उत्तर जपानमध्ये सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले. या भागात 7.4 रिश्टर स्केलचा हादरा जाणवल्याची माहिती समोर आली आहे. जपानच्या हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून, तीन मीटर उंच (10 फूट) लाटांची शक्यता वर्तवली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा धक्का एवढा तीव्र होता की, टोकियोमध्ये अनेक इमारतींना हादरा बसला असून, कित्येक किलोमीटर लांब याचा प्रभाव दिसून आला. भूकंपाचे हादरे जाणवल्यानंतर सुमारे 40 मिनिटांनी 80 सेंटीमीटर (31 इंच) उंच लाटा इवाटे येथील कुजी बंदराला धडकल्या, अशी माहिती जपान हवामान विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे. यानंतर प्रशासनाने किनाऱ्या जवळील नागरिकांना या ठिकाणावरुन लांब जाण्याचे आवाहन केले आहे.त्सुनामीचा धोका लक्षात घेता नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत सुरक्षित ठिकाणे सोडू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.