जखमींवर प्रथमोपचारासाठी सर्व पोलिसांना प्रशिक्षण : गर्ग

0
82

अपघातात जखमी झालेल्यांचे प्राण वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रथमोपचाराचे प्राथमिक ज्ञान खात्यातील सर्व पोलिसांना देणार असल्याचे पोलीस महानिरीक्ष सुनील गर्ग यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.आपत्कालीन व्यवस्थापन भारतीय वैद्यकीय महामंडळाची गोवा शाखा व मणिपाल इस्पितळाच्या सहकार्याने खात्यातील ४०० पोलिसांना वरील प्रशिक्षण दिले आहे. त्यात पीसीआर व्हॅनमधील २०० तर वाहतूक पो. विभागातील १४० जणांना प्रशिक्षित केल्याची माहिती गर्ग यांनी दिली. अपघात घडल्यानंतर पोलीस सर्वप्रथम घटनास्थळी पोचतो. जखमींना तेथून इस्पितळात हलविण्यासाठी लागणारा वेळ अत्यंत महत्वाचा असतो. या काळात जखमीला कसे हातळावे, याचे ज्ञान असणे आवश्यक असते, असे गर्ग यांनी सांगितले. डॉ. शेखर साळकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वरील प्रशिक्षण दिल्याची माहिती त्यांनी दिली. जखमी रुग्णांना हाताळण्यासाठी लागणारे साहित्य पीसीआरमध्ये उपलब्ध करून देणार असल्याचे गर्ग यांनी सांगितले. नव्याने भरती केलेल्या पोलिसांना जानेवारीपासून प्रशिक्षण देणार असल्याचीही माहिती डॉ. साळकर यांनी दिली.