जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे रविवारी दुपारी झालेल्या दहशतवादी चकमकीत लष्कराचे 7 जवान जखमी झाले आहेत. यातील 3 जवानांना उपचारासाठी एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना किश्तवाडच्या वरच्या जंगली भागातील सोनार येथील आहे. येथे लष्कराच्या व्हाईट नाईट कोरचे दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन त्राशी-1′ सुरू आहे. याच दरम्यान जवानांची दहशतवाद्यांशी चकमक झाली.
दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. जवानांनी 2-3 दहशतवाद्यांना घेरले होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असू शकतात.
या दहशतवाद्यांचा शोध अजूनही सुरू आहे. ड्रोनद्वारे परिसरावर नजर ठेवली जात आहे. स्निफर डॉग्सचीही मदत घेण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर, सीआरपीएफ शोधमोहिमेत गुंतले आहेत.