जीवनाची दिशा बदलू या

0
170

योगसाधना – ५०९
अंतरंग योग – ९४

  • डॉ. सीताकांत घाणेकर

‘‘मी मेल्यावर माझ्या शवपेटीला दोन बाजूला दोन भोके करून माझे हात बाहेर दिसतील असे ठेव. सर्वजणांना कळू दे की,- ‘जगज्जेता सिकंदर परत जाताना रिकाम्या हातांनी गेला. काहीदेखील भौतिक संपत्ती घेऊन गेला नाही….’’

भारतीय तत्त्वज्ञान प्रत्येक विषयांत, पैलूंत श्रेष्ठ आहे. इथे उत्कृष्ट जीवन जगून जीवनविकास कसा करावा याबद्दल उच्च कोटीचे मार्गदर्शन तर आहेच, पण त्याशिवाय अटल अशा मृत्यूबद्दलदेखील अत्यंत सूक्ष्म व गूढ असे विचार आहेत.

भगवद्गीतेच्या सांख्ययोगाच्या दुसर्‍या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला – जो आप्तेष्टांच्या मोहात अडकला होता- शरीर व आत्म्याबद्दल सुंदर व उपयुक्त ज्ञान देतात.
वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोऽपराणि|
तथा शरीराणि विहाय जीर्णा-
नन्यानि संयाति नवानि देही॥ (गीता- २.२२)

ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसर्‍या नव्या शरीरात जातो.
खरेच, भगवंतानी ही वस्त्रांची उपमा देऊन कठीण व क्लिष्ट विषय अगदी सोप्या पद्धतीने सर्वांना समजेल असा सांगितला आहे.
शरीराच्या नश्‍वरतेबद्दल समजले पण आत्म्याचे काय? तो तर अमर, अजर अविनाशी आहे. तसेच त्याचे इतर गुणही आहेत.

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः|
न चैनं क्लेदयन्त्यापो च शोषयति मारुतः॥ गीता – २.२३

  • या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही. पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही.
    म्हणजे आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे.

प. पू. पांडुरंगशास्त्री सांगतात –
‘‘मृत्यू तर जीवनाचे सौंदर्य आहे. जीवनाचा शृंगार आहे. मृत्यू जर नसता तर कदाचित जीवनाला इतका महिमाच प्राप्त झाला नसता. मृत्यूच्या सान्निध्यातच कदाचित अत्यंत उत्कृष्टरीत्या जीवनाचा परिचय होतो. मृत्यू आहे म्हणूनच जीवनात आनंद आहे. जीवनात काव्य आहे. जीवन रसमय आहे’’.

वस्त्र बदलणे मृत्यूचे रूप रे
उंच स्वराने गीता पुकारे
नको करू मन दुःखाने बावरे
कर तू प्रभूचे ध्यान, मानवा!
मृत्यूचे एकरूप जाण ॥
आत्मा अमर आहे, तर देह नश्‍वर आहे. ह्यादृष्टीने पाहता जीवनाचा अंत नाही, तर नवजीवनाचे प्रस्थान आहे.

मृत्यु न शेवट, क्षणभर विसावा
थकता काया आश्रय घ्यावा
शिवासंगती जिव रमवावा
पुढले मग प्रस्थान, मानवा मृत्यूचे एकरूप जाण ॥

शास्त्रकार सांगतात प्रत्येक व्यक्तीने क्षणोक्षणी प्रभूचे ध्यान करायला हवे. कारण मृत्युसमयी जर भगवंताचे नाव घेतले तर मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो. पण आपणातील बहुतेकजण असे करताना दिसत नाहीत. काही अपवाद अवश्य असतील. आपले ध्यान, चिंतन जास्त करून भौतिक विषयांवरच जास्त वेळ असते- धनसंपत्ती, जमीनजुमला, पारिवारीक समस्या, सामाजिक विषय… काहीजण पूजा वगैरे कर्मकांड करतात. त्यावेळी त्यांचे लक्ष देवाकडे असेल अशी अपेक्षा करू या. ही गोष्ट ज्याने-त्याने बघायची असते.

हा विषय समजावताना शास्त्रकार एक गोष्ट सांगतात-
एक होता व्यापारी. त्याला एक मुलगा, एक मुलगी होती. दिवसभर तो व्यापारातच गुंतून असायचा. देवाचे नाव घ्यायला त्याला वेळच मिळत नसे. कधीही बघितले तर संपत्तीच्याच गोष्टी करायचा. त्याची पत्नी धार्मिक होती. ती आपला पूजापाठ नियमित व्यवस्थित करीत असे. आपल्या पतीला देखील थोडा वेळ ध्यान धारणेत काढायला सांगत असे. पण त्याला ते पटत नसे.

झाले. दिवसांमागून दिवस व वर्षांमागून वर्षे गेली. एक दिवस वृद्धत्व आले. आजारी पडला – जणू मृत्यूशय्येवरच. डॉक्टरांनी त्याची जगण्याची आशा सोडली. अगदी शेवटचे श्‍वास चालू होते. कुटुंबीय मंडळी आसपास होती.

