जनतेने दिलेला कौल मान्य : मुख्यमंत्री

0
11

दोन्ही विजयी उमेदवारांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारतो, असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. उत्तरेत आम्हाला मोठा विजय मिळाला. उत्तरेत आम्हाला मिळालेल्या मतांची टक्केवारी ही तब्बल 56 टक्के एवढी आहे. मात्र, दक्षिण गोव्यात आम्हाला 0.5 टक्के एवढ्या कमी फरकाने पराभव पत्करावा लागला. काही अंशी आम्ही दक्षिण गोव्यात मागे पडलो. काही मतदारसंघांते आम्हाला अपेक्षेपेक्षा बरीच कमी मते मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आम्हाला सासष्टीतील मडगाव मतदारसंघात मतांची चांगली आघाडी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, तेथे आम्हाला नाममात्र मतांची आघाडी मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कुडतरी मतदारसंघाचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे आमच्याबरोबर असताना तेथे आम्हाला आघाडी मिळू शकली नसल्याचे ते म्हणाले. कुडचडे मतदारसंघातही आमचा अपेक्षाभंग झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अन्य काही ठिकाणीही अपेक्षेपेक्षा बरीच कमी आघाडी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

दक्षिणेत 45.46 टक्के मते
दक्षिण गोव्यात भाजपला 45.46 टक्के एवढीच मते मिळू शकली. आणखी 2 टक्के जास्त मते मिळाली असती तर आमचा दक्षिण गोव्यात विजय झाला असता असे ते म्हणाले. दक्षिणेत 13 हजारांच्या फरकाने पराभव पत्करावा लागल्याचे सांगून दक्षिण गोव्यात यापुढे पराभव पत्करावा लागू नये, यासाठी सर्व ते प्रयत्न पक्ष करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर गोव्यातून विजयी ठरलेले आमचे उमेदवार श्रीपाद नाईक व दक्षिण गोव्यातून विजयी ठरलेले काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस या दोघांचे आपण अभिनंदन करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्रात परत मोदी सरकार येणार
देशभरातील निकाल अजून यायचे असले तरी केंद्रात परत एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार सत्तेवर येणार, हे उघड असल्याचे ते म्हणाले. भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी यावेळी पक्षाला उत्तर गोव्यात मिळालेल्या यशाविषयी समाधान व्यक्त केले.

सत्तरीतील जनतेचा ऋणी : विश्वजित

सत्तरीतील मतदारांनी भाजपला भरभरून मते दिल्याचे सांगून आपण आमच्या ह्या मतदारांचा त्यासाठी ऋणी आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले. सत्तरीतील जनतेमुळे उत्तर गोव्यात भाजपला मोठे यश मिळू शकल्याचे ते म्हणाले. त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सहकार्यही महत्त्वाचे ठरल्याचे त्यांनी नमूद केले. सत्तरीतील जनतेच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन राणे यांनी यावेळी बोलताना दिले.

उत्तरेत 18 मतदारसंघांत आघाडी दक्षिणेत 11 ठिकाणी पिछाडीवर

भाजपला उत्तर गोवा मतदारसंघात 18 विधानसभा मतदारसंघांत आघाडी मिळाली. तर दक्षिण गोवा मतदारसंघात 11 मतदारसंघांत पक्ष मागे पडल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. उत्तर गोव्यातील कळंगुट व सांताक्रुझ या मतदारसंघांत पक्षाला कमी मते मिळाल्याचे ते म्हणाले. विश्वजित राणे यांनी सत्तरी तालुक्यातून पक्षाला मोठी आघाडी मिळवून दिल्याचे ते म्हणाले.