जागतिक रंगभूमी दिन

0
270
  • गोविंद काळे

देव मंदिरांची उभारणी सुरू केली की समोर नाट्यमंडप हा उभारलाच जातो. कारण देवाच्या दारात नाटक झालेच पाहिजे हा गोमंतकीयांनी घालून दिलेला दंडक आहे. तोंडाला रंग फासला नाही आणि नाटकात भाग घेतला नाही असा गोमंतकीय शोधूनही सापडणार नाही. साडेचारशे वर्षे पारतंत्र्यात राहूनही गोमंतकियांनी नाट्यक्षेत्र जोपासले आहे.

अनेक विषयांमध्ये मूलभूत योगदान देणारी आचार्य परंपरा आपल्या देशाला लाभली. आपण पडलो दूरदृष्टीचे. त्यामुळे लांबचे पाहण्यातच आयुष्य गेले जवळचे असलेले नाही अशी शोकांतिका झाली काय.. असा प्रश्‍न पडतो. विल्यम शेक्सपियरचे ‘जग ही एक रंगभूमी आहे’ हे वाक्य नाट्य विषयाचा अभ्यास करणार्‍यांच्या तोंडी हमखास असते. चांगली गोष्ट आहे. यात दुमत असण्याचे कारण नाही. परंतु पूर्वजांच्या कर्तृत्वाचे स्मरणही आपणच करायला हवे. दुसरे थोडेच गुणगान करणार आहेत.
भरतमुनींचा ३६ अध्यायांचा ५४७४ श्लोकांचा नाट्यशास्त्र हा ग्रंथ आजही अभूतपूर्व मानला जातो. ‘ऋग्वेद यजुर्वेद सामवेदहि अथर्वणः|’ चारही वेद म्हणजे इतक्या वर्षांपूर्वीच्या मौखिक परंपरेचे अद्भुत दर्शन समजले जाते. याच चार वेदांचे सहकार्य घेऊन पंचमवेद भरतमुनींनी निर्माण केला.

जग्राह पाठ्यम् ऋग्वेदात् सामभ्यो गीतमेवच |
यजुर्वेदादभिनयान् रसान् अथर्वणादऽपि ॥

कोणतीही गोष्ट शास्त्रानुसार व्हावी. प्रत्येक गोष्टीची बांधणी सुयोग्यपणे केली आहे. भरतमुनींचा हा नाट्यशास्त्र ग्रंथ म्हणजे नाट्यवेद आहे तथा नाट्यशास्त्र म्हणूनही आम्हा भारतीयांना वंदनीय आहे. लोकांच्या डोळ्यांना आनंद देणारा हा नयनोत्सव आहे.
चारी वेदांचे अध्ययन हे ठराविक ज्ञातिबांधवांपर्यंत मर्यादित राहिले. सामान्य कष्टकरी, श्रमिक, दुःखीकष्टी जनसामान्यांनी आणि तपस्वी लोकांनी काय करावे? त्यांचे रंजन कसे होणार? यातून नाट्यवेद या पंचमवेदाची निर्मिती झाली.
दुःखार्तानां श्रमार्तानां शोकार्तानां तपस्विनाम् |
विश्रांतिजननं काले नाट्यमेतद् भविष्यति ॥

संशोधनाच्या क्षेत्रात मतमतांतरे असतात. एकवाक्यता आढळणे कठीण आहे. सुदैवाने एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे नाट्यशास्त्राची निर्मिती भरतमुनींनी केली आहे, याबाबत कोणताही संशय नाही. कर्त्याचे नाव काही संशोधकांनी मान्य केले आहे. भरतमुनी हे काश्मीरचे होते. नाट्यशास्त्रावरील आद्यग्रंथ म्हणूनही नोंद झालेली आहे. शिवदत्त दाधीच आणि पांडुरंग जावजी यांच्या प्रयत्नातून निर्णयसागर प्रेसने हा ग्रंथ १८६४ मध्ये परिपूर्ण प्रकाशित केला. यंदा १५७ वर्षे पूर्ण होत आहेत.

आजची रंगभूमी प्रगत आहे. संस्कृत नाट्य, पाश्चात्त्य रंगभूमी, भारतीय प्रादेशिक रंगभूमी, जागतिक रंगभूमी असा अभ्यास होऊन वर्तमानकालीन परिस्थितीची दखल घेऊन नवनवे प्रयोग रंगभूमीवर होत आहेत. गेली ४६ वर्षे माझे वास्तव्य गोव्यात आहे. देवभूमी गोवा हीच माझी कर्मभूमी ठरली आहे. एक गोष्ट आज मला नेहमी जाणवत आली आहे ती म्हणजे संशोधकांनी भले भरतमुनींना काश्मीरवाले म्हणून संबोधले असेल परंतु भरतमुनींची नाट्यशास्त्र परंपरा जिवंत ठेवण्याचे कार्य कुठे होत असेल तर ते केवळ गोमंतकातच होताना दिसते. त्यामुळे भरतमुनी आमचे दैवत, गोवेकरांचे दैवत असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो.
न तथा गंधमाल्येनं देवास्तुष्यन्ति पूजिताः|
यथा नाट्यप्रयोगस्थैः नित्यं तुष्यन्ति मंगलैः॥

सुगंधित पदार्थ अथवा हारपुष्प घालून देवगण तेवढे प्रसन्न होत नाहीत तर नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करून, कलाकारांनी सादर केलेल्या मंगलमय स्तुतिगायनांनी देव अधिक प्रसन्न होतात.

भरतमुनींचा हा श्लोक समजलेली भूमी म्हणजे देवभूमी गोमंतक. देव मंदिरांची उभारणी सुरू केली की समोर नाट्यमंडप हा उभारलाच जातो. कारण देवाच्या दारात नाटक झालेच पाहिजे हा गोमंतकीयांनी घालून दिलेला दंडक आहे. तोंडाला रंग फासला नाही आणि नाटकात भाग घेतला नाही असा गोमंतकीय शोधूनही सापडणार नाही. साडेचारशे वर्षे पारतंत्र्यात राहूनही गोमंतकियांनी नाट्यक्षेत्र जोपासले आहे. पहिले प्रेम देवावर, दुसरे नुस्त्यांवर आणि तिसरे नाटकावर तो गोमंतकीय!
भरतमुनींनी सांगितलेला देवपूजेचा, देवाला आनंदित करण्याचा मार्ग या जगताच्या पाठीवर गोमंतकीयांनी अवलंबिला आहे. वारसा चालवितो ते वारसदार. भरतमुनींचा वारसा गोमंतकीय चालवीत आहेत. भरतमुनी गोव्याचे आहेत. आम्ही गोमंतकीय भरतमुनींचे वारसदार आहोत याचा आम्हाला नितांत अभिमान आहे.