जमीन रुपांतर सनद ६० दिवसांत, तर मुंडकार प्रकरणे ६ महिन्यांत निकाली

0
13

>> महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांची विधानसभेत माहिती

महसूल विभागाला मुंडकार, पार्टीशन प्रकरणे सहा महिन्यांत निकालात काढण्याचा निर्देश देण्यात आला आहे. जमीन रुपांतर सनद ६० दिवसांत देण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी विधानसभेत महसूल, कामगार व इतर खात्याच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना काल दिली.

जिल्हाधिकार्‍यांना मुंडकार प्रकरणे जलद गतीने हाताळण्यासाठी खास मामलेदारांची नियुक्ती करण्याची सूचना करण्यात आली आहे. महसूल विभागाकडील सर्व प्रकरणे वेळ मर्यादेत निकालात काढण्याची सूचना करण्यात आली आहे. म्युटेशन व पार्टीशनची प्रक्रिया आणखीन सुटसुटीत आणि गतिमान करण्यात आली आहे. सनद देण्याची प्रक्रिया साठ दिवसात पूर्ण करण्याची सूचना केली आहे. महसूल खात्याकडील दस्ताऐवजासाठी अंदाजे १.४३ कोटी रुपये खर्चून अद्ययावत रेकॉर्ड रूम उभारण्यात येणार आहे. तसेच, दस्तऐवजासाठी नवीन सॉफ्टवेअर विकासित केले जात आहे. महसूल खात्यातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बळकट केली जाणार आहे. मेरशी येथे नवीन जिल्हाधिकारी संकुल उभारण्यात येणार आहे. मुरगाव येथेही नवीन इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले.

उत्तर गोव्यात डिचोली तालुक्यातीस मुळगाव येथे ईएसआय महामंडळाकडून १०० खाटांच्या इस्पितळाची उभारणी केली जाणार आहे. कामगार वर्गाला ईएसआयच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत, असे मोन्सेरात यांनी सांगितले.
वेर्णा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात मुरगाव तालुका आणि सासष्टी तालुक्यातील काही भागातील कचर्‍यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रकल्पातून वीज निर्मिती केली जाणार आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले.

कामगारांच्या किमान वेतनामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. किमान वेतनवाढीच्या मागणीवर गंभीरपणे विचार सुरू आहे.

  • बाबूश मोन्सेरात, कामगारमंत्री