जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी आणखी पाच उमेदवार जाहीर

0
13

राज्यातील जिल्हा पंचायतीच्या तीन मतदारसंघांतील पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने २ आणि रेव्होल्युशनरी गोवन या पक्षाने तीन उमेदवारांची नावे काल जाहीर केली.

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या रेईश मागूश, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या दवर्ली आणि कुठ्ठाळी या मतदारसंघात येत्या १६ ऑक्टोबर २०२२ रोजी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ६ ऑक्टोबर २०२२ ही अंतिम तारीख आहे.

कॉँग्रेस पक्षाने दवर्ली मतदारसंघात लियोसिंयो रायकर आणि कुठ्ठाळी मतदारसंघात व्हॅलेंट बार्बोझा यांना उमेदवारी जाहीर केली आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी दिली. कॉंग्रेस पक्षाने रेईश मागूश मतदारसंघातील उमेदवाराचे नाव अजूनपर्यंत निश्‍चित केलेले नाही. त्या मतदारसंघातील उमेदवाराचे नावही लवकरच निश्‍चित केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

आरजीचे तीन उमेदवार
रेव्होल्युशनरी गोवन (आरजी) या पक्षाने जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी तीनही मतदारसंघांतील उमेदवारांची नावे काल जाहीर करण्यात आली आहेत. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या दवर्ली मतदारसंघात अँड्र्‌यू रिबेलो, कुठ्ठाळी मतदारसंघात लेस्ली गामा, तर उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या रेईश मागूश मतदारसंघात साईनाथ कोरगावकर याला उमेदवारी देण्यात आली आहे, अशी माहिती आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी दिली.