गोवा शालान्त मंडळाचे १० वीच्या परीक्षा निकालाबाबत परिपत्रक

0
131

गोवा शालान्त मंडळाने काल काढलेल्या एका परिपत्रकात रद्द करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे निकाल कसे तयार करावेत या संबंधी तपशीलवार माहिती दिली आहे. दहावीचा निकाल तयार करताना विद्यार्थ्यांनी घेतलेल्या अंतर्गत परीक्षेत मिळवलेले २० टक्के गुण व विद्यालयाने वर्षभरात ज्या वेगवेगळ्या परीक्षा व चाचण्या घेतलेल्या होत्या, तसेच विद्यार्थ्यांनी नववीमध्ये मिळवलेले गुण यावर आधारीत ८० टक्के गुण द्यावेत असे स्पष्ट केले आहे.

दर एका विद्यालयाने मुख्याध्यापक व कमीत कमी आणखी सात शिक्षकांचा समावेश असेलल्या एका निकाल समितीची स्थापना करावी.
त्या विद्यालयातील सहा व दुसर्‍या विद्यालयातील एका शिक्षकाचा या समितीत समावेश असावा. विद्यार्थ्याने अंतर्गत परीक्षेत घेतलेले गुण तसेच नववी इयत्तेत मिळवलेले गुण यांचे योग्य प्रकारे तपशील तयार केले जावेत. त्यासाठीचा जो दस्तऐवज तयार केला जाईल त्याची मंडळाच्या सूचनेनुसार फेरतपासणी केली जावी, असे म्हटले आहे.
जर विद्यालयांनी वेगवेगळ्या सत्रांत घेतल्या जाणार्‍या दोन परीक्षा घेतलेल्या असतील तर त्यांनी त्यातील ज्या परीक्षेत विद्यार्थ्याला जास्त गुण मिळालेले असतील ते गुण गृहीत धरावेत. अथवा दर एका परीक्षेच्या निकालाला महत्व द्यावे. त्यासंबंधीचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मंडळाने विद्यालयांना दिले आहे.

काही विद्यालयांनी ऑनलाइन तर काहींनी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतलेल्या असू शकतात. तसेच काही विद्यार्थ्यांनी एखादी अथवा एकही परीक्षा दिलेली नाही असेही होऊ शकते. अशा विद्यार्थ्यांचा निकाल तयार करताना काय करावे याचा निर्णय विद्यालयाच्या निकाल समितीने द्यावा असे मंडळाने स्पष्ट केले आहे. तसेच या संबंधीचे सगळे तपशील निकाल तयार करताना दिले जावेत असे स्पष्ट केले आहे.

इतर विद्यालयांशी तुलना नाही
या निकालाचे गुण हे विद्यालयीन स्तरावर देण्यात येणार असल्याने या गुणांची तुलना वेगवेगळ्या विद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या गुणांशी केली जाणार नाही. कारण हे गुण वेगवेगळ्या विद्यालयांनी स्वतंत्रपणे काढलेल्या प्रश्‍नपत्रिकेवर आधारित असतील. निकालासंबंधीचे सगळे तपशील हे समितीच्या सगळ्या सदस्यांच्या सह्यांसह मुख्याध्यापकांच्या ताब्यात सुरक्षितपणे असावेत.

पथकाद्वारे निकालाची पाहणी
या निकालांची पाहणी करण्यासाठी शालांत मंडळ एका पथकाची नियुक्ती करेल. हे पथक विद्यार्थ्यांना योग्यप्रकारे गुण देऊन निकालपत्र तयार करण्यात आले आहे याची खातरजमा करण्याचे काम करील, असे परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे. एखाद्या विद्यालयाने निकाल तयार करताना घालून दिलेल्या धोरणांचा अवलंब केला नाही अथवा निःपक्षपातीपणे निकाल तयार केले नाहीत तर मंडळ सदर विद्यालयावर कारवाई करू शकते. दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्यात येतील.

पुरवणी परीक्षा
निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या निकालात सुधारणा आवश्यक आहे असे दिसून येईल त्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रश्‍नपत्रिका मंडळ तयार करील असेही परिपत्रकात म्हटले.

बारावीच्या परीक्षेबाबत आज
मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील बारावीच्या परीक्षेबाबत चर्चा करण्यासाठी शिक्षण खात्याचे अधिकारी, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, गोवा बोर्डाचे अधिकारी यांची आज दि. २ जून रोजी सकाळी १० वा. तातडीची बैठक बोलावली आहे.