डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण

0
45

>> आयसीएमआर संचालकांची माहिती

देशातील कोरोनाने निर्माण झालेली स्थिती आणि लसीकरण याबाबत केंद्र सरकारने काल एका पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी बोलताना आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी, देशात लशींचा कुठलाही तुटवडा नाही. जुलैच्या मध्यापर्यंत किंवा ऑगस्टपर्यंत भारताकडे दिवसाला १ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पुरेसा साठा असेल. त्यामुळे डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाचे लसीकरण पूर्ण होईल, अशी माहिती दिली.

यावेळी बोलताना डॉ. भार्गव यांनी, कोविशिल्ड लस घेण्याच्या कालावधीत कुठलाही बदल केलेला नाही. कोविशिल्डचा पहिला डोस दिल्यानंतर १२ आठवड्यांनी दुसरा डोस घ्यावा असे सांगितले.

कोरोना रुग्णसंख्या कमी होतेय
देशातील २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात रोज ५००० हजारांहून कमी रुग्णांची नोंद होत आहे. २८ एप्रिल ते ४ मेदरम्यान देशात ५३१ असे जिल्हे आहेत जिथे रोज १०० हून अधिक नवीन रुग्णांची नोंद केली जात होती. आता अशा जिल्ह्यांची संख्या ही २९५ इतकी झाली आहे. देशातील कोरोनाच्या सध्याच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. रोज १.३ लाख बाधित रुग्ण कमी होत आहेत. ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्याच्या रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. गेल्या २४ तासांत देशात १ लाख २७ हजार नवीन रुग्ण आढळून आले. २८ मेपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या २ लाखांच्या खाली आली आहे, असेही यावेळी अग्रवाल यांनी सांगितले.

मुलांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे कमी प्रमाण
मुलांना कोरोनाचा संसर्ग होतो पण त्यांच्यात कोरोनाची लक्षणे ही कमी प्रमाणात किंवा कधी कधी शून्यही दिसून येतात. मुलांना होणार्‍या कोरोना संसर्गावर आमचे लक्ष आहे. मुलांमधील संसर्गाने गंभीर स्वरूप घेतलेले नाही. पण संसर्गाने मुलांच्या वर्तनात बदल होऊ शकतो. मुलांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढू शकतो. पण संसर्ग झालेल्या अतिशय कमी मुलांना इस्पितळामध्ये दाखल करावे लागते. पण आम्ही तयारी करत असल्याचे नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.