Home बातम्या जगभराप्रमाणे गोव्यातही नववर्षाचे जल्लोषात स्वागत!

जगभराप्रमाणे गोव्यातही नववर्षाचे जल्लोषात स्वागत!

0

पणजी, म्हापसा, मडगाव आदी शहरांमध्ये दाखल झालेल्या लक्षावधी पर्यटकांच्या वाहनांनी गेले काही दिवस कोंडीचा त्रास गोमंतकीयांना सोसावा लागत असला, तरीही नववर्षाचे उत्साही वातावरण असल्याने हा त्रासही सर्वांनी विनातक्रार सोसला.

काल संध्याकाळपासूनच पणजीत मांडवी पुलांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. राज्यात कित्येक ठिकाणी नृत्यरजनींचे आयोजन करण्यात आले होते. पाळोळेपासून केरीपर्यंतच्या किनारपट्टीत जणू उत्सवाचेच वातावरण होते. कोलवा, बोगमाळो, बाणावली आदी दक्षिण गोव्यातील, तर मिरामार, कळंगूट, वागातोर, हणजूण, हरमल या किनार्‍यांवर विदेशी पर्यटकांचा धिंगाणा सुरू होता. अनेक ठिकाणी आयोजित नृत्यरजनींना स्थानिक राजकारण्यांचा कृपाशीर्वाद असल्याचे दिसत होते, त्यामुळे पोलिसांनीही त्याकडे दुर्लक्षच केले.

मध्यरात्री राज्यातील विविध भागांतील चर्चमधून प्रार्थनासभा व घंटानाद झाला. अनेक ठिकाणी ओल्ड मॅनच्या प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या. पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्त ठेवला होता, परंतु तरीही मध्यरात्री उशिरापर्यंत सर्वत्र दुचाक्या, चार चाक्या वाहनांनी हॉर्न वाजवीत उत्स्फूर्त मिरवणुका काढल्या. नृत्यरजनींमुळे किनारपट्टीवर रात्रीचा दिवस झाल्याचे पाहायला मिळत होते.

मध्यरात्री शुभेच्छांचे वर्षाव करणारे एसएमएस पाठवण्यास सुरूवात झाल्याने बहुतेक मोबाईल नेटवर्क जाम झाल्याचे चित्र दिसत होते. येणार्‍या वर्षात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे, त्याबाबत औत्सुक्य आणि अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.