प्याने लस देण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवापासून १८ ते ४४ वयोगटासाठी सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान या विशेष गटांना प्राधान्य देण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याची खंत
दोन वर्षांखालील मुलांच्या पालकांना आणि गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या व्यक्तींना गुरुवारपासून लस टोचण्यात येत आहे; मात्र या श्रेणीतील केवळ १३०० लोकांनीच गुरुवारी लस घेतली, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे आता सरकारने पाच वर्षांखालील मुलांच्या पालकांना देखील लसीकरणात प्राधान्य देण्याचे ठरवले आहे, असेही त्यांनी सांगितले.