जल लवादाच्या आदेशाचे जल संसाधन मंत्र्यांकडून स्वागत

0
95

म्हादई जललवादाच्या सुनावणीत त्रिसदस्यीय समितीने महाराष्ट्राला विर्डी धरणाचे काम त्वरित थांबवण्याचा दिलेला अंतरिम आदेश गोव्यासाठी महत्त्वाचा असून दोन्ही राज्यांना लवादाने चपराक दिल्याने म्हादईसाठी चाललेला संघर्ष महत्त्वाच्या टप्प्यावर आला असून ही लढाई सर्वशक्तीनिशी लढण्याचा गोव्याने निर्धार केल्याचे जलसंसाधन खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी सांगितले.लवादासमोर काल सुनावणी झाल्यानंतर वरील आदेश आल्यामुळे आपल्याला समाधान झाल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राने सर्व पर्यावरणीय नियमांचे व न्यायालयीन निकषांचे उल्लंघन करताना विर्डी धरणाचे काम हाती घेतले. गोव्याचा विरोध असूनही खोटी माहिती देत काम चालूच ठेवले होते. मात्र आज म्हादई लवादालाही महाराष्ट्राने खोटी माहिती देऊन फसवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्याने लवादाने कामच बंद करण्याचा आदेस काढून गोव्याला मोठा दिलासा दिला व महाराष्ट्राचा सर्व खोटारडेपणा उघड पाडल्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी सांगितले.
पूर्वीच्या धरसोड वृत्तीमुळे प्रकरण रेंगाळले
पूर्वी कॉंग्रेसच्या राजवटीत म्हादईच्या विषयाबाबत सतत धरसोड वृत्तीने निर्णय झाले व या बाबतचे गांभीर्य कमी झाले होते. त्यामुळे ही लढाई रेंगाळली. पूर्वीपासूनच कणखरपणे विरोध झाला असता तर आजपर्यंत ही लढाई आम्ही पूर्णपणे जिंकलो असतो असे मांद्रेकर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
म्हादई जललवादाच्या त्रिसदस्यीय समितीने काल विर्डी धरण प्रकरणी दिलेला निर्णय गोव्याच्या लढ्याला मिळालेले प्राथमिक यश असून याचे आपण स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली. दरम्यान, राजेंद्र केरकर व रमेश गावस यांनीही या निवाड्याचे स्वागत केले आहे.