जनतेला उत्तर देणे सरकारची जबाबदारी

0
118

>> ‘मन की बात’मध्ये मोदींचे उद्गार

विधायक टीकेमुळे लोकशाहीला बळ मिळते. टीकात्मक व महत्त्वाच्या सूचना देणार्‍यांचे आभार मानतो. सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याने जनतेला उत्तर देणे हे सरकारचे काम असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशवासीयांना संबोधित करताना केले. देशवासीयांना रमजानच्या शुभेच्छा देत त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतानाच सावरकरांच्या स्वातंत्र्य संग्रामातील संघर्षाला त्यांनी आपल्या भाषणात उजाळा दिला. सावरकर यांनी ज्या तुरुंगात काळ्यापाण्याची शिक्षा भोगली ते सेल्युलर जेल हा नुसताच तुरुंग नाही तर आपल्या स्वातंत्र्याच्या संघर्षाचे तीर्थस्थान असल्याचे मोदी म्हणाले. त्या तुरुंगात सावरकर यांनी एका छोट्याशा कोठडीत बसून कविता लिहिल्या. स्वातंत्र्य सैनिकांनी किती यातना भोगल्या हे यातून कळते. येणार्‍या पिढीला या संघर्षाची माहिती व्हायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
येत्या ५ जून रोजी विश्‍व पर्यावरण दिवस असून त्या दिवशी निसर्गाशी जोडण्याची मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मोदी यांनी केले. महात्मा बुद्धाचा जन्म, त्यांना ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण झाडाखालीच झाले होते. त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.