संचारबंदीसंदर्भात उद्या निर्णय

0
108

>> मुख्यमंत्र्यांची माहिती; कोरोना सद्य:स्थितीचा आढावा घेणार

राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या उद्रेकानंतर राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदीत आणखी वाढ करावी की ती मागे घ्यावी, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी रविवार दि. ६ जून रोजी एक आढावा बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले.

राज्यात कोरोनाबाधित आणि बळींची संख्या वाढत असल्याने सुरुवातीला २४ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत फारशी सुधारणा होत नसल्याने आतापर्यंत दोन वेळा संचारबंदी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या संचारबंदीची मुदत सोमवारी संपत आहे. त्यामुळे संचारबंदीत वाढ होणार की नाही, याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
संचारबंदी वाढवावी की ती मागे घ्यावी, याबाबतचा निर्णय घेण्यापूर्वी सरकार राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेईल आणि त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
गोवा सरकारने राज्यातील कोविड रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने सुरुवातीला रविवार दि. ९ मे रोजी १५ दिवसांसाठी म्हणजेच २४ मे रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली होती.

या काळात विवाह सोहळे तसेच गर्दी होईल, अशा कार्यक्रमांवर निर्बंध घातले होते. फक्त जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास सरकारने परवानगी दिली होती.
२४ मेनंतर सरकारने पुन्हा ३१ मेपर्यंत संचारबंदीत वाढ केली होती. तसेच ३१ मेनंतर पुन्हा एकदा संचारबंदीत वाढ करण्याचा निर्णय घेत, ७ जूनपर्यंत संचारबंदीचा कालावधी वाढवला होता.

आता ७ जूननंतर पुन्हा एकदा संचारबंदीचा काळ वाढवावा की संचारबंदी हटवावी, याचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री रविवारी एक आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर संचारबंदीबात पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. संचारबंदी लागू केल्यानंतर राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट पाहायला मिळाली आहे.