चिखलीत कार नाल्यात कोसळली

0
17

>> चौघे गंभीर जखमी; अपघातांची मालिका कायम

गोव्यात अपघातांचे सत्र सुरूच असून, शुक्रवारी पहाटे ४ वाजता दाबोळी-चिखली येथील राष्ट्रीय मार्गावरून वास्कोच्या दिशेने जाणारी एका कार नाल्यात कोसळली. त्यामुळे कारमधील चौघे गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

शुक्रवारी पहाटे चारच्या दरम्यान दाबोळी-चिखली पंचायत क्षेत्रातील राष्ट्रीय मार्गावर एका एसयूव्ही कार (क्र. जीए-०६-ई-६४५१) वास्कोच्या दिशेने येताना चालकाचा वाहनावरील ताबा गेल्याने ती रस्त्याच्या बाजूस असलेल्या नाल्यात कोसळली. हा अपघात झाल्याचे कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी वाहनातील जखमींना त्वरित बाहेर काढले. यावेळी वाहनात चार जण होते. सर्वजण गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी बांबोळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. वास्को पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, दाबोळी येथे वालेस जंक्शनजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने ती थेट सिग्नलला धडक देऊन पलटी झाली. सदर कार केपेहून दाबोळी विमानतळावर जात होती. या कारमध्ये अन्संट डायस, मेलरो डायस व एडविन कुलासो असे तिघेजण होते. एडविन कुलासो हा विदेशात जाण्यासाठी दाबोळी येथे विमानतळावर येत होता. त्याला सोडण्यास त्याचे मित्रही बरोबर आले होते. सुदैवाने कारमधील कुणालाही इजा झाली नाही. त्यानंतर एडविन कुलासो याने अपघात स्थळावरून अन्य कारने दाबोळी विमानतळ गाठले. सदर अपघात शुक्रवारी पहाटे ३.५० वाजता घडला.