>> मंगळवारी ९०३ बाधित, १७७७ कोरोनामुक्त
राज्यात कोरोना विषाणूमुळे अजूनही मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. काल मंगळवारी कोरोनामुळे २२ जणांचा मृत्यू झाला. तसेच कोरोनाबाधित नव्या ९०३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्याची कोरोनाची रुग्णसंख्या ११,८६७ एवढी आहे. तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६७१ एवढी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,५६,५६९ एवढी झाली आहे.
काल राज्यात १७७७ जण बरे झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,४२,०३१ एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.७१ टक्के झाले आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
काल दिवसभरातील चोवीस तासांत राज्यात एकूण ४७२० एवढ्या स्वॅबच्या चाचण्या करण्यात आल्या. काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने ८१० जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला. तर ९३ नवे रुग्ण इस्पितळात विलगीकरणात राहिले आहेत. दरम्यान, काल रविवारी कोरोनामुक्त झाल्यामुळे इस्पितळातून १३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
२२ जणांचा मृत्यू
काल राज्यात कोरोनामुळे २२ जणांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात १६ जणांचा, मडगाव जिल्हा इस्पितळ, उत्तर गोवा जिल्हा इस्पितळ, खोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी एकाचा, तर दोन खासगी इस्पितळात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. यातील एका व्यक्तीने कोरोनाचा पहिला डोस घेतला होता.
रुग्णसंख्या घटली
राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या अजूनही मडगावात असली तरी ती एक हजाराच्या खाली आहे. मडगावात सध्या ९२३ एवढी रुग्णसंख्या असून फोंडा ७४५, पणजी ५८५, चिंबल ४८२, पर्वरीत ५४८, कांदोळी ४८५, कासावली ४४५, कुठ्ठाळी ४३६, पेडणे ४८५, वास्को ३५४, कुडचडे ४८०, साखळी ३७९, लोटली ३६१, म्हापसा ४१०, खोर्ली ३५१, वाळपई ३५८ अशी सध्याची रुग्णसंख्या आहे.
कोरोना संसर्ग झालेल्या २६,६३६ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. आतापर्यंत १,०६,४६२ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत. आतापर्यंत ८,२७,६५७ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे. परराज्यातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.