जमशेदपूर-हैदराबाद लढत गोलशून्य बरोबरीत

0
200

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात रविवारी पहिल्या लढतीत हैदराबाद एफसी आणि जमशेदपूर एफसी यांच्यात गोलशून्य बरोबरी झाली. हैदराबाद बाद फेरीच्या शर्यतीत असून चौथे स्थान भक्कम करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना काहीसा धक्का बसला आहे.
वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना झाला. गोलशून्य बरोबरीची कोंडी अखेरपर्यंत सुटू शकली नाही. हैदराबादने याबरोबरच चौथे स्थान कायम राखले. १३ सामन्यांत त्यांची ही सहावी बरोबरी असून चार विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १८ गुण झाले. जमशेदपूरने दोन क्रमांक आगेकूच करत आठवे स्थान मिळविले आहे. १३ सामन्यांत त्यांची पाचवी बरोबरी असून तीन विजय व पाच पराभव अशा कामगिहीसह त्यांचे १४ गुण झाले आहेत.

जमशेदपूरने स्थिरावण्यासाठी अधिक वेळ न दवडता आक्रमणाला प्राधान्य दिले. सातव्या मिनिटाला जमशेदपूरचा मध्यरक्षक सैमीनलेन डुंगल याने थ्रो-ईनवर चेंडू नियंत्रित केला. त्याने हैदराबादचा बचावपटू आकाश मिश्राला चकविले. त्याने बॉक्समध्ये तिलेल्या अप्रतिम क्रॉस पासवर आघाडी फळीतील नेरीयूस वॅल्सकीस वेळीच ताबा मिळवू शकला नाही. दोन मिनिटांनी हैदराबादचा स्ट्रायकर जोएल चायनेस याला आघाडी फळीतील सहकारी अरीडेन सँटाना याने पास दिला. चायनेसच्या प्रयत्नावर जमशेदपूरचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याने बचाव केला. त्याने चेंडू बाहेर घालविला.२१व्या मिनिटाला चायनेस याने मध्य फळीतील हालीचरण नर्झारी याला पास दिला. नर्झारीने मारलेला फटका रेहेनेश याने डावीकडे झेपावत अडविला. ३९व्या मिनिटाला जमशेदपूरच्या फारुख चौधरी याने केलेला प्रयत्न थोडक्यात चुकला. ४२व्या मिनिटाला जमशेदपूरचा मध्यरक्षक ऐतोर मॉनरॉय याने डावीकडून मिळालेला कॉर्नर घेतला. त्याच्या चेंडूवर बचाव फळीतील स्टीफन इझे याने उडी घेत हेडिंग केले, पण हैदराबादचा बचावपटू आशिष राय याने ही चाल चपळाईने रोखली. दुसर्‍या सत्रात रायने चौधरीला पाडल्यामुळे जमशेदपूरला फ्री किक मिळाली. मॉनरॉयने बॉक्समध्ये मारलेला चेंडू हैदराबादचा गोलरक्षक कट्टीमणी याने अडविला. ६३व्या मिनिटाला जमशेदपूरचा मध्यरक्षक अलेक्झांड्रे लिमा याने चेंडूवर ताबा मिळविला, पण हैदराबादचा बचावपटू ओडेई ओनैन्डीया याने आकाश मिश्राच्या साथीत त्याला रोखले. ७८व्या मिनिटाला हैदराबादला मिळालेली फ्री कीक मध्यरक्षक हितेश शर्माने घेतली. त्याचा फटका स्टीफन इझेने हेडिंगवर थोपविला, पण चेंडू पेनल्टी क्षेत्रात सँटानाकडे गेला. सँटानाने रेहेनेशच्या डावीकडे चेंडू मारला, पण त्याचा फटका स्वैर होता. चार मिनिटे बाकी असताना चौधरीने डावीकडे कॉर्नर मिळविला. मॉनरॉयने तो घेतला, पण हैदराबादच्या बचाव फळीने आपले क्षेत्र सुरक्षित राखले.