चोरी हेच कारण?

0
325

दिवसाढवळ्या घडलेल्या ज्या निर्घृण हत्येने केवळ मडगावच नव्हे, तर अवघा गोवा हादरून गेला, ती स्वप्निल वाळके या सराफाची हत्या केवळ चोरीच्या प्रयत्नातून झाली असे पत्रकारांना आणि जनतेला ठासून सांगण्याचा प्रयत्न पोलीस महासंचालक मुकेशकुमार मीना यांनी जातीने मडगावात जाऊन पत्रकार परिषद घेऊन केला. गुन्हे शाखेच्या आजवरच्या तपासकामातून या हत्येमागे केवळ जबरी चोरी हाच उद्देश समोर येत असल्याचे त्यांचे एकूण म्हणणे होते. पण या हत्या प्रकरणाच्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती, सीसीटीव्ही फुटेजमधून दिसणारी दृश्ये, विविध आरोपींची पार्श्वभूमी आदी गोष्टी पाहिल्या तर पोलीस महासंचालकांच्या वरील म्हणण्यावर विश्वास ठेवणे कठीण जात
हत्या झालेला सराफ हा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या एका ज्येष्ठ महिला कार्यकर्तीचा मुलगा. त्याच्या हत्येचे वृत्त कळताच भाजपाचे बडे नेते घटनास्थळी जातीने धावले आणि त्यांनी पोलिसांना या प्रकरणाचा प्राधान्यक्रमाने छडा लावण्यास भाग पाडले. अवघ्या काही तासांत पोलिसांनी सर्व संबंधित आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मात्र, हे आरोपी पकडले गेल्यानंतर त्यांची एकंदर पार्श्वभूमीच सर्वस्वी संशयास्पद असूनही केवळ चोरीच्या प्रयत्नात त्यांच्याकडून सराफाची हत्या झाली असे भासवण्याचा जो काही आटापिटा वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून सध्या चालला आहे तो पाहिला तर यामागे काही राजकीय दबाव तर नाही ना असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.
सदर सराफ आणि आरोपीचा पूर्वपरिचय होता हे पोलीस कबुल करतात, परंतु केवळ दागिने खरेदीच्या बहाण्याने तो त्याला पूर्वी भेटला होता असे जे पोलीस अधिकारी सांगत आहेत, ते संशयास्पद वाटते. नेमक्या ह्या भेटी कशासाठी होत होत्या, चोरीचे दागिने सराफाला स्वस्तात विकण्याचा काही प्रकार या आरोपींकडून चालला होता का, त्यातील आर्थिक देवघेवीच्या वादातून झालेल्या बाचाबाचीअंती ही हत्या झाली का, यामागे खंडणीखोरीचा अथवा व्यावसायिक दुष्मनीचा काही भाग आहे का असे अनेक प्रश्न जनतेला या हत्येनंतर पडले होते. आरोपी पकडले गेल्यानंतर त्यांची एकूण सराईत गुन्हेगारी पार्श्‍वभूमी, पूर्वी दागिन्यांच्या चोर्‍यांशी असलेला त्यांचा संबंध आणि या हत्या प्रकरणाचा एकूण घटनाक्रम हे सगळे पाहिले तर निव्वळ चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली हे पोलिसांचे म्हणणे मुळीच पटण्याजोगे नाही.
गुन्हे शाखेच्या तपासाची एकूण दिशा पाहिली तर आरोपींना त्यांच्या कृत्याची सजा देण्यासाठी हा तपास चालला आहे की त्यांना या प्रकरणातून सोडवण्यासाठी चालला आहे असा प्रश्न आज जनतेला पडला आहे. हणजूण दागिने चोरीच्या प्रकरणाचा ह्या हत्या प्रकरणाशी थेट संबंध नसल्याचे पोलीस प्रमुख सांगून मोकळे झाले आणि वर त्या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचेही त्यांचे म्हणणे होते. एखादे तपासकाम पूर्ण झालेले नसताना आधीच काही गोष्टी नाकारण्याची ही घाई नेमकी कशासाठी चालली आहे?
या हत्या प्रकरणातील एका आरोपीला अटक न करता त्याचा या प्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध नसल्याची क्लीन चीटही पोलीस प्रमुखांनी देऊन टाकली आहे. तपासकाम अद्याप पूर्ण झालेले नसताना अशा प्रकारे एखाद्या गुन्हेगाराला क्लीन चीट देण्याचा हा प्रकारही त्यामागील हेतूंबाबत संशय निर्माण करतो.
या हत्या प्रकरणामागे केवळ चोरी हा उद्देश होता असेच जर पोलिसांना सिद्ध करायचे असेल तर तुम्ही असताना दिवसाढवळ्या अशा प्रकारची जबरी चोरी करण्याची या गुन्हेगारांची हिंमतच कशी होते या प्रश्नाचे उत्तर त्यांनी आधी द्यावे. कायदा आणि सुव्यवस्थेचा राज्यात धाक आहे की नाही? ज्या सराईतरीत्या सराफावर गोळी झाडली गेली, सपासप सुर्‍याचे वार झाले, ते पाहाता हे गुन्हेगार अत्यंत निष्णात आहेत. मग एखाद्या नवशिक्याप्रमाणे ते चोरी करायला जाताना दुकानाजवळच आपली जीप नेऊन ठेवतील, स्कूटर नेऊन ठेवतील, गुन्ह्याच्या ठिकाणी पडलेले पिस्तुल आणायला परत तेथे जायला निघतील हे सगळे कसे काय पटवून घ्यायचे? पोलिसांनी या हत्या प्रकरणाचे खरे कारण जनतेपासून लपवण्याचा आटापिटा करू नये. मृत सराफाची प्रतिमा डागाळू नये यासाठीच पोलिसांकडून त्यांच्यावरील राजकीय दबावापोटी तर ही प्रयत्नांची शर्थ केली जात नाही ना असा प्रश्न आज सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. जनमानसातील या शंकेचे निरसन झाले पाहिजे. गुन्हेगारांची अब्रू वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस दलाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत याचे भान असावे हे बरे!