जीवनाचे साफल्य देणारे श्रीफळ

0
238

योगसाधना – ५०६

  • डॉ. सीताकांत घाणेकर

बाहेरून कुरुप – ओबड धोबड, तसाच कठोर, पण आतून सुंदर -मृदु.
अशा ह्या दोन विरोधाभासी गुणांचा समन्वय म्हणजे नारळ. ह्यांतील गर्भितार्थ म्हणजे- जीवनात येणार्‍या विविध द्वंद्वांचा जो योग्य समन्वय साधू शकतो तोच महान बनू शकतो. त्यालाच जीवनातील खरे वैभव म्हणजे ‘श्री’ सापडते.

आपल्या भारतात कितीतरी सण आहेत. सर्व वर्षभर प्रत्येक महिन्यात आहेत, तसेच इतर अनेक तर्‍हेच्या पूजा आहेत. घरप्रवेश, सत्यनारायण पूजा, देव-देवता पूजा… यातील अनेक कर्मकांडे स्वतःच्या घरात, मंदिरात अथवा तीर्थक्षेत्रात असतात. त्याशिवाय इतर देखील आहेत. उदा. समराधना… तसेच मानवाच्या जन्ममृत्यूशी संबंधित – श्राद्ध, म्हाळ… असे अनेक विधी आहेत.

ह्या सर्व कर्मकांडांत अनेक वस्तू आवश्यक असतात. विधीप्रमाणे थोडाफार फरक असेल. फुले, दुर्वा, तुलसी, उदबत्ती, कापूर, पंचामृत साहित्य… पाणी तर अगदी आवश्यक. संध्या अभिषेक. पण एक वस्तू पाहिजेच ती म्हणजे श्रीफळ. आपला नारळ. पूजेतही पाहिजे, तसा जेवणातही. आपल्यापैकी अनेकांना ‘श्रीफळ’ हे नाव माहितही नाही आणि ज्ञात असले तरी त्या शब्दामागील मुख्य तत्त्वज्ञान माहित नाही. ‘श्री’ म्हणजे ‘वैभव.’ नारळ उत्कृष्ट मनोवैभवाचे प्रतीक आहे. नारळाचे बारीक निरिक्षण केले की लगेच कळते. नारळ दोन विरुद्ध शब्दांचे दर्शन घडवतो- कुरुपता – सुंदरता, कठोरता- मृदुता.
बाहेरून कुरुप – ओबड धोबड, तसाच कठोर, पण आतून सुंदर -मृदु.
अशा ह्या दोन विरोधाभासी गुणांचा समन्वय म्हणजे नारळ. ह्यांतील गर्भितार्थ म्हणजे- जीवनात येणार्‍या विविध द्वंद्वांचा जो योग्य समन्वय साधू शकतो तोच महान बनू शकतो. त्यालाच जीवनातील खरे वैभव म्हणजे ‘श्री’ सापडते.

नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा विविध ठिकाणी चांगला उपयोग होतो. घरबांधणीसाठी – मग ती छोटीशी झोपडी असू दे अथवा बंगला असू दे. जनावरांच्या गोठ्यासाठी देखील अत्यंत उपयोगी.
नारळाचा उपयोग देखील तसाच-

  • बाहेरचा काथ्था – विस्तव पेटवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आता तर त्याच्यापासून अनेक छान छान वस्तू बनवल्या जातात.
  • करवंटी – विस्तवासाठी चांगलीच. पण त्याला काठी लावून पूर्वी जेवणात पातळ पदार्थ वाढण्यासाठी वापरत असत.
  • नारळाचे पाणी गोड तर आहेच, पण ज्यावेळी शरीरात पाण्याची गरज असते… तहानेमुळे किंवा रोगांमुळे – तेव्हा नारळाचे पाणी अत्यंत उपयुक्त आहे. त्यात ग्लुकोज – साखरही असते. – शक्तीवर्धक तसेच इलेक्ट्रोलाइटस् देखील असतात. – ज्यांची शरीराला गरज असते.

