Home Featured चोडण धक्क्याजवळ मांडवी नदीत फेरीबोट बुडाली

चोडण धक्क्याजवळ मांडवी नदीत फेरीबोट बुडाली

0

फेरीबोटीत पाणी साचल्याने घडला प्रकार; कर्मचाऱ्यांच्या 3 दुचाकी बुडाल्या; सुदैवाने जीवितहानी नाही

रायबंदर ते चोडण या जलमार्गावरील एक फेरीबोट चोडण फेरी धक्क्याजवळ पार्क केलेल्या ठिकाणी मांडवी नदीत बुडण्याची घटना काल घडली. या फेरीबोटीमध्ये सहा कर्मचारी होते. फेरीबोट बुडू लागल्यानंतर कर्मचारी वेळीच बाहेर पडल्याने संभाव्य अनर्थ टळला. या घटनेत कर्मचाऱ्यांची तीन दुचाकी वाहने पाण्यात बुडाली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली असून, राज्यातील सर्व जलमार्गांवरील फेरीबोटींचे फिटनेस ऑडिट केले जाईल, असे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.

फेरीबोटीतील पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने हा प्रकार घडला. या फेरीबोटीमध्ये रविवारी रात्री पाणी साचले होते. सदर पाणी बाहेर काढण्यात आले होते; मात्र, रात्री पुन्हा पाणी साचल्याने सकाळी फेरीबोट एकाबाजूने बुडू लागली. अनेक वर्षांपासून सेवा देत असलेल्या फेरीबोटींची वेळेवर दुरुस्ती केली जात नसल्याने दुर्घटना घडतात, असा आरोप स्थानिकांनी केला. जर ही घटना नदीच्या मध्यभागी घडली असती, तर मोठा अपघात झाला असता, असे यावेळी नागरिकांनी बोलून दाखवले
फेरीबोट योग्य दिशेने पार्क न केल्यामुळे पाणी घुसले आणि ती बुडाली, असा दावा नदी परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पंपांच्या साहाय्याने बोटीतील पाणी बाहेर काढण्याचे आणि व पुन्हा फ्लोट करण्याचे काम सुरू केले आहे.

दरम्यान, चोडण-रायबंदर मार्गावर चार फेरीबोटींतून प्रवासी वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. या जलमार्गावर एकूण 5 फेरीबोटी वाहतूक करतात.
नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. ही घटना कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे की तांत्रिक बिघाडामुळे झाली याची चौकशी केली जात आहे. चोडण ते रायबंदर या जलमार्गावर रो-रो फेरीसेवा सुरू झाल्यानंतर, सध्याच्या फेरी इतरत्र तैनात केल्या जाऊ शकतात, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी यावेळी सांगितले.

फेरीबोटींचे फिटनेस ऑडिट होणार
फेरीबोटीच्या पोकळ टाकीमध्ये छिद्र असल्याने फेरी बुडाली असावी. राज्य सरकारकडून लोकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे. खात्याच्या सर्व फेरीबोटींचे फिटनेस ऑडिट केले जाईल आणि वापरास अयोग्य फेरीबोटी बदलल्या जातील, असे नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.