जिवाशी खेळ

0
18

माटवी – दाबोळी परिसरातील विहिरी, नाले आणि शेतांमध्ये पेट्रोलियम पदार्थ मिसळण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे, परंतु गेले बारा दिवस हा प्रकार सुरू असूनही ज्या प्रकारे या संपूर्ण प्रकरणावर पडदा ओढला जाताना दिसतो ते खरोखर आश्चर्यकारक आहे. गोव्याला जो पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होतो, ते इंधन अदानीच्या मुंद्रा आणि हाजिरा बंदरांतून जहाजांद्वारे गोव्यात मुरगाव बंदरात आणले जाते. तेथून साकवाळपर्यंत जाणाऱ्या चौदा किलोमीटर अंतराच्या इंधनवाहिनीत पंपाद्वारे खेचले जाते आणि नंतर तेल कंपन्यांच्या बंकरमध्ये साठवले जाते. ह्या इंधनवाहिनीमध्येच कोठेतरी गळती लागल्याने हे इंधन माटवे दाबोळी परिसरातील जलस्त्रोतांमध्ये मिसळले आणि हे सर्व जलस्रोत प्रदूषित झाले. आश्चर्याची बाब म्हणजे एवढा गंभीर प्रकार होऊनही सारे काही आलबेल असल्याचा आव आणून ह्या विषयावर पडदा ओढला जाताना दिसत आहे. इंधन साठवण करणाऱ्या कंपनीने अग्निशामक दलाचा बंब आणि रुग्णवाहिका तैनात केला म्हणजे तिची जबाबदारी संपत नाही. सर्वत्र पसरलेल्या ह्या इंधनामुळे कधीही भडका उडून फार मोठी दुर्घटना घडू शकते. वास्को शहराने पूर्वी हे अनुभवलेले आहे. 2011 साली ऑगस्ट महिन्यात अशाच प्रकारे मुरगाव बंदरातून नाफ्ता वाहून नेणाऱ्या वाहिनीचा स्फोट होऊन भीषण आगीत काही माणसे दगावली होती. त्या आगीने वास्को परिसराच्या सुरक्षिततेबाबत गंभीर सवालही उपस्थित केले होते. मात्र, त्यानंतर काही काळ उलटला आणि तो विषय विस्मरणात गेला. मात्र, माटवे दाबोळी येथील सध्याच्या प्रकाराने त्या दुर्घटनेच्या स्मृती जाग्या झाल्या आहेत. दाबोळीतील माटवे, व्हडले भाट आदी परिसरातील नागरिक गेले दहा बारा दिवस भीतीच्या छायेत दिवस काढत आहेत. इंधनाचा भडका उडण्याच्या भीतीने त्यांनी चूलदेखील पेटवलेली नाही. ह्या प्रदूषणामुळे डोळ्यांची जळजळ होणे, श्वास गुदमरणे आदी त्रास होत असल्याची तक्रार ते करीत आले आहेत. मात्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र संबंधित कंपनीविरुद्ध कारवाईस धजावलेले नाही. इंधनवाहिनीत कोठे गळती आहे ह्याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी चाळीसहून अधिक ठिकाणी खोदकाम करून पाहण्यात आले, परंतु तरीही कोठे गळती आहे ह्याचा शोध लागू शकला नाही. शेवटी प्रशिक्षित श्वानाची मदतही घेण्यात आली. खरोखरीच ही गळती आहे की इंधनचोरीच्या प्रयत्नात ही गळती लागली आहे हे पाहण्याची गरज आहे, कारण इंधनाची चोरी ह्या भागात नवी नाही. साकवाळमधून राज्याच्या विविध भागांमध्ये जे पेट्रोल डिझेल पाठवले जाते, त्यावर डल्ला मारणारे माफिया या भागात आहेत आणि पूर्वी काही रंगेहाथ पकडलेही गेलेले आहेत. त्यामुळे ह्या गळतीकडे गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे. जोवर इंधनवाहिनीतील गळतीचा शोध लागत नाही, तोवर त्यात नवे इंधन भरणे म्हणजे नागरिकांच्या जिवाशी खेळ असेल, त्यामुळे ते काम थांबवण्यात आलेले आहे. मात्र, त्यामुळे राज्यात पेट्रोल डिझेलची टंचाई भासण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ह्याचे कारण मुरगाव बंदरात इंधन घेऊन आलेल्या तेलवाहू टँकरांतील इंधन बंदरात उतरवले गेलेले नसल्याने त्याला पर्याय म्हणून गोव्याबाहेरून इंधन रस्तामार्गे टँकरांद्वारे आणण्याची पाळी तेल कंपन्यांवर ओढवलेली आहे. बेळगाव, देसूर आणि मिरजहून सध्या पेट्रोल डिझेल गोव्यात आणले जात आहे. मात्र, गोव्यातील इंधनाची प्रचंड मागणी लक्षात घेता टँकरद्वारे येणारे पेट्रोल डिझेल पुरेसे ठरणारे नाही. सध्या तेल कंपन्यांच्या टाक्यांमध्ये जो साठा आहे, त्यामुळे राज्यातील पेट्रोल पंप कोरडे पडलेले नसले, तरी इंधनगळतीचा स्रोत शोधला गेला नाही, तर अनवस्था प्रसंग ओढवू शकतो. राज्याची रोजची पेट्रोलची मागणी किमान नऊशे किलोलीटरची आहे, तर डिझेलची मागणी हजारच्या वरची आहे. रस्तामार्गे येणाऱ्या इंधनातून ही मागणी पूर्ण होणे निव्वळ अशक्य आहे. शिवाय गोव्याच्या घाटरस्त्यांची सध्याची दयनीय स्थिती पाहिली, तर ह्या टँकरांमुळे अपघातांची आणि प्राणहानीची शक्यताही आहे. राज्यात इंधन टंचाई उत्पन्न होणार नाही आणि पेट्रोल डिझेलच्या साठेबाजी आणि काळाबाजाराची स्थिती निर्माण होणार नाही हे पाहणे ही सरकारची जबाबदारी आहे. माटवे दाबोळीतील इंधन गळतीकडे सरकारने कानाडोळा करू नये. ती गांभीर्याने घ्यावी. जलस्रोत प्रदूषित केल्याबद्दल आणि त्याद्वारे जनतेच्या जिवाला धोका उत्पन्न केल्याबद्दल संबंधित कंपनीवर कडक कारवाई करण्याची धमक राज्य सरकारने दाखवावी. इथे सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी नाहक खेळ मांडला गेला आहे. मात्र, तरीही सत्ताधारी पक्षातील संबंधित लोकप्रतिनिधी मिठाच्या गुळण्या घेऊन बसले आहेत हे आश्चर्यकारक आहे. राजकीय दबावातून हे प्रकरण असे दाबता येणार नाही, कारण शेवटी हा जनतेच्या जिवाशी चाललेला खेळ आहे.