आतील भागाचे (मलई) तर अनेक उपयोग आहेत.
पूजेचे पंचखाद्य, जेवणातील विविध वस्तू. गोव्यात तर नारळाशिवाय जेवणच नाही. – वरण, कडवण, हुमण, (मासळीचे)
नारळाची कढी- ही तर अत्यंत रुचकर, पुष्टिदायक, पचनासाठी उत्कृष्ट…
हे सर्व सुंदर उपयोग आहेतच. त्याशिवाय आर्थिकदृष्ट्या देखील वृक्ष फायदेशीर म्हणून कदाचित ‘श्रीफळ’ म्हणून संबोधले जात असेल.
जाणकार सांगतात की, अनेक वेळा जास्त वारा आला किंवा नारळ सुकला की खाली पडतो. पण कुठेही श्रीफळ डोक्यावर पडून कोणी मृत्युमुखी पडला असे ऐकिवात नाही. आध्यात्मिक व्यक्तींना इथे श्रीफळाचे मांगल्य दिसते.
चौफेर नजर टाकली की, लक्षात येते की मानवी जीवनात बाहेरून अत्यंत कठोर वाटणार्‍या व्यक्ती कोमल हृदयाच्या असतात.

परमपूजनीय पांडुरंगशास्त्री म्हणतात-
‘‘आपण त्यांच्या त्या मर्मभागापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डोंगरातून जसा झरा वाहतो, तसा जर सतत पुरुषार्थ करण्यात आला तर कठोर जीवनातही भावनांचा स्त्रोत प्रगटू शकतो.’’
‘‘समुद्राचा खारटपणा हृदयात साठवून लोकांना गोड पाणी देणारे श्रीफळ आपल्याला संदेश देते की- ‘विश्‍वाचा खारटपणा हृदयात साठव, पण लोकांना तू गोड पाणी देत जा. स्वधर्म पालनात कवटीप्रमाणे कठोर व अंतर्यामी मलईप्रमाणे नरम राहण्याचा संदेश बहुमोल जीवनात श्रीफळ आपल्याला देते.’’
इतिहासात असे अनेक महापुरुष- विविध क्षेत्रांत- सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, धार्मिक, आध्यात्मिक- अशा स्वभावाचे दिसतात.
ह्या संदर्भात एक सुंदर श्लोक आहे-
नाहीकेलसमाकारा दृश्‍वन्तेऽपि हि सज्जनाः|
अन्ये वदीरकाकाश बहिरेव मनोहरः

  • सज्जन नारळीच्या फळासारखे असतात तर दुर्जन बोरासारखे केवळ बाहेरूनच मनोहर दिसतात. समाजात अनेक व्यक्ती बोरासारख्या असतात. – कारण माणसांना चांगले वागण्यापेक्षा चांगले दिसणे अधिक आवडते. तसे बघितले तर चांगले दिसणे सरळ, सोपे आहे. उदा.- चांगले कपडे, सूट-बूट-टाय घालणे, केस व्यवस्थित विंचरणे… परंतु चांगले बनण्यासाठी कष्ट सहन करावे लागतात. दुसर्‍यांचा विचार करावा लागतो. स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना स्वतःचा त्रास व नुकसान होऊ नये अशी सद्भावना आपल्या हृदयात वसवावी लागते.

सारांश काय तर- व्यक्तीपूजनेपेक्षा चारित्र्यपूजन जास्त महत्त्वाचे आहे.
बाह्यसौंदर्य व्यक्तीच्या हातात नाही. निसर्गाने जसे रंगरूप दिले आहे तशी व्यक्ती दिसते. अवश्य, बाह्य सौंदर्य (कातडीचे) वाढविण्यासाठी विविध वस्तू आपण वापरू शकतो. त्यात वावगे काहीही नाही. पण अंतर्सौंदयर्र् जास्त महत्त्वाचे असते. त्यापुढे बाह्यसौंदर्य गौण बनते.
आपल्याकडे देखील फक्त बाह्यसौंदर्य न बघता अंतर्सौदर्य ओळखण्याची दृष्टी व शक्ती असली पाहिजे. इतिहासात विविध व्यक्ती आहेत, ज्या थोर व मान्यवर आहेत- सॉक्रेटीस, अब्राहम लिंकन, ज्या बाहेरून कुरुप होत्या, पण अनुभवाने समाजाला त्यांचे विचारसौंदर्य, गुणसौंदर्य व जीवनसौंदर्य दिसले. ते इतिहासात अजरामर झाले.