पत्नी म्हणाली,‘‘अहो, आता शेवटच्या वेळी तरी भगवंताचे नाव घ्या. जाणते सांगतात की, अशाने मुक्ती मिळते.’’ तो आपल्याच नादात. शेवटी त्याने हात वर केला. एक बोट समोर केले आणि म्हणाला,‘‘वाऽऽऽ केऽऽऽ.’’ तो त्याचा अखेरचा श्‍वास होता.

पत्नीला वाटले, शेवटच्या क्षणी पतीने ‘वासुदेव, केशव’ म्हटले असेल. त्या दुःखातही तिचे मन सुखावले. पण बोट कशाला दाखवले याचा बोध होईना. तेव्हा त्यांनी मागे वळून बघितले तर त्यांना जे दृश्य दिसले, ते बघून सर्वांना धक्काच बसला- वासरूं केरसुणी खात होते. म्हणून तो वाऽऽ केऽऽ म्हणाला.

आता ह्या गोष्टींतला विनोद सोडून देऊ या. पण विश्‍वात असे अनेकवेळा घडते. म्हणून जीवनाचे तत्त्वज्ञान प्रत्येक व्यक्तीला माहीत हवे.
विविध लोकांचा मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो.-

  • ज्ञानी जन मृत्यूचे अस्तित्वच मानत नाहीत. त्यांचे म्हणणे की जगात काहीही नाश पावत नाही. म्हणून मृत्यू म्हणजे – ‘जडाचे रूपांतर व चेतनाचे वेषांतर!
  • भक्त- मृत्यू म्हणजे जीव-शिव मीलनाचे मधुर काव्य समजतात.
  • कर्मयोगी- मृत्यू म्हणजे जीवनाचा हिशोब द्यायला जाणे. ज्याचे जीवन प्रभुकार्यात खर्च झालेले आहे, त्याला मृत्यूची भीती नसते.

‘‘जिव-शिव-मीलन आनंदी जीवन
ज्ञानी-भक्तांना लाभे संजीवन
मस्तीत म्हणती भान हरखून
हिशोब घे भगवान! मानवा मृत्यूचे एकरूप जाण|’’

मडक्याकडे बघितले की कळते- मानव देह क्षणभंगुर आहे. एक दिवस हा देह जसा मातीतून आला तसाच मातीतच मिसळून जाणार.
पू. शास्त्रीजी म्हणतात –

  • देहाचीच आसक्ती राखणे किंवा देहाच्याच भोगात लट्‌टू बनून मांसमीमांसा करून राहणे योग्य नाही. असा उपदेश हे मातीचे लहानसे मडके देत असते.

खरेच, विश्‍वातील प्रत्येकाकडे मोठमोठ्या व्यक्ती बौद्धिक धुरंधरदेखील शेवटी मातीला मिळाले, इतिहास साक्षी आहे.

  • जगज्जेता सिकंदर त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. तरुणपणी त्याला स्वतःच्या शौर्यावर फारच अहंकार चढला होता. त्याला जग जिंकायचे होते आणि त्याने केलेदेखील तसेच. पायाखाली भूमी तुडवीत तो भारतात आला. इथेदेखील त्याला यशच मिळाले. कारण आपले अनेक राजे आपसात भांडत राहिले. पण एक दिवस त्याचे सैनिक लढाई करता करता थकले. त्यांना आपल्या कुटुंबाची आठवण यायला लागली.

सिकंदर परत मायदेशी निघाला. पण वाटेतच तो फार आजारी पडला. मृत्यूशय्येवरच होता. तेव्हा त्याला जीवनाचे तत्त्वज्ञान समजले. त्याने आपल्या सैन्याच्या जनरलला जवळ बोलावून सांगितले, ‘‘मी मेल्यावर माझ्या शवपेटीला दोन बाजूला दोन भोके करून माझे हात बाहेर दिसतील असे ठेव. सर्वजणांना कळू दे की,- ‘जगज्जेता सिकंदर परत जाताना रिकाम्या हातांनी गेला. काही देखील भौतिक संपत्ती घेऊन गेला नाही.’

त्याच तोडीचे अनेक शूर योद्धे होऊन गेले- रावण, चेंगीजखान, महंमद गझनी, औरंगजेब, सर्व मातीसमान झाले.
मागे राहिले ते फक्त त्यांचे नाव, कर्तृत्व. बरोबर गेले ते फक्त त्यांचे कर्म-सत्कर्म व दुष्कर्म.

त्याचबरोबर आपण चांगल्या व्यक्तींचेदेखील स्मरण करायला हवे. – छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग असे अनेक.

ह्या छोट्याशा मडक्यापासून आम्ही बोध घेतला तर जास्त उशीर होण्याच्या आधी आपण आपल्या जीवनाची दिशा बदलू. आज कोरोनाच्या राज्यात लाखो मृत्यू होतात. अशावेळी असा उच्च सकारात्मक दृष्टिकोन फारच जरुरी आहे.
(संदर्भ- संस्कृती पूजन- प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले.)