अरविंद केजरीवाल यांनी घेतली राजनाथ सिंहांची भेट

0
125
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करताना अरविंद केजरीवाल व मनिष सिसोदिया.

दिल्लीला पूर्ण राज्य दर्जा देण्याची मागणी
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर काल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन दिल्लीला पूर्ण स्वरुपी राज्याचा दर्जा देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. दिल्लीला राज्य दर्जा मिळाल्यास विविध शासकीय यंत्रणांशी समन्वय ठेवणे सुलभ होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.केजरीवाल यांच्यासोबत यावेळी आपचे नेते मनिष सिसोदिया हेही होते. आपल्या या भेटीतील चर्चे दरम्यान केजरीवाल यांनी केंद्र सरकार व दिल्ली सरकार यांच्यातील विधायक सहकार्यावर भर दिला. राजधानी शहराच्या विकासाआड राजकीय मतभेदांना थारा असू नये असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
रामलिला मैदानावर येत्या १४ रोजी होणार्‍या दिल्ली सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रणही केजरीवाल यांनी राजनाथ यांना दिले. २०१३ च्या विधानसभा निवडणुकांवेळी आपल्या जाहीरनाम्यात भाजपने दिल्लीला पूर्ण स्वरूपी राज्य दर्जा देण्याचे आश्‍वासन दिले होते त्याकडे लक्ष वेधून केजरीवाल यांनी आपल्या मुद्द्याचे समर्थन या चर्चेदरम्यान केले.
केंद्रातील भाजप सरकारकडे पूर्ण बहुमत असल्याने व त्याच पद्धतीने ‘आप’चे सरकार आता दिल्लीत स्थापन होणार असल्याने दिल्लीला पूर्ण राज्य दर्जा बहाल करण्यात कोणती अडचण असू शकत नाही असे सिसोदिया यांनी या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. दिल्लीसाठी ही बाब मोठी ठरणार असल्याचे ते म्हणाले.
केंद्र सरकारचा हस्तक्षेप होण्याची आवश्यकता असलेले अनेक विषय केजरीवाल यांनी गृहमंत्र्यांशी बोलताना उपस्थित केले व सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. दिल्लीसाठी महत्त्वाचे मंत्री असलेल्या व्यंकय्या नायडूंनाही शपथविधी समारंभास निमंत्रित केल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
दिल्ली पोलिसांना दिल्ली सरकारखाली आणण्याचा विषय या भेटीत उपस्थित करण्यात आला काय असे विचारले असता राज्य दर्जा मिळाल्यानंतर तो विषय निकालात निघेल असे उत्तर सिसोदिया यांनी दिले.