समाजात सहसा असे घडत नाही – अष्टावक्राची घटना- हें समजण्यासाठी योग्य आहे.

  • राजर्षी जनकाच्या दरबारात महर्षी अष्टावक्र गेले. असे सांगतात की, ते आठ ठिकाणी वाकडे होते. म्हणून तसे नाव. खरे म्हणजे कल्पनाच करवत नाही की ते कसे दिसत होते. जनकाच्या दरबारात तर राजसभेतील अनेक विद्वान(!) पंडित होते. अष्टावक्राला बघितल्यानंतर सर्व पंडित हसू लागले. तेव्हा अष्टावक्रदेखील हसू लागले. महाराजांनी म्हणजे पंडितांना हसण्याचे कारण विचारले. ते म्हणाले,‘ह्या ऋषीची आठही अंगे वक्र पाहून आम्ही हसलो.’ पण महर्षी सुद्धा हसले होते. जनकांनी त्यांना कारण विचारताच ते सहज म्हणाले, ‘जनकांच्या महर्षींच्या सभेत चर्मकारांस बसलेले पाहून मी माझे हसू रोखू शकलो नाही.’
    लगेच बोध न झाल्यामुळे जनकाने विचारले,‘ते कसे काय? आपण असे का म्हणता?’
    अष्टावक्र म्हणाले,‘विद्वानांजवळ अंतर्सौदर्य पाहण्याचा डोळा असतो. तसा डोळा तुमच्या तथाकथित पंडितांजवळ नाही. त्यांनी माझे विचारसौंदर्य, गुणसौंदर्य, जीवनसौंदर्य पाहिले नाही. त्यांचे लक्ष फक्त माझ्या बाह्यअंगाच्या कुरुपतेकडेच गेले. केवळ बाहेरच्या चामड्याला पाहण्याचे काम चर्मकाराचे असते, विद्वानांचे नाही.’ हे ज्ञानपूर्ण उत्तर ऐकून त्या पंडितांची स्थिती कशी झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी.

सज्जन देखील नारळाप्रमाणे बाह्य देखाव्याचा आग्रह राखीत नसतात. त्यामुळे सामान्यांना त्यांना ओळखणे कठीण नाही, तर अनेकवेळा अशक्य होते, कारण आपली बघण्याची व अनुभव घेण्याची दृष्टी तशी आम्ही विकसित केलेली नाही.
आजच्या समाजात बाहेरून सुंदर असणारे किंवा जाणीवपूर्वक दिसणारे लोकच जास्त आहेत. त्यामुळे अनेकवेळा अनेकांची फसवणूक होते.

उदा. शाळा, कॉलेजातील तरुण-तरुणी बाह्यसौंदर्याकडे जास्त आकर्षित होतात. ते साहजिकच आहे म्हणा, मग काहीजण एकमेकांच्या प्रेमात (!) पडतात. कुटुंबातील विरोध सहन करून ते विवाह देखील करतात. दुर्भाग्याने अनेकांना त्यांचे दुर्गुण नंतर कळतात. तद्नंतर तंटे, भांडणे, अत्याचार, घटस्फोट, आत्महत्या अशा विविध घटना घडतात.
म्हणूनच कुठेही घाई न करता दुसर्‍याबद्दल मन देताना विचार व गुण बघायला हवेत. त्याच्या जीवनाची सुंदरता बघणे आवश्यक आहे.

योगसाधनेत तर आपण आंतरिक सौंदर्य- म्हणजे आत्मिक सौंदर्य बघण्याचा प्रयत्न करतो.
पूर्वी ‘इंटेलिजन्स कोशंट’ अत्यंत महत्त्व होते. पण आता भावनिक (इमोशनल कोशंट) व आध्यात्मिक (स्पिरीच्युअल कोशंट) ह्या पैलूंवर जास्त भर दिला जातो, कारण जीवन सुसह्य बनविण्यासाठी ह्यांची फारच आवश्यकता असते.

(संदर्भः- संस्कृती पूजन – प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले)