जि. पं. निवडणूक आणखी लांबणीवर टाकणे अशक्य

0
120

उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायती कुठल्याही परिस्थितीत येत्या २४ मार्चपर्यंत स्थापन कराव्या लागणार असून त्यामुळे या निवडणुकांची तारीख आणखी एकदा पुढे ढकलणे शक्य नसल्याचे काल राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.
यासंबंधी अधिक माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, सध्याच्या उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींची निवडणूक २५ मार्च २०१५ रोजी झाली होती. येत्या २५ मार्च रोजी या पंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे आता येत्या २४ मार्चपर्यंत उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायती नव्याने स्थापन होण्याची गरज आहे.

राज्य सरकारने या जिल्हा पंचायतींसाठीची ओबीसी, अनुसूचित जमाती व महिला उमेदवार यांच्यासाठीच्या आरक्षणासंबंधीची प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी कॉंग्रेस व मगो पक्षाने केल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील सूत्रानी वरील माहिती दिली.
राज्य सरकारने प्रथम जिल्हा पंचायत निवडणुका १५ मार्च रोजी घेण्याचे ठरवले होते. मात्र, आरक्षण व अन्य काही काम पूर्ण होऊ न शकल्याने नंतर सरकारने निवडणुका पुढे ढकलून त्या २२ मार्च रोजी घेण्याचा निर्णय घेतला. आता कॉंग्रेस व मगोने या निवडणुका आणखी पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी केलेली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने काल वरील माहिती दिली.

आचारसंहिता २७ किंवा
२८ पासून लागू
दरम्यान, जिल्हा पंचायत निवडणुकांसाठीची आचार संहिता २७ अथवा २८ फेब्रुवारीपासून लागू होण्याची शक्यता सूत्रांनी त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना दिली.
दरम्यान, उत्तर गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत ओबीसींसाठी ५ मतदारसंघ, अनुसूचित जमातींसाठी १ मतदारसंघ, महिलांसाठी ९ मतदारसंघ व ओबीसी महिलांसाठी ३ मतदारसंघ असे आरक्षण असेल. तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत ओबीसींसाठी ४ मतदारसंघ, अनुसूचित जमातींसाठी ३ मदारसंघ, महिलांसाठी ६ मतदारसंघ, ओबीसी महिलांसाठी २ मतदारसंघ आरक्षित असